डर्टी हॅरी या १९७०च्या दशकातील हॉलीवूड चित्रपटातील एक गाजलेला प्रसंग. हॅरी कलहान या पोलिसाच्या भूमिकेतील अभिनेता क्लिंट ईस्टवुड दुपारी एका हॉटेलात काही तरी खात असतो. बाहेर अचानक आरडाओरडा ऐकू येतो. शेजारच्या बँकेवर दरोडा पडलेला असतो. हॅरी शिताफीने गोळीबार करून दरोडेखोरांना टिपतो. त्यांपैकी एक दरोडेखोर जखमी होऊन बँकेच्या दारात पडलेला असतो. त्याच्यापासून काही अंतरावरच त्याची बंदूक पडलेली असते. हॅरी त्याच्याजवळ जाऊन त्याच्यावर रिव्हॉल्व्हर रोखतो आणि त्याचा तो गाजलेला डायलॉग म्हणतो.. ‘मला माहीत आहे तू कसला विचार करत आहेस. मी सगळ्या सहा गोळ्या झाडल्या की पाच? पण खरं सांगायचं तर या गोंधळात मीही ते विसरून गेलो आहे. पण ही स्मिथ अँड वेसन .४४ मॅग्नम – जगातील सर्वात शक्तिशाली – रिव्हॉल्व्हर असल्याने  सहजपणे तुझ्या डोक्याच्या चिंधडय़ा उडवू शकते. तेव्हा तूच विचार कर की तू भाग्यवान आहेस की नाही.’ क्लिंट ईस्टवुडच्या खास शैलीतील या डायलॉगनंतर तो गुंड शरण येतो.

स्मिथ अँड वेसन मॉडेल २९ किंवा .४४ मॅग्नम रिव्हॉल्व्हरची ख्याती तशीच होती. अमेरिकेत १९३० च्या दशकात आणि त्यानंतर गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणात वाढली होती. अनेक संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी थॉमसन सब-मशिनगनसारख्या (टॉमी गन) संहारक बंदुका मिळवल्या होत्या. वेगवान मोटारीतून येऊन गोळ्यांचा वर्षांव करून पसार होणाऱ्या गुन्हेगारांना रोखताना पोलिसांच्या पारंपरिक शस्त्रांची ताकद अपुरी पडत होती.

त्याच दरम्यान १९३४ साली स्मिथ अँड वेसन आणि विंचेस्टर कपन्यांमधील एल्मर कीथ आणि फिलिप शार्प यांनी  मिळून .३५७ कॅलिबरचे नेहमीपेक्षा मोठे आणि शक्तिशाली काडतूस विकसित केले होते. त्याला नाव काय द्यावे याची चर्चा सुरू असताना मॅग्नम शॅम्पेनचा विषय निघाला. मॅग्नम शॅम्पेनची बाटली नेहमीच्या बाटलीपेक्षा मोठी असते. हे काडतूसही अन्य काडतुसांपेक्षा मोठे होते. त्यामुळे त्याला मॅग्नम असे नाव देण्याचे ठरले. तेव्हापासून नेहमीपेक्षा मोठय़ा आणि शक्तिशाली काडतुसाला मॅग्नम म्हटले जाते आणि तशी काडतुसे वापरणाऱ्या बंदुकीला मॅग्नम म्हणतात.

या काडतुसावर आधारित अनेक बंदुका तयार झाल्या. पुढे स्मिथ अँड वेसननेही १९५५ साली मॉडेल २९ नावाचे रिव्हॉल्व्हर तयार केले. त्यात .४४ कॅलिबरचे मॅग्नम काडतूस वापरले जायचे. त्यावरून ती रिव्हॉल्व्हर .४४ मॅग्नम म्हणून ओळखली गेली. जगातील सर्वात शक्तिशाली हँडगनमध्ये तिचा क्रमांक खूप वरचा आहे. या बंदुकीने अमेरिकी पोलिसांना गुन्हेगारांना रोखण्याची मोठी शक्ती मिळाली. ती गुन्हेगारांची कर्दनकाळ ठरली. अनेक सुरक्षा दलांनी ती रिव्हॉल्व्हर स्वीकारली. गोळी झाडल्यावर तिचा मागे हाताला बसणारा झटकाही तितकाच जोरदार असे.

स्मिथ अँड वेसन .४४ मॅग्नमची हीच खासियत डर्टी हॅरी चित्रपटांच्या मालिकेत अधोरेखित केली आहे. १९७० च्या दशकात त्यांच्या प्रदर्शनानंतर या बंदुकीची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढली. अनेकांनी डर्टी हॅरीची बंदूक म्हणून हौसेने ती विकत घेतली. १९७५ साली तिची मॉडेल ६२९ नावाची आवृत्तीही बाजारात आली. ती स्टेनलेस स्टीलची आणि क्रोमियमचा मुलामा दिलेली बंदूक होती. तीही ग्राहकांच्या पसंतीस उतरली.  आजही .४४ मॅग्नम रिव्हॉल्व्हर स्मिथ अँड वेसन कंपनीची ‘मॅग्नम ओपस’ बनून राहिली आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com