नव्या खेळाडूंना संधी देण्याच्या हेतूने निर्णय

विश्वचषक इतिहासात जपानतर्फे आतापर्यंत सर्वाधिक गोल करणारा केइसुके होंडा या गोलवीराने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती पत्करली आहे. विश्वचषकातील बेल्जियमविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत २-० अशा आघाडीनंतर २-३ असा सामना गमवावा लागल्यामुळे आपण निराश झालो आहे. मात्र जपानचा संघ कशाप्रकारे प्रगती करू शकतो, हे आम्ही दाखवून दिले असून नव्या दमाच्या खेळाडूंवर जबाबदारी सोपवण्याची हीच वेळ आहे, अशी प्रतिक्रिया त्याने आपल्या ‘ट्विटर’ खात्यावर दिली.

जपानच्या फुटबॉल इतिहासात ३२ वर्षीय होंडाचे नाव सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहे. २००८मध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या होंडाने यंदाच्या विश्वचषकातही सुरेख कामगिरी करताना संघाला बाद फेरीपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. तसेच यंदाच्या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या जपानच्या संघातील सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावणारा खेळाडू होंडा होता. आक्रमणात असलेली चपळाई, दूरवरून पास करण्याचे कौशल्य आणि समोरील संघाच्या बचावपटूंना चकवण्यात होंडा पटाईत होता. त्यामुळेच खेळण्याच्या शैलीच्या आधारावर त्याला ‘सम्राट केइसुके’ असे टोपणनाव देण्यात आले. विशेष म्हणजे कारकीर्दीतील १००वा सामना खेळण्याच्या टप्प्यावर असतानादेखील त्याने घेतलेली निवृत्ती चाहत्यांच्या मनाला हळहळ लावणारी आहे.

‘‘होंडाच्या निवृत्तीने जपानच्या संघाचे आक्रमण फिके पडणार असून आगामी आशियाई चषकाअगोदरच आम्हाला संघबांधणी करण्यावर भर द्यावा लागणार आहे,’’ असे जपानचा गोलरक्षक इजी कावाशिमाने सांगितले.

केइसुके होंडाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

  • वर्षे : २००८ ते २०१८
  • सामने : ९८
  • गोल : ३७

महत्त्वाचे क्षण

  • २००८ : पहिला आंतरराष्ट्रीय सामना (वि. बहरिन)
  • २००९ : पहिला आंतरराष्ट्रीय गोल (वि. चिली)
  • २०१० : विश्वचषकातील पहिला गोल व सामनावीर पुरस्कार (वि. कॅमेरून)
  • २०१० : एकाच विश्वचषकात दोन गोल नोंदवणारा जपानचा दुसरा खेळाडू (वि. डेन्मार्क)
  • २०१० : विश्वचषकातील दुसरा सामनावीर पुरस्कार
  • २०१० : जपानचा सवरेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार
  • २०११ : आशियाई चषकातील सवरेत्कृष्ट मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार
  • २०१४ : विश्वचषकातील तिसरा गोल (वि. आयव्हरी कोस्ट)
  • २०१८ : जपानतर्फे सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत हिरोमी हारासह संयुक्तपणे चौथ्या स्थानी.
  • २०१८ : विश्वचषकातील चौथा गोल (वि. सेनेगल)
  • २०१८ : सलग तीन विश्वचषकात गोल करणारा जपानचा एकमेव खेळाडू
  • २०१८ : बेल्जियमविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील शेवटचा सामना