आधुनिक हवाई युद्धात शत्रूच्या हल्ल्याची आगाऊ सूचना देणाऱ्या विमानांना खूप महत्त्व आहे. त्यांना तांत्रिक भाषेत ‘एअरबोर्न अरली वॉर्निग अ‍ॅण्ड कंट्रोल सिस्टिम’ (अवॅक्स) असे म्हटले जाते. सामान्यपणे या प्रणाली ‘आय इन द स्काय’ म्हणून ओळखल्या जातात.

या प्रणाली खरोखरच आकाशात असलेल्या डोळ्यांसारखे काम करतात. त्यात नेहमीच्या प्रवासी विमानांमध्ये थोडी सुधारणा करून त्यावर शक्तिशाली रडार, संगणक आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसवलेल्या असतात. ही विमाने हवेत दीर्घकाळ फिरत राहून शत्रूच्या विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन (वैमानिकरहित विमाने) आणि क्षेपणास्त्रांचा मागोवा घेतात. शेकडो किलोमीटर अंतरावरून त्यांचा शोध घेतात आणि जमिनीवरील नियंत्रण कक्ष, लढाऊ विमाने आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र केंद्रे यांना शत्रूच्या हल्ल्याची आगाऊ सूचना देऊन सावध करतात. त्यानंतर अल्पावधीत लढाऊ विमाने हवेत झेपावतात किंवा आधीच हवेत सज्ज असणारी लढाऊ विमाने त्या दिशेला वळवून धोका नष्ट केला जातो.

‘अवॅक्स’ यंत्रणेच्या वापराचे कारण असे की, त्याने जमिनीच्या जवळून, कमी उंचीवरून उडणारी शत्रूची विमाने किंवा क्षेपणास्त्रेही टिपता येतात. जमिनीवरील रडारच्या डिश अँटेना ठरावीक कोनात आकाशाकडे वासलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या खालील काही प्रदेशांतील विमाने टिपणे अवघड होते. याचा फायदा घेऊन शत्रू कमी उंचीवरून विमाने हल्ल्यासाठी पाठवतो. अशी विमाने हवेतील रडारवरूनही टिपणे अवघड असते. कारण हवेतून जमिनीच्या दिशेने पाठवलेल्या रडारच्या लहरी जेव्हा परावर्तित हेऊन परत येतात तेव्हा त्यात नको त्या बाबींचे प्रतिबिंबही उमटते. त्याला ‘ग्राऊंड क्लटर’ म्हणतात. त्याने रडारवरील प्रतिमा गिचमिड बनते. त्यातून नेमके लक्ष्य शोधणे अवघड असते. यावर मात म्हणून ‘लुक डाऊन’ रडार विकसित केले गेले. ते प्रतिमांच्या गर्दीतून नेमके लक्ष्य शोधून काढते. ‘अवॅक्स’वरील रडारला अशा प्रकारची उत्तम ‘लुक डाऊन’ क्षमता असते.

अमेरिकेची बोईंग ई-३ ए सेंट्री नावाची ‘अव्ॉक्स’ यंत्रणा प्रसिद्ध होती. त्यात बोईंग ७०७ प्रवासी विमानात बदल करून त्यावर रडारचा फिरता डिश अँटेना बसवला होता. हे हवेतील रडार ३९५ किलोमीटरवरून शत्रूच्या विमाने, क्षेपणास्त्रे आदींचा माग काढत असे. त्याची सूचना सैन्याला देऊन सावध केले जात असे आणि धोका वेळीच नष्ट केला जात असे. अमेरिकेकडे ग्रुमान ई-२ सी हॉकआय प्रकारची अव्ॉक्स विमानेही वापरात होती. अव्ॉक्स विमाने जशी हवेतील लक्ष्ये टिपू शकतात तशाच प्रकारे जमिनीवरील लक्ष्ये टिपण्यासाठी अमेरिकेने ‘जॉइंट सव्‍‌र्हेलन्स टार्गेट अ‍ॅटॅक रडार सिस्टिम’ (जे-स्टार्स) नावाने विमानावरील यंत्रणा विकसित केली होती. या  विमानांनी इराक, अफगाणिस्तान, बोस्निया, सीरिया आदी ठिकाणच्या संघर्षांत बरीच मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळे शत्रूची विमाने आणि क्षेपणास्त्रे खूप अंतरावरून शोधून नष्ट करणे आणि हवाई प्रभुत्व मिळवणे सोपे झाले.

sachin.diwan@expressindia.com