सॅम्युएल कोल्ट यांचे सुरुवातीचे पॅटरसन रिव्हॉल्व्हरचे मॉडेल फारसे चालले नाही. त्याने हार न मानता त्यांनी या बंदुका थेट सैनिकांनाच विकण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी अमेरिकेचे फ्लोरिडातील स्थानिक सेमिनोल रहिवाशांशी युद्ध सुरू होते. तेथे जाऊन कोल्ट यांनी अमेरिकी सैनिकांना पॅटरसन रिव्हॉॅल्व्हर दाखवल्या आणि काही सैनिकांनी वैयक्तिक शस्त्र म्हणून स्वत:च्या पैशातून त्या विकतही घेतल्या. मात्र त्याने फारसा फरक पडला नाही.

कोल्ट यांना व्यवसाय वाढवण्यासाठी आणि बंदुकांच्या नव्या ऑर्डर मिळवण्यासाठी प्रभावशाली व्यक्तींना मेजवान्या देणे, लाच देणे, महागडय़ा भेटवस्तू देण्याची सवय होती. त्यातून खर्च वाढून कंपनी डबघाईला येऊन अखेर बंद पडली. त्यानंतर काही काळ त्यांनी सुरुंगांचा (माइन्स) व्यवसाय करून पाहिला. त्यातही यश आले नाही. दरम्यानच्या काळात कोल्ट यांनी भांडवल जमवण्यासाठी नावाचे स्पेलिंग बदलून (मूळ उ’३  चे उ४’३ असे करून) औषधी रसायनांचा व्यवसाय केला. त्याबरोबर ‘लाफिंग गॅस’ वापरून करमणुकीचे कार्यक्रम करून पैसा गोळा केला.

कोल्ट यांच्या करिअरला १८४७ साली पुन्हा उभारी मिळाली. तोपर्यंत मेक्सिकन-अमेरिकन युद्ध सुरू झाले होते. तेथे तैनात टेक्सास रेंजर्सच्या तुकडीतील कॅप्टन सॅम्युएल वॉकर यांनी कोल्ट यांचे पॅटरसन रिव्हॉल्व्हर वापरले होते. स्थानिक आदिवासींना अमेरिकी सैनिकांच्या एकाच गोळीच्या बंदुका परिचित होत्या आणि त्या पुन्हा भरण्यासाठी वेळ लागतो हेही माहीत होते. त्यामुळे ते अमेरिकी सैनिकांच्या बंदुका डागून झाल्यानंतर हल्ला करत.  मात्र अशाच एका चकमकीत स्थानिक कोमांचे आदिवासी फसले. त्यांनी नेहमीप्रमाणे हल्ला केला. मात्र या वेळी अमेरिकी सैनिकांकडे कोल्ट रिव्हॉल्व्हर असल्याची माहिती त्यांना नव्हती. त्यामुळे केवळ १५ अमेरिकी सैनिकांनी काही क्षणांत ७० कोमांचे आदिवासींना ठार मारले.

या घटनेने प्रभावित होऊन कॅप्टन वॉकर यांनी न्यूयॉर्कला जाऊन सॅम्युएल कोल्ट यांची भेट घेतली आणि १००० रिव्हॉल्व्हर्सची ऑर्डर दिली. मात्र पॅटरसन मॉडेलमध्ये बदल करण्याच्या सूचना केल्या. त्यांना नवे रिव्हॉल्व्हर पाचऐवजी सहा गोळ्या बसणारे, अधिक शक्तिशाली आणि रिलोड करण्यास सुलभ हवे होते.

त्यानुसार कोल्ट यांनी बंदुकीत बदल करून नवे मॉडेल विकसित केले. कॅप्टन वॉकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याचे नाव वॉकर रिव्हॉल्व्हर ठेवले. बंदुकांच्या व्यवसायात यापूर्वीपासून असलेल्या एली व्हिटनी ब्लेक यांची मदत घेतली. कनेक्टिकटमधील आपले मूळ गाव हार्टफर्ड येथे ‘कोल्ट्स पेटंट फायरआम्र्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ची उभारणी केली आणि कोल्ट वॉकरच्या उत्पादनास सुरुवात झाली. कोल्ट यांनी आपल्या निर्मितीचे पेटंट घेण्याची खबरदारी घेऊन त्याला कायदेशीर संरक्षण दिले. या नव्या वॉकर रिव्हॉल्व्हरला आणखी १००० नगांची ऑर्डर मिळाली आणि कोल्ट यांचे नशीब उजळले.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com