अमेरिकेची १९८० च्या नंतर ज्या तोफांवर मुख्य भिस्त होती त्या एम-१९८ तोफा जगातील चांगल्या तोफांपैकी मानल्या जातात. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जुन्या एम-११४ टोड हॉवित्झर तोफा बदलण्यासाठी १९७० च्या दशकात एम-१९८ या १५५ मिमी टोड हॉवित्झर तोफेवर संशोधन सुरू केले. ही तोफ १९७९ मध्ये अमेरिकी सैन्यात दाखल झाली.

अमेरिकेच्या रॉक आयलंड आर्सेनल कारखान्याने ही तोफ खास पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमच्या मिश्रमातून बनवली होती. त्यामुळे तिची बनावट मजबूत तर होतीच पण तुलनेने वजन हलके होते. ती हेलिकॉप्टर किंवा विमानाने वाहून नेता येत असे आणि पॅराशुटने युद्धभूमीवर उतरवता येत असे. ही तोफ चालवण्यास ९ सैनिक लागत. त्यातून एका मिनिटात ४ तोफगोळे १८ ते २२ किमी अंतरावर डागता येत. १९७८ ते १९९२ या काळात अशा १६०० हून अधिक तोफा तयार केल्या गेल्या आणि त्या अमेरिकेसह अनेक मित्रदेशांनी वापरल्या. लेबॅनन, इराक-कुवेत, अफगाणिस्तान, सीरिया आदी युद्धांत या तोफांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

अमेरिकेने २१ व्या शतकात नव्या तोफांची गरज ओळखून एम-१९८ च्या जागी एम-७७७ या १५५ मिमी हॉवित्झर तोफा विकसित केल्या आहेत. एम-७७७ ची निर्मिती बीएई लँड सिस्टिम्स या ब्रिटिश कंपनीने केली असून त्यात ७० टक्के अमेरिकी बनावटीचे भाग वापरले आहेत. या तोफेने २१ व्या शतकातील तोफांसाठी नवा मापदंड घालून दिल्याचे मानले जाते. त्यावर ब्रिटनमधील व्हिकर्स शिपबिल्डिंग अँड इंजिनिअरिंग लि. (व्हीएसईएल) कंपनीने १९९० च्या दशकात संशोधन सुरू केले. वजनाने हलकी पण प्रभावी तोफ बनवण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. त्यासाठी एम-७७७ च्या बनावटीत प्रामुख्याने टायटॅनियम धातूचा प्रामुख्याने वापर केला आहे. त्याने तोफेचे वजन साधारण ४००० किलो इतके कमी झाले आहे, पण तिची मजबुती वाढली आहे. या तोफा २००५ मध्ये अमेरिकी सैन्यात दाखल झाल्या. त्यानंतर कॅनडासह अनेक देशांनी त्या स्वीकारल्या. या तोफा ७० हून अधिक अंशांच्या कोनात एका मिनिटात ५ तोफगोळे ३० किमी अंतरापर्यंत डागू शकतात. त्यांच्या कमी वजनामुळे त्या डोंगराळ प्रदेशात वाहने किंवा हेलिकॉप्टरमधून सहज वाहून नेता येतात. त्यामुळेच एम-७७७ तोफांच्या खरेदीत भारताने विशेष रस घेतला आहे. चीन व पाकिस्तान सीमेवरील पर्वतमय प्रदेशात त्या अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. गतवर्षी अशा दोन तोफा भारतात दाखल झाल्या असून त्यांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत.

– सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

एम-१९८