जगभरातील चाहत्यांमध्ये फिफा विश्वचषकाबद्दल असलेली उत्सुकता ही सर्वांना माहिती आहे. प्रत्यक्ष मैदानात जाऊन सामना पाहण्यासाठी चाहते अनेक युक्त्या लढवतात. काही हौशी चाहते हजारो किलोमिटर प्रवास करुन मैदानात पोहचतात तर काही लोकं कर्ज काढून फुटबॉल सामने पाहण्यासाठी चक्क कर्जही काढतात. विश्वचषकाच्या काळात अशा अतरंगी चाहत्यांची ओळख आपल्याला बातम्यांमधून होत असते. अशाच एका चाहत्याने फुटबॉल सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी ३ महिन्यांमध्ये तब्बल २५ किलो वजन वाढवून घेतलं आहे.

दक्षिण अमेरिका उप-खंडातील पेरु देशातल्या चाहत्याला फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी रशियाला जायचं होतं. मात्र सामन्याच्या तिकीटांसाठी होणारी झुंबड पाहता या पठ्ठ्याने एक वेगळाच मार्ग अवलंबला. रशियात स्थुल माणसांसाठी काही विशेष तिकीटं राखून ठेवण्यात आलेली आहेत. या कोट्यामधून तिकीटं मिळवण्यासाठी पेरुच्या या चाहत्याने चक्क ३ महिन्यांमध्ये २५ किलो वजन वाढवण्याचा निर्णय घेतला. स्थुल लोकांसाठी राखीव असलेल्या जागेमधून सामना स्पष्ट पाहता येतो असंही या चाहत्याचं म्हणणं आहे. ‘सन’ या वृत्तपत्राने या संदर्भातलं वृत्त प्रसारित केलं आहे.

पेरुसाठी अधिकृतरित्या फिफाने ४३ हजार तिकीटं दिली होती. मात्र ८० हजारापेक्षा जास्त लोकांना या सामन्याची तिकीटं हवी होती. सध्या पेरुमध्ये रस्तोरस्ती फिफा विश्वचषकाचा फिव्हर पहायला मिळतो आहे.