अणुस्फोटाचे दोन मूलभूत प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात युरोनियमसारख्या जड मूलद्रव्याच्या अणूचे विखंडन किंवा विभाजन (फिशन) करतात. तर दुसऱ्या प्रकारात हेलियम किंवा हायड्रोजनसारख्या हलक्या मूलद्रव्याच्या अणूंचे मीलन (फ्यूजन) घडवून आणतात. अणुविखंडनापेक्षा अणुमीलनातून अधिक ऊर्जा बाहेर पडते. पहिल्या प्रकाराला अणुबॉम्ब तर दुसऱ्या प्रकाराला हायड्रोजन बॉम्ब किंवा थर्मोन्यूक्लिअर बॉम्ब म्हणतात.

अणुविखंडनाच्या क्रियेद्वारे अणुबॉम्ब बनवण्यासाठी युरेनियम शुद्धस्वरूपात मिळवणे खूप आवश्यक असते. युरेनियम-२३५ हे समस्थानिक अणुभंजनासाठी अधिक उपयुक्त असते. मात्र ते युरेनियम-२३८ या समस्थानिकामध्ये अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असते. युरेनियमची ही दोन्ही समस्थानिके विलग करून त्यांचे शुद्धीकरण करणे (युरेनियम एन्रिचमेंट) ही अणुबॉम्ब निर्मितीमधील पहिली पायरी असते.

अणुविखंडनाची शृंखला अभिक्रिया (चेन रिअ‍ॅक्शन) सुरू राहण्यासाठी आवश्यक असलेल्या शुद्ध युरेनियम किंवा अन्य मूलद्रव्याच्या किमान प्रमाणाला किंवा वस्तुमानाला ‘क्रिटिकल मास’ म्हणतात. अणुबॉम्बचा अपेक्षित क्षमतेने स्फोट होण्यासाठी हे क्रिटिकल मास महत्त्वाचे असते. विखंडनयोग्य मूलद्रव्याच्या क्रिटिकल मासचे स्फोटात रूपांतर करण्यासाठी दोन मूलभूत प्रकारची रचना केली जाते. त्यात बंदुकीसारखी रचना (गन टाइप) आणि अंत:स्फोट (इम्प्लोजन) प्रकारांचा समावेश होतो. बंदुकीसारख्या रचनेत क्रिटिकल मासपेक्षा कमी युरेनियमचे दोन तुकडे बंदुकीच्या नळीसारख्या रचनेत लांब ठेवून नंतर वेगाने एकत्र आणून त्यावर न्यूट्रॉनचा मारा करतात आणि स्फोट घडवतात. तर दुसऱ्या प्रकारात प्लुटोनियमचा गाभा अन्य स्फोटकांच्या स्फोटाने दाबून आक्रसला जातो आणि अणुस्फोट घडतो. हिरोशिमावर टाकलेला बॉम्ब युरेनियमच्या बंदुकीसारख्या रचनेचा होता. नागासाकीवर टाकलेला आणि ‘ट्रिनिटी’ चाचणीसाठी वापरलेला बॉम्ब अंत:स्फोट प्रकारचा होता.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com