युद्धनौकांवरील तोफांमधील सुधारणांमुळे नौकांच्या बांधणीची पद्धतही बदलली. स्मूथ-बोअरऐवजी रायफल्ड बॅरलच्या तोफा अधिक अंतरावर आणि अधिक अचूक मारा करू शकत. तसेच पूर्वी तोफांचे गोळे भरीव लोखंडी किंवा दगडी असत. त्यांना शॉट्स म्हणत. त्याने फारसे नुकसान होत नसे. आता तोफांचे गोळे धातूचे कवच असलेलेोणि आत स्फोटके आणि धातूचे छर्रे असलेलेल असत. त्यांना एक्स्प्लोडिंग शेल्स म्हटले जाते. ते अधिक नुकसानकारक होते. त्यामुळे आतापर्यंतच्या लाकडी बांधणीच्या युद्धनौका शत्रूच्या तोफांच्या माऱ्यापुढे टिकाव धरेनाशा झाल्या. आता युद्धनौकांना अधिक संरक्षण देणे गरजेचे झाले होते. त्यातून आयर्नक्लॅड नावाच्या नव्या प्रकारच्या युद्धनौका अस्तित्वात आल्या.

आयर्नक्लॅड युद्धनौका मूळच्या लाकडी बांधणीच्या असत. मात्र त्यांच्या पाण्यावरील भागाला लोखंडी जाड पत्र्यांचे आवरण लावून अधिक भक्कम केलेले असे. या लोखंडी वस्त्रासारख्या आच्छादनामुळे त्यांना आयर्नक्लॅड असे नाव मिळाले.  सन १८५० च्या आसपास अशा आयर्नक्लॅड युद्धनौकांचे युग अवतरू लागले. फ्रान्सने १८५९ साली बनवलेली ला ग्लुअ नावाची नौका सुरुवातीच्या आयर्नक्लॅड युद्धनौकांपैकी एक होती. तिच्या मूळच्या लाकडी बांधणीवर १२ सेंटिमीटर जाडीच्या लोखंडी लाद्यांचे आवरण होते. हे आवरण त्या काळातील कोणत्याही तोफेचे गोळे रोखण्यास सक्षम होते. १८६१ साली ब्रिटिश रॉयल नेव्हीने एचएमएस (हर मॅजेस्टीज शिप) वॉरियर नावाची आयर्नक्लॅड युद्धनौका तयार केली. तिच्यावर त्या काळातील सर्वात भक्कम चिलखत होते. ब्रिटिशांनी त्याच प्रकारची   ब्लॅक प्रिन्स नावाची युद्धनौकाही बनवली होती. मात्र या दोन्ही युद्धनौकांनी त्यांच्या दहा वर्षांच्या सेवाकाळात एकाही युद्धात भाग घेतला नाही.

अमेरिकी नौदलात १८१६ साली दाखल झालेली फुल्टन ही युद्धनौकाही आयर्नक्लॅड प्रकारातीलच होती. ती तरंगता किल्ला वाटावी असी भक्कम होती. फ्रान्सची ल नेपोलियन ही युद्धनौकाही लोखंडी आवरण असलेली होती.

अमेरिकेतही आयर्नक्लॅड युद्धनौका बनवल्या जाऊ लागल्या होत्या. अमेरिकी गृहयुद्धाच्या काळात दक्षिणेकडील कन्फेडरेट स्टेट्सनी सीएसएस व्हर्जिनिया नावाची आर्यक्लॅड युद्धनौका बनवली होती. तिचा वरचा भाग रणगाडय़ासारखा तिरपा होता. तर उत्तरेकडील युनियन राज्यांनी मॉनिटर नावाची आयर्नक्लॅड युद्धनौका बनवली होती. तिच्या यशानंतर तशाच प्रकारच्या प्युरिटान आणि रोनोके नावाच्या युद्धनौकाही उत्तरेकडील राज्यांकडून बांधण्यात आल्या.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com