तोफांचा विषय सुरू आहे आणि बोफोर्सचा उल्लेख झाला नाही, असे भारतात होऊ शकत नाही. १९८० च्या दशकात भ्रष्टाचाराचा समानार्थी शब्द बनलेल्या आणि सरकार खाली खेचणाऱ्या या तोफेची खरी उपयुक्तता भारतीयांना कारगिल युद्धात कळली. भारताने १९८७ साली स्वीडनच्या बोफोर्स एबी कंपनीकडून (आताची बीएई सिस्टिम्स) ‘एफएच-७७ बी’ प्रकारच्या १५०० तोफा खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण दलाली प्रकरणामुळे त्यातील ४१० तोफाच खरेदी केल्या.

कारगिलच्या पर्वतमय प्रदेशात बोफोर्स तोफा प्रभावी ठरल्या कारण त्या हॉवित्झर प्रकारच्या आहेत. अशा तोफांचे गोळे फिल्ड गनसारखे जमिनीला बहुतांशी समांतर मार्गाने प्रवास करत नाहीत. ते बरेच उंचीवरून साधारण अर्धवर्तुळाकार मार्गाने जातात. त्यामुळे ते पर्वतशिखरांवर किंवा त्यांच्या पलीकडे मारा करू शकतात.

पोलाद, रसायने आणि शस्त्रनिर्मितीमधील ३५० वर्षांचा इतिहास असलेली स्वीडनची बोफोर्स कंपनी उत्कृष्ट तोफा तयार करण्यासाठी जगात प्रसिद्ध आहे. बोफोर्स ‘एफएच ७७ ए’ या आवृत्तीपेक्षा ‘एफएच ७७ बी’ या आवृत्तीचा पल्ला थोडा अधिक आहे. ही तोफ ७० अंश कोनातून १५५ मिमी व्यासाचे तीन तोफगोळे १२ सेकंदांत २४ ते ३० किमी अंतरावर डागू शकते. ही सर्व यंत्रणा स्वयंचलित आहे. एकदा जागेवर नेऊन ठेवली की ही तोफ ५० सेकंदांमध्ये कार्यान्वित होते. तिला स्वत:च्या इंजिनाची शक्ती आहे. त्यामुळे शत्रूच्या प्रतिहल्ल्यापासून (काऊंटर-बॅटरी फायर) वाचण्यासाठी ही तोफ मर्यादित अंतरावर हलवता येते. ती वाहून नेण्यास सोयीची आहे.

स्वीडनने एफएच ७७ या वाहनाने ओढून नेण्याच्या (टोड) तोफेची पुढील आवृत्ती म्हणून ‘एफएच ७७ बीडब्ल्यू एल ५२ आर्चर’ नावाची सेल्फ-प्रोपेल्ड तोफ बनवली आहे. ती १५ सेकंदांत ३ तोफगोळे ४० ते ६० किमी अंतरावर डागू शकते. या तोफेची खासियत म्हणजे ‘मल्टिपल राऊंड सायमल्टेनिअस इम्पॅक्ट’ प्रणाली. त्यात तोफेतून वेगवेगळ्या कोनातून, एकामागोमाग-एक ६ तोफगोळे डागून ते एकाच लक्ष्यावर, एका वेळी पाडण्याची सोय आहे. ही तोफ जमिनीवरून ५०० किमीपर्यंत एका दमात प्रवास करू शकते. एक मीटर साचलेल्या बर्फातून प्रवास करू शकते. रेल्वे आणि विमानातून वाहून नेता येते आणि ३० सेकंदांत कार्यान्वित होते.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com