गनपावडरच्या शोधानंतर बरीच वर्षे त्याचा वापर प्रामुख्याने चीनमध्ये शोभेच्या दारूकामासाठी होत असे. त्यानंतर साधारण १२ व्या शतकात गनपावडरचा युद्धात वापर सुरू झाला. गनपावडर जळाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात धूर आणि अन्य वायू तयार होतात. हे ज्वलनाचे गुणधर्म वापरून पहिल्या तोफा आणि बंदुका बनवल्या गेल्या.

त्यांची रचना अगदी साधी-सोपी होती. एखाद्या लाकडी जाड काठीवर पुढे धातूची नळी बसवलेली असे. नळीचे मागील टोक बंदिस्त असे तर पुढील टोक मोकळे असे. त्यात प्रथम थोडी गनपावडर भरली जात असे. त्यानंतर धातूची गोळी, लहान दगड किंवा अगदी जाड वाळू असे काहीही भरले जायचे. धातूच्या नळीला मागच्या बाजूला बत्ती देण्यासाठी छोटे छिद्र असे. त्यातून पेटता निखारा किंवा वातीच्या मदतीने या मिश्रणाला बत्ती दिली जात आहे. ते काम बंदूक धरणारा सैनिक किंवा दुसरा सैनिक करत असे. गनपावडरचा नळीत स्फोट होऊन गरम वायू आणि धुराच्या दाबाने गोळी किंवा दगड पुढून वेगाने बाहेर पडत असे.

सुरुवातीच्या अशा हातात धरण्याच्या तोफांना किंवा बंदुकांना हँड कॅनन, हँड गन  अथवा आक्र्विबस (arquebus) म्हणत. त्या डागणाऱ्या सैनिकांना ‘आक्र्विबुसियर्स’ म्हणत. या बंदुका किंवा तोफा अगदीच प्राथमिक स्वरूपाच्या होत्या. त्या जर व्यवस्थित पकडल्या नाहीत तर बत्ती दिल्यानंतर मागे बसणाऱ्या धक्क्य़ाने (मझल किंवा रिकॉइल) लाकडी दांडा सैनिकांच्या छातीत घुसत असे. नळीत गरजेपेक्षा जास्त गनपावडर भरली तर मोठा स्फोट होऊन नळी फुटत असे किंवा तोफ डागणाऱ्या सैनिकांनाच अपाय होत असे.

अशा बंदुकांचा आणि तोफांचा पल्लाही खूप कमी होता. त्यामुळे त्या आजच्या बंदुका-तोफांसारख्या लांब पल्ल्याचे शस्त्र म्हणून न वापरता समोरासमोरच्या लढाईत वापरल्या जात असत. मात्र त्यातून बाहेर पडणारा गरम धातूचा गोळा किंवा दगड शत्रूसैनिकाच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर मोठा आघात करत असे. तसेच या शस्त्रांचा आवाजही भीतिदायक येत असे. त्याचा परिणाम पानिपतच्या पहिल्या युद्धात पाहायला मिळाला.

पानिपतचे पहिले युद्ध १५२६ साली बाबर आणि दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी यांच्यात झाले. बाबरचे सैन्य लोधीच्या तुलनेत खूप कमी होते. मात्र बाबरने ऑटोमन तुर्क सेनानी उस्ताद अली कुली याच्या नेतृत्वाखाली तोफखाना वापरला. त्यात अशा सुरुवातीच्या प्रकारांच्या तोफा आणि बंदुका होत्या. त्यांच्या आवाजाने लोधीच्या सैन्यात मोठय़ा प्रमाणावर असलेले हत्ती बिथरले आणि रणभूमीत सैरावैरा पळू लागले. त्यांच्या पायाखाली लोधीचेच सैनिक चिरडून मेले. भारतात पानिपतच्या पहिल्या युद्धाच्या निमित्ताने प्रथमच अशा तोफा-बंदुकांचा वापर झाला. कमी संख्येच्या बाबरच्या सैनिकांनी लोधीचा पराभव केला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया रोवला. एखाद्या शस्त्राने देशाचा पुरता इतिहास बदलला.

पुढे भारतातही या प्राथमिक तोफा-बंदुका वापरल्या जाऊ लागल्या. त्यांना स्थानिक भाषेत जंबुरका, हस्तनाल, गरनाल, सुतरनाल अशी नावे होती. त्या हातात धरून अथवा हत्ती किंवा उंटावर बसून वापरल्या जात असत.

सुरुवातीला केवळ चीनमध्ये वापरले जाणारे हे तंत्र पुढे मंगोल शासकांच्या काळात मध्य आशिया, अरबस्तान, भारत, आणि युरोपात पोहोचले. युरोपीय सत्तांनी त्यात खूपच सुधारणा केल्या आणि सरस शस्त्रे विकसित केली. त्यांनीच युरोपीय देशांच्या साम्राज्यविस्ताराला मदत केली.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com