25 April 2019

News Flash

गाथा शस्त्रांची : बिग बर्था, पॅरिस : पहिल्या महायुद्धातील राक्षसी तोफा

पहिल्या महायुद्धात तोफखान्याचा बराच विकास झाला होता.

जर्मन बिग बर्था तोफ

पहिल्या महायुद्धात तोफखान्याचा बराच विकास झाला होता. तोफा अधिकाधिक मोठय़ा आणि संहारक बनत होत्या. त्यात रेल्वे गन नावाचा अजस्र प्रकार अस्तित्वात होता.

जर्मनीतील क्रुप उद्योगसमूहाने १९०० सालच्या आसपास ३५० मिमी व्यासाची तोफ विकसित करण्यास सुरुवात केली होती. आठ वर्षांनंतर जर्मन सैन्याने त्यापेक्षा मोठय़ा तोफेची गरज व्यक्त केली. त्यातून १९१२ साली बिग बर्था नावाच्या तोफेचा जन्म झाला. फ्रेडरिक आल्फ्रेड यांच्या पश्चात त्यांची मुलगी बर्था क्रुप हिच्याकडे कंपनीची सूत्रे आली. तिच्या नावावरून तोफेला बिग बर्था नाव मिळाले असे म्हणतात. त्यानंतर अशा प्रकारच्या मोठय़ा तोफांना बिग बर्था म्हटले जाऊ लागले. वास्तविक तिचे नाव मॉडेल एल/१४ असे होते. या तोफेचे वजन १५९ टन आणि व्यास ४२० मिमी होता. तिचे सुटे भाग इच्छित स्थळी रेल्वेतून वाहून नेऊन जोडावे लागत. त्यासाठी २०० कामगारांना सहा तास लागत. नंतर या तोफेची वाहतुकीस सोपी, थोडी लहान म्हणजे ३९ टनांची आवृत्ती तयार केली गेली. बिग बर्थातून ८२० किलो वजनाचा तोफगोळा १२ किलोमीटपर्यंत डागता येत असे. ही तोफ ८० अंशांच्या कोनातून एका तासात १० गोळे डागू शकत असे. १९१५ साली बेल्जियममधील यीप्रच्या लढाईत या तोफांनी मारा केला होता.

पहिल्या महायुद्धात जर्मन क्रुप या कंपनीनेच तयार केलेली कैसर विल्हेम गेशुट्झ किंवा पॅरिस गन ही तोफ त्याकाळपर्यंत तयार झालेली सर्वात मोठी तोफ होती. तिचे वजन २३२ टन होते आणि बॅरलची लांबी ९२ फूट होती. तिच्या २१० मिमी व्यासाच्या बॅरलमधून ९५ किलो वजनाचा तोफगोळा १३० किलोमीटर इतक्या दूरवर डागता येत असे. ती चालवण्यास ८० सैनिकांचा ताफा लागत असे. तिचे तोफगोळे इतके शक्तिशाली होते की प्रत्येक गोळा डागल्यानंतर तोफेच्या नळीचा आतील व्यास वाढत असे. त्यामुळे पुढचा तोफगोळा त्यापूर्वीच्या गोळ्यापेक्षा मोठा वापरावा लागत असे. असे करत ६५ गोळे डागून झाल्यावर तोफेचे बॅरल बदलावे लागत असे. मार्च ते ऑगस्ट १९१८ या काळात पॅरिस गनने पॅरिसवर ३६७ तोफगोळे डागले. त्यात २५६ पॅरिसवासी दगावले आणि ६२० जण जखमी झाले. युद्धाच्या अखेरीस शत्रूच्या हाती पडू नये म्हणून जर्मनीनेच ही तोफ नष्ट केली.

अशा राक्षसी आकाराच्या तोफांचा प्रत्यक्ष युद्धावर खूप कमी परिणाम झाला. त्यांच्यामुळे झालेल्या प्रत्यक्ष हानीपेक्षा त्यांचा शत्रूवरील मनोवैज्ञानिक परिणाम अधिक होता.

– सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

First Published on April 12, 2018 2:11 am

Web Title: different types of weapons part 42