पहिल्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशन्सच्या पुढाकाराने १९२५ साली जीनिवा प्रोटोकॉल हा करार होऊन रासायनकि अस्त्रांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. मात्र तरीही अनेक देशांनी रासायनिक अस्त्रांचा वापर आणि निर्मिती सुरू ठेवली. दुसऱ्या महायुद्धात सर्व प्रमुख देशांकडे टॅब्यून, सरीन, सोमन, मस्टर्ड गॅस आदी रासायनिक अस्त्रे होती; पण त्यांचा युद्धात प्रत्यक्ष वापर झाला नाही.

नाझी जर्मनीने मात्र गॅस चेंबरमध्ये विषारी वायू वापरून ६० लाख ज्यूंचा बळी घेतला. नाझी काळातील हा वंशविच्छेद इतिहासात हॉलोकॉस्ट नावाने कुप्रसिद्ध आहे. हिटलरने ऑश्विट्झ, सिबिबॉर (किंवा सॉबिबॉर) आणि ट्रेब्लेंका अशा ठिकाणांमधील छळछावण्यांत (कॉन्सन्ट्रेशन कँप) लाखो ज्यूंची कत्तल केली. त्यावर ‘एस्केप फ्रॉम सिबिबॉर’, ‘शिंडलर्स लिस्ट’ असे अनेक चित्रपट तयार झाले. या संहारासाठी जबाबदार असलेला अ‍ॅडॉल्फ आइकमन हा नाझी अधिकारी युद्धानंतर वेशांतर करून अर्जेटिनामध्ये लपून राहिला होता. इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेने त्याला अनेक वर्षांनंतर पकडून इस्रायलमध्ये आणले आणि शासन केले याच्या सुरस कथा सांगितल्या जातात.

दुसरे महायुद्ध आणि तत्पूर्वी जपानने चीनवरील आक्रमणात रासायनिक अस्त्रांचा वापर केला. जपानने १९४२ साली चेकियांग आघाडीवर आणि तांगकी या शहरावर हल्ला करताना रासायनिक अस्त्रे वापरली, असा चीनचा आरोप आहे.

अमेरिकेने व्हिएतनाम युद्धात ‘एजंट ऑरेंज’ नावाचे विषारी रसायन वापरले. व्हिएतनामचा बराचसा भाग विषुववृत्तीय सदाहरित आणि घनदाट जंगलांचा आहे. या जंगलांच्या आणि डोंगराळ भूप्रदेशाचा व्हिएतनामच्या गनिमी योद्धय़ांना चांगला वापर करता येत असे. ते अमेरिकी सैन्यावर छापा मारून जंगलात पळून जात. व्हिएतनामच्या गनिमी योद्धय़ांना लपण्यासाठी जंगलांचे आच्छादन मिळू नये म्हणून अजब पण क्रूर शक्कल लढवली. अमेरिकी विमाने आणि हेलिकॉप्टरनी व्हितनामच्या जंगलांवर मोठय़ा प्रमाणात एजंट ऑरेंजची फवारणी केली. एजंट ऑरेंज हे डिफॉलिएंट प्रकारातील रसायन आहे. फॉलिएज म्हणजे झाडांचा पर्णसंभार. एजंट ऑरेंजच्या फवारणीने झाडांची पाने गळून पडत. त्यामुळे व्हिएतनामचे गनीम उघडे पडून मारले जात. मात्र हे रसायन अत्यंत घातक आहे. त्याचे अवशेष आता व्हिएतनाममधील माती, पाणी, भूजल यातून पिके, कोंबडय़ा, बदके, जनावरे यांचे मांस आणि त्याद्वारे मानवी शरीरात पसरले आहे. त्यामुळे आजही व्हिएतनाममध्ये विकलांग मुले जन्माला येतात आणि कर्करोग उत्पन्न होतो. व्हिएतनाम युद्धात एजंट ऑरेंज वापरणाऱ्या अनेक अमेरिकी सैनिकांनाही त्याचा त्रास झाला होता. मात्र अमेरिकी प्रशासनाने त्यांच्या व्यथांकडे दुर्लक्ष केले.

यासह १९८० ते १९८८ दरम्यानचे इराण-इराक युद्ध, बोस्निया आणि कोसोवोतील संघर्ष, सीरियातील संघर्ष आदी ठिकाणी रासायनिक अस्त्रे वापरली गेली आहेत. इराकच्या सद्दाम हुसेनने त्यांच्याच देशातील कुर्द बंडखोरांवर रासायनिक अस्त्रे वापरली होती. जपानमध्ये ‘ओम शिनरीक्यो’  या पंथाच्या शोको असाहारा या नेत्याच्या अनुयायांनी १९९५ साली टोकियो रेल्वेत सरीन या विषारी वायूचा हल्ला केला होता. ही शस्त्रे अण्वस्त्रांच्या तुलनेत बनवण्यास सोपी आणि स्वस्त असल्याने त्यांचा दहशतवादी हल्ल्यांत वापर होण्याचा मोठा धोका आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com