FIFA World Cup 2018 AUS vs PER : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज क गटातील शेवटच्या लढतीत पेरूने ऑस्ट्रेलियावर २-० असा विजय मिळवला. या विजयाबरोबरच पेरू संघाने एक इतिहास रचला. पेरूने विजय मिळवत गटात तिसऱ्या स्थानी राहत स्पर्धेचा शेवट गोड केला. मात्र, त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे फिफा विश्वचषकात पेरु संघाने तब्बल ४० वर्षांनंतर आपला पहिला विजय पटकवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेरूचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले होते. मात्र, स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला या सामन्यात विजय आवश्यक होता.
परंतु, पेरूने सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियावर हल्ला चढवला. पेरूच्या आक्रमणापुढे ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसून आले. पेरूला आक्रमक खेळ करण्याचा फायदा झाला. पेरूकडून पूर्वार्धात १८व्या मिनिटाला कॅरिल्लोने गोल केला. त्यामुळे पेरूचा संघ १-०ने आघाडीवर होता. उत्तरार्धात ५०व्या मिनिटाला गुरेरोने गोल करत पेरूची आघाडी आणखी वाढवली. या दोन गोलच्या जोरावर पेरूने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली.

या विजयामुळे पेरूचा विश्वचषक स्पर्धेतील विजयाचा दुष्काळ अखेर संपुष्टात आला. तब्बल ४० वर्षांनी पेरू संघाला फिफा विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवता आला. यापूर्वी पेरुने १९७८ साली इराणवर ४-१ असा विजय मिळवला होता. त्यानंतर मात्र पेरूच्या संघाला विजय मिळवता आला नव्हता. परंतु आज ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यामुळे पेरू संघाने इतिहास रचला.

 

पेरूने सामन्यात विजय मिळवत गटात तिसऱ्या स्थानी राखले आणि स्पर्धेचा शेवट गोड केला. तर, फ्रान्स आणि डेन्मार्कमध्ये झालेला सामना हा गोलशून्य बरोबरीत सुटला. मात्र आधीच्या २ सामन्यांत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे या दोनही संघांना बाद फेरीत स्थान मिळाले. फ्रान्सने गटात अव्वल स्थान पटकावले, तर डेन्मार्कने दुसऱ्या स्थानी राहत बाद फेरीतील स्थान निश्चित केले.

आता ड गटातील बाद फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या संघांशी फ्रान्स आणि डेन्मार्क यांचे सामने होणार आहेत.

मराठीतील सर्व फिफा २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2018 aus vs per peru australia
First published on: 26-06-2018 at 23:03 IST