प्रा. डॉ. अभिजीत वणिरे

‘विश्वचषकाचा अंतिम रणसंग्राम’ असे ज्याला संबोधले गेले, तो फ्रान्स-क्रोएशिया यांच्यातील जगज्जेतेपदाचा सामना रविवारी पार पडला. फ्रान्सच्या समर्थकांव्यतिरिक्त स्टेडियममधील व जगातील सर्व प्रेक्षकांचा पाठिंबा क्रोएशियाला लाभलेल्या या अटीतटीच्या सामन्यात ७८ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने अखेर फ्रान्सने बाजी मारलीच. या रणसंग्रामात फ्रान्सने क्रोएशियाचा ४-२ असा पराभव करून दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. जगातील फुटबॉलची महासत्ता म्हणून बिरुदावली मिरवण्याची संधी या निमित्ताने फ्रान्सला मिळाली. सद्य:स्थितीत  २०२२पर्यंतचे फुटबॉलमधील ‘अनभिषिक्त सम्राट’ आम्हीच आहोत, हेसुद्धा त्यांनी जगाला दाखवून दिले. त्याचबरोबर सर्वाधिक वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ब्राझील, जर्मनी, इटली यांच्यानंतर र्अजटिना व उरुग्वे यांच्या पंक्तीत बसण्याचा मान फ्रान्सला मिळाला.

क्रोएशियाला फ्रान्स संघातील पॉल पोग्बा, अँटोइन ग्रीझमन, किलियान एम्बापे व एन. गोलो कांटे या खेळाडूंचा खरा धोका होता. अगदी त्याचप्रमाणे फ्रान्सकडून पहिला गोल ग्रीझनमनच्या फ्री कीकवर झाला. फक्त दुर्दैव असे की, या फ्री किकवर फ्रान्सच्या खेळाडूने गोल न मारता क्रोएशियाच्या मारिओ मान्झुकीचने स्वयंगोल केला. हेडरच्या साहाय्याने गोल वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्याकडून हे घडले. संपूर्ण स्पध्रेत दर्जेदार खेळ करणाऱ्या मान्झुकीचला हा स्वयंगोल पुढील अनेक दिवस सतावणार हे नक्की. फ्रान्सचे उर्वरित तीन गोल पोग्बा, एम्बापे व ग्रीझमन यांनीच केले. क्रोएशियाकडून मान्झुकीच, इव्हान पेरिसिच व लुका मॉड्रिच यांच्याकडून असलेल्या अपेक्षांची त्यांनी पूर्तता केली. मांडीचा स्नायू दुखावलेला असूनही पेरिसिचने उजव्या पायावर आलेला चेंडू डाव्या पायावर घेऊन डाव्या पायाने अप्रतिम गोल साकारला. दुसरा गोल मान्झुकीचनेच केला, तर स्पध्रेतील ‘गोल्डन बॉल’चा मानकरी मॉड्रिच ठरला.

या सामन्यात सुरुवातीपासून क्रोएशिया संघाने आक्रमण वाढवण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांना यशही आले. पहिल्या सत्रात क्रोएशियाचे पूर्ण आक्रमण होते, पण त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही. अनपेक्षितपणे पहिला स्वयंगोल झाला. लगेचच दहा मिनिटांत सामन्यात बरोबरी होऊनही दुर्दैवाने फ्रान्सला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. महत्त्वपूर्ण सामन्यात असे दोन-दोन धक्के पूर्वार्धात मिळत असतील, तर एखादा संघ सामन्यात पुन्हा उभारी घेणे कठीण बाब आहे. मध्यंतरापर्यंत २-१ असा गोलफरक असताना उत्तरार्धात क्रोएशिया संघ या दोन गोलमुळे दबावात खेळताना दिसून आला. याचा फायदा घेऊन फ्रान्सने आक्रमणाची धार वाढवली. पर्यायाने आणखी दोन गोल त्यांना बोनस रूपात मिळाले. सामना संपण्यास २६ मिनिटांचा खेळ बाकी असताना ४-१ असा गोलफरक होता. या वेळी क्रोएशियाला या सामन्यात परतण्याची संधी होती. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही केले. पण फ्रान्सच्या बचावफळीतील बेंजामिन पावार्ड, राफेल वारणे, सॅम्युअल उमटिटी, लुकास हर्नाडिज यांच्या अप्रतिम बचावामुळे क्रोएशियाला ते शक्य झाले नाही, तरीही गोलरक्षक हय़ुगो लॉरिस याच्या गफलतीमुळे क्रोएशियाला दुसऱ्या गोलची परतफेड करता आली. अखेर सामना फ्रान्सने जिंकून विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यानंतरची क्रोएशियन प्रेक्षकांची एक बाब नोंद घेण्यासारखी होती. आपला संघ पराभूत होत असताना क्रोएशियन प्रेक्षक संघाला पाठिंबा देताना दिसत होते. किंबहुना पराभवाचे त्यांना जरी शल्य वाटत असले, तरी ते दाखवून देत नव्हते. प्रशिक्षक झ्लाटको डॅलिच यांच्याकडे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने महेंद्रसिंग धोनीची आठवण येत होती. विजयाचा उन्माद किंवा पराभवाची अतिसंवेदना त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. संपूर्ण स्पध्रेत ते शांतपणे व्यूहरचना करताना अनेकांनी पाहिले. कालचा सामना संपल्यानंतरही ते खेळाडूंची समजूत काढताना दिसत होते. जरी क्रोएशिया हरला असला तरी त्यांनी जगातील प्रेक्षकांची मने मात्र जिंकली. उद्या जेव्हा हा संघ मायदेशात रवाना होईल, तेव्हा त्यांच्या पराभवाचे शल्य कोणत्याही क्रोएशियन व्यक्तीला असणार नाही, तर भविष्यातील विश्वविजेतेपदाचा पाया या संघाने रचलेला आहे, म्हणून या संघाचे जल्लोषात स्वागत होईल.

..तर २०२६च्या विश्वचषकात भारत खेळेल!

२०२२ची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कतार येथे होणार असून त्यानंतर २०२६मध्ये अमेरिका, मेक्सिको व उरुग्वे यांच्या संयुक्तयजमानपदाखाली होणार आहे. या स्पध्रेत ३२ ऐवजी ४८ संघ सहभागी होतील, असे नुकतेच ‘फिफा’ने जाहीर केलेले आहे. त्यानिमित्ताने भारताला या स्पध्रेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आशिया गटातून सध्या चार संघ विश्वचषकास पात्र ठरतात. याऐवजी २०२६च्या स्पध्रेत आठ संघ सहभागी होतील. सध्या भारत अशिया खंडात १४व्या स्थानावर आहे. याचाच अर्थ भारतापुढे अजून पाच संघ आहेत. सध्या भारतीय फुटबॉल महासंघाने २०२६च्या स्पध्रेला गृहीत धरून जर आत्तापासून १२ ते १५ वर्षे वयोगटाच्या मुलांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले, तर हे खेळाडू नावारूपाला येऊ शकतात. जपान ज्या पद्धतीने विश्वक्रमवारीतील पहिल्या २४ संघांबरोबर सातत्याने सामने खेळत असतो, त्या पद्धतीने या खेळाडूंनाही विदेशात वरील दर्जेदार संघांबरोबर सराव सामने खेळवले, तर निश्चित भारताचा येत्या पाच वर्षांत जागतिक क्रमवारीत दर्जा सुधारेल व आशिया खंडातून भारत पहिल्या आठ संघातून विश्वचषकात पात्र होता येईल. यानिमित्ताने विश्वचषकात खेळण्याचे सर्व भारतीयांचे स्वप्न पूर्ण होईल अशी आशा वाटते.

abhijitvanire@yahoo.com