राइट बंधूंच्या १९०३ सालच्या विमान उड्डाणाने नैसर्गिक शक्तींवर मानवी विजयाचे नवे दालन उघडले. त्याच दरम्यान अनेक देशांत, अनेक जणांनी विविध प्रकारची यंत्रे हवेत उडवल्याचे दावे केले. त्यापैकी अनेक यशस्वीही झाले होते. पण रीतसर दस्तावेजीकरणाच्या अभावी आणि साम्राज्यवादी शक्तींच्या वर्चस्ववादी भूमिकेमुळे  त्या सर्वानाच न्याय मिळाला नाही.

विमानोड्डाणाची कला अद्याप बाल्यावस्थेत होती. सुरुवातीची विमाने अगदीच तकलादू आणि बेभरवशाची होती. त्यांची बांधणीही साधी म्हणजे लाकूड, कॅनव्हास, दोऱ्या, खांब यांसारख्या सामानापासून केलेली असे. त्यांच्या निर्मिताचा खर्चही कमी होता. पण या नव्या यंत्राचा विकास खूप वेगाने होत गेला. विमानांचे उड्डाण यशस्वी होण्याआधीच या नव्या यंत्राचा युद्धात कसा उपयोग करता येईल याचा विचार सुरू झाला होता. सुरुवातीला विमानाच्या युद्धातील वापराबाबत सैन्यदले साशंक होती. पण पहिल्या महायुद्धापर्यंत किमान टेहळणीसाठी विमाने वापरणे रूढ होऊ लागले होते. टेहळणीच्या जोडीने युद्धभूमीचे छायाचित्रण करणे, त्यातून शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवणे, तसेच तोफांचे गोळे शत्रूवर अचूक डागण्यासाठी मार्गदर्शन करणे (आर्टिलरी स्पॉटिंग) यासाठी विमाने वापरली जाऊ लागली.  त्याने युद्धाला जमीन आणि पाण्यासह तिसरी मिती प्रदान केली.

जर्मनीत काऊंट फर्डिनंड फॉन झेपेलीन यांनी बनवलेली ‘एलझेड’ मालिकेतील एअरशिप प्रवासासाठी आणि युद्धात हवाई टेहळणीसाठी वापरली जात होती. पण त्याचा आकार खूपच मोठा असल्याने ती वापरास फारशी सोयीची नव्हती. त्यासह पहिल्या महायुद्धात (१९१४ ते १९१८) जर्मन रॅम्पलर टॉब हे पक्ष्यासारखे दिसणारे विमान वापरात होते. ब्रिटन, फ्रान्सची रेनाँ एआर, आरएएफ आर. ई. -८, फारमन एचएफ २० ही विमाने टेहळणीसाठी वापरली जात होती. मात्र ही सर्व विमाने बोजड आणि नियंत्रणाला अवघड होती आणि हवाई किंवा जमिनीवरून केलेल्या गोळीबाराला किंवा तोफखान्याच्या माऱ्याला सहज बळी पडत. नंतरचे ब्रिस्टॉल एफ २ बी हे लढाऊ विमान टेहळणीसाठीही प्रभावीपणे वापरले गेले. सुरुवातीचे कॅमेरेही मोठे होते. उघडय़ा विमानातून उंचावरच्या थंड वाऱ्यांत ते वापरताना सैनिकांचे हात गोठून जात. तसेच हाताने कागदावर कच्चे नकाशे काढून टिपणेही करावी लागत.

हवाई टेहळणीने पहिल्या महायुद्धात पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही आघाडय़ांवर महत्त्वाची भूमिका बजावली. पूर्व प्रशियावर टेहळणी करताना जर्मन टॉब विमानांनी रशियाच्या सैन्याच्या हालचाली टिपल्या. त्यामुळे टॅनेनबर्ग येथे प्रत्यक्ष युद्ध झाले तेव्हा जर्मनीने शत्रूच्या कमकुवत जागा ओळखून सैन्य तैनात केले. रशियाचे सैन्य अधिक असूनही जर्मनीने विजय मिळवला. तसेच पॅरिस आणि मार्न येथील लढायांमध्ये ब्रिटिश आणि फ्रेंच टेहळणी विमानांनी अशाच प्रकारे उत्तम माहिती मिळवल्याने जनरल जोसेफ गॅलिनी पॅरिसचा बचाव करू शकले आणि मार्न येथे जर्मन सैन्यावर हल्ला करून त्यांना बेल्जियमच्या आघाडीपर्यंत मागे रेटता आले.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com