सध्या रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाची रंगत प्रत्येक सामन्यागणिक वाढत चाललेली आहे. अनेक दिग्गज संघ या स्पर्धेतून बाहेर पडले असून काही धक्कादायक निकालांचीही नोंद झाली आहे. यातलाच एक संघ म्हणजे अर्जेंटिना, मेसीच्या संघाला यंदाच्या विश्वचषकातून बाद फेरीमधूनच आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. साखळी फेरीत खराब सुरुवात केलेल्या अर्जेंटिनाने नंतर नायजेरियावर २-१ अशी मात केली होती. मात्र या सामन्याआधी नायजेरियाचा कर्णधार मायकेल जॉन ओबी याच्यावर संकटाचा मोठा डोंगर कोसळला होता. सामना सुरु होण्याआधी मायकेलच्या वडिलांचं त्याच्या मायदेशात डाकूंनी अपहरण केलं. मात्र ही बातमी समजल्यानंतरही आपली जबाबदारी व देशवासियांच्या भावनांचा आदर करत मायकेलने सामना खेळण्याचा निर्णय घेतला, त्याच्या या कृतीचं सध्या सर्वच स्तरातून कौतूक केलं जात आहे.

ही बातमी समजल्यानंतर मायकेल आणखी एका पेचात पडला होता. वडिलांचं अपहरण झाल्याची बातमी कोणालाही सांगितल्यास तुझ्या वडिलांना ठार मारु अशी धमकी अपहरणकर्त्यांनी मायकेलला दिली होती. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. “वडिलांच्या अपहरणाची बातमी समजल्यानंतर काय करावं हेच मला समजतं नव्हतं. मात्र माझ्या देशातील लाखो चाहत्यांच्या अपेक्षा मी धुळीस मिळू देणार नव्हतो, त्यामुळे मी शांत राहून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. माझे जवळचे काही मित्र आणि नातेवाईक सोडले तर या घटनेबद्दल कोणालाही माहिती नव्हती.” मायकेल ‘द गार्डियन’शी बोलत होता.

वडिलांवर आलेल्या संकटाची जाणीव असतानाही मायकेलने आपल्या संघाचं खंबीरपणे नेतृत्व केलं. अर्जेंटिनाचा मार्कोस रोजोने गोल करण्यात अपयशी ठरला असता, तर कदाचित नायजेरियाचा संघ बाद फेरीतही प्रवेश करु शकला असता. काही दिवसांपूर्वीच मायकेलच्या वडिलांना अपहरणकर्त्यांनी सोडून दिलं आहे. सध्या मायकेलच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नायजेरियाचा संघ बाद फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी जरी अयशस्वी ठरला असला, तरीही त्याने दाखवलेली जिद्द आणि धैर्य नक्कीच वाखणण्याजोगं आहे.