जॉन ब्राऊनिंग आणि विंचेस्टर रिपिटिंग आम्र्स कंपनीची भागीदारी १८९०च्या दशकापर्यंत चांगलीच बहरली होती. विंचेस्टर कंपनीने १७ वर्षांत ब्राऊनिंग यांची ४४ डिझाइन विकत घेतली होती. सन १९०० पर्यंत ७५ टक्के स्पोर्टिग गन्स ब्राऊनिंग यांनी डिझाइन केलेल्या होत्या. मात्र ब्राऊनिंग यांच्या बंदुकांची डिझाइन विकत घेण्यात विंचेस्टर कंपनीची एक गुप्त खेळीही असायची. ब्राऊनिंग यांची डिझाइन्स प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या हाती पडू नयेत म्हणून विंचेस्टर ती सरसकट विकत घेऊन ठेवत असे. त्यातील सर्वच डिझाइन्सची उत्पादने बाजारात येत नसत. सन १९०० मध्ये ब्राऊनिंग यांनी ऑटोमॅटिक शॉटगन डिझाइन केली. ही बंदूक बाजारात उत्तम चालणार याची ब्राऊनिंग यांना खात्री होती. त्याचे डिझाइन विंचेस्टरने विकत घेऊन ते फडताळात पडून राहावे अशी त्यांची इच्छा नव्हती. ब्राऊनिंग या बंदुकीचे डिझाइन विंचेस्टरला देण्यास उत्सुक नव्हते. पण ती वेळ आल्यावर ब्राऊनिंग यांनी विंचेस्टरकडे एकरकमी मानधनाऐवजी कायमची रॉयल्टी देण्याची मागणी केली. विंचेस्टरने त्याला नकार दिला. तेव्हापासून ब्राऊनिंग आणि विंचेस्टर यांचे संबंध कायमचे तुटले.

मग जॉन ब्राऊनिंग ते डिझाइन घेऊन रेमिंग्टन कंपनीकडे गेले. मात्र ब्राऊनिंग भेटीसाठी थांबले असतानाच रेमिंग्टनच्या अध्यक्षांचे (मोर्सेलिस हार्डी) निधन झाले. त्यानंतर ब्राऊनिंग त्यांचे डिझाइन घेऊन थेट युरोपमधील बेल्जियमच्या फॅब्रिक नॅशनल या कंपनीकडे गेले. त्यातून ब्राऊनिंग ऑटोमॅटिक-५ शॉटगनचा जन्म झाला. ती ऑटो-५ किंवा ए-५ नावाने अधिक परिचित आहे. एका वेळी पाच काडतुसे मावणारी ती पहिलीच शॉटगन होती. त्यातून पुढे ऑटोमॅटिक पिस्तुलांच्या निर्मितीचा मार्ग सुकर झाला.

ब्राऊनिंग यांच्या मॉडेल १९०० पिस्तुलाच्या पाच लाख प्रती खपल्या. ब्राऊनिंग मॉडेल १९०० पिस्तुलाच्या ‘वेस्ट पॉकेट’ आणि ‘बेबी ब्राऊनिंग’ नावाच्या आवृत्तीही उपलब्ध होत्या. त्यानंतर ब्राऊनिंग मॉडेल १९१० हे पिस्तूल विकसित झाले. पहिल्या महायुद्धाची सुरुवात करून ८५ लाख जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले पिस्तूल म्हणून ते इतिहासात कुप्रसिद्ध आहे. ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्चडय़ूक फ्रांझ फर्डिनंड आणि त्याची पत्नी सोफी यांची गॅव्रिलो प्रिन्सिप याने २८ जून १९१४ रोजी बोस्नियाची राजधानी सॅरायेव्हो येथे एफएन मॉडेल १९१० .३८० कॅलिबर पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. आणि पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली. यापूर्वी या घटनेत एफएन मॉडेल १९०० .३२ कॅलिबर पिस्तूल वापरले गेल्याचे मानले जात होते.

त्यानंतर बाजारात आलेले ब्राऊनिंग मॉडेल १९११ किंवा एम१९११ हे पिस्तूलही तितकेच गाजले. पहिल्या महायुद्धापासून १९८५-८६ पर्यंत ते अमेरिकी सैन्याचे स्टँडर्ड इश्यू पिस्तूल होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष ड्वाइट आयसेनहॉवर आणि जनरल जॉर्ज पॅटन यांचे ते आवडते पिस्तूल होते.

– सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com