सुरुवातीच्या काळात स्नायपरसाठी वेगळ्या रायफल अस्तित्वात आल्या नव्हत्या. १९ व्या शतकात बेकर किंवा व्हिटवर्थ यांसारख्या रायफल स्नायपरनी वापरल्या. त्यानंतर विसाव्या शतकात ब्रिटिश ली-एनफिल्ड नंबर ४ आणि जर्मन माऊझर गेवेर ९८ या नेहमीच्या रायफलना दुर्बीण लावून त्या स्नायपर रायफल म्हणून वापरण्यात आल्या आणि त्यांनी चांगली कामगिरी बजावली. रशियान सैन्याने त्यांच्या मोझिन-नगांट या रायफल स्नायपरसाठी वापरल्या.

दुसऱ्या महायुद्धानंतर स्नायपरना त्यांचे विशिष्ट ध्येय साध्य करता यावे यासाठी स्वतंत्र रायफल बनवल्या जाऊ लागल्या. त्यानुसार रायफलच्या रचनेतही बदल केलेले असतात. गोळी झाडताना बंदुकीचे जितके भाग हलतील तितकी रायफल अस्थिर आणि नेम चुकण्याची शक्यता अधिक. त्यामुळे स्नायपर रायफलमध्ये कमीत कमी हलणारे भाग असतील याची दक्षता घेतली जाते. याच कारणासाठी स्नायपर रायफल शक्यतो पूर्ण ऑटोमॅटिक नसतात. त्या जुन्या बोल्ट-अ‍ॅक्शन तंत्रावर आधारित असतात.

स्नायपर रायफलचे बॅरल नेहमीच्या रायफलपेक्षा अधिक जाड आणि वजनाने जड असते. त्यामुळे बॅरलवर गोळी झाडताना निर्माण होणाऱ्या आणि बाह्य़ वातावरणातील उष्णतेचा फारसा परिणाम होत नाही आणि बॅरलचा आकार बदलत नाही. अनेक स्नायपर रायफलचे बॅरल ‘फ्री-फ्लोटिंग’ असते. म्हणजे फायरिंग चेंबरच्या पुढे बॅरल कशालाही जोडलेले नसते. त्याचे अनेक फायदे आहेत. गोळी झाडताना चेंबरमध्ये होणाऱ्या स्फोटामुळे उष्णता निर्माण होते. त्याने बॅरल आणि त्याच्या भोवतालचे धातूचे भाग प्रसरण पावतात आणि रायफलच्या अचूकतेवर परिणाम होतो. फ्री-फ्लोटिंग बॅरलमध्ये हे होत नाही. तसेच नेहमीच्या बॅरलपेक्षा फ्री-फ्लोटिंग बॅरल गोळी झाडल्यानंतरची कंपने अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकते. त्याने रायफल स्थिर राहून अचूकता वाढते.

स्नायपर रायफलचे फिडिंग मेकॅनिझम म्हणजे गोळी भरण्याची प्रणाली अधिक उच्च दर्जाची असते. गोळी चेंबरमध्ये वेडीवाकडी बसत नाही आणि बॅरलवर कमी परिणाम होतो. तसेच गोळी चेंबरमध्ये भरताना आणि झाडताना गोळीवर ओरखडे पडणार नाहीत याची काळजी घेतली जाते. त्याने गोळीच्या वायू-गतिकीय गुणधर्मावर (एरोडायनॅमिक प्रॉपर्टीज) परिणाम होत नाही आणि दीर्घ पल्ल्यातील अचूकता वाढते.

स्नायपरना अधिक अंतरावरील लक्ष्याचा वेध घ्यावा लागतो. आजच्या स्नायपर रायफल साधारण दीड ते दोन किलोमीटपर्यंत अचूक मारा करू शकतात. इतक्या अंतरावरील लक्ष्य व्यवस्थित दिसावे म्हणून स्नायपर रायफलला उच्च दर्जाच्या दुर्बिणी बसवलेल्या असतात. तसेच आणीबाणीच्या वेळी वापरासाठी मेटल साइट्सही असतात.

आधुनिक स्नायपर रायफल ती वापरणाऱ्या सैनिकाच्या शरीररचनेशी पूर्णपणे मिळतीजुळती बनवण्याची सोय असते. रायफलचा बट म्हणजे दस्ता आणि अन्य भाग सैनिकाच्या उंची, जाडीनुसार अनुकूल करता येतात. डोळे आणि रायफलची अलाइनमेंट एकसारखी राहावी म्हणून रायफलच्या दस्त्याला विशेष ‘चिक रेस्ट’ म्हणजे गालांना आधार देणारा भागही असतो.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com