19 March 2019

News Flash

व्हायकिंग दर्यावर्दी परंपरा

युरोपच्या उत्तरेकडील स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क आदी देशांचा प्रदेश स्कँडेनेव्हिया म्हणून ओळखला जातो.

युरोपच्या उत्तरेकडील स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क आदी देशांचा प्रदेश स्कँडेनेव्हिया म्हणून ओळखला जातो. या प्रदेशातील नागरिकांचे समुद्राशी पूर्वापार आणि गहिरे नाते आहे. त्यांना व्हायकिंग म्हणून संबोधले जाते आणि इस. ७९० ते १०६६ (आठवे ते अकरावे शतक) हा काळ व्हायकिंग युग म्हणून ओळखला जातो. व्हायकिंग लोकांनी त्यांच्या नौदलाच्या जोरावर इंग्लंडसह युरोपच्या बऱ्याच भागात आणि अटलांटिक महासागरापार मोहिमा केल्या. ते व्यापारी, शासक आणि लुटारू म्हणूनही जाणले जात. बरेचदा व्हायकिंग्ज हा शब्द पायरेट्स किंवा सागरी चाचे अशा अर्थानेही वापरला जातो. त्यांनी केलेल्या मोहिमांच्या यशात त्यांच्या खास नौकांच्या रचनेचा वाटा मोठा आहे.

व्हायकिंग सागरी परंपरेतील बहुतांश नौका कमी खोलीच्या किंवा उथळ ( लो ड्राफ्ट) आणि सपाट तळ असलेल्या होत्या. त्या वारे जोराचे असताना शिडाने आणि अन्य वेळी वल्ह्य़ांनी चालवता येत असत. या रचनेमुळे त्या नौका किनाऱ्याला लावताना बंदर किंवा खोल समुद्राची गरज भासत नसे. परिणामी व्हायकिंग लोक कोणत्याही किनाऱ्यावर नौका उतरवून हल्ले करू शकत. याने त्यांच्या हालचालींत एक प्रकारची लवचिकता आली होती. ती त्यांच्या प्रसाराला उपयोगी पडली. व्हायकिंग्ज खोल समुद्रात शिडांनी नौका चालवत. किनाऱ्याजवळ येताच शिडे उतरवून वल्ह्य़ांनी वेगाने प्रवास करत. किनाऱ्याजवळच्या उथळ भागात पोहोचताच पाण्यात उडय़ा मारून नौका ओढून वाळूत आणत आणि पुढे हल्ला करत. डेन्मार्कपेक्षा नॉर्वेच्या नौका थोडय़ा अधिक खोल असत.

व्हायकिंग्जच्या नौका साधारण  लांब आणि अरुंद असत. त्यातील लांबीने लहान नौका स्नेकीज म्हणून ओळखल्या जात. तर त्याहून अधिक लांबीच्या नौका ड्रकार किंवा लाँगशिप म्हणून ओळखल्या जात. त्यांना ड्रॅगन शिपही म्हटले जायचे. डेन्मार्कमध्ये या नौका स्थानिक समाजाच्या मालकीच्या असत. युद्धाच्या प्रसंगी राजा त्यांना विशिष्ट प्रतिकात्मक बाण पाठवत असे. तो संदेश ओळखून नौका राजाच्या सेवेत युद्धासाठी रवाना केल्या जात. स्नेकीजमध्ये नावाडय़ांच्या २० जोडय़ा तर ड्रकारमध्ये नावाडय़ांच्या ३० जोडय़ा असत.

व्हायकिंग किंवा नॉर्स सागरी परंपरेचे आणखी एक वैशिटय़ म्हणजे त्यांच्या नौकांच्या बांधणीसाठी क्लिंकर पद्धत वापरली जायची. म्हणजे नौकेच्या (हल) बाजूच्या फळ्या एकावर एक चढलेल्या (ओव्हरलॅपिंग) असत. त्याला आधुनिक काळात लॅपस्ट्रेक पद्धत म्हटले जाते. त्याने नौकेला अधिक मजबुती मिळत असे.  याऊलट काव्‍‌र्हेल पद्धतीत फळ्या एकमेकांना जोडून सपाट असतात.  नॉर्स मिथकांनुसार समुद्री सैतानांना हुसकावण्यासाठी नौकांवर भीतीदायक मुखवटे असत.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

First Published on June 14, 2018 12:53 am

Web Title: different types of weapons part 60