दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीच्या हवाई हल्ले आणि पँझर रणगाडय़ांच्या संयुक्त कारवायांवर आधारित ब्लिट्झक्रिगपुढे पोलंड, फ्रान्स आणि युरोपमधील अन्य देशांचा टिकाव लागेनासा झाला. ब्लिट्झक्रिगची भिस्त जमिनीवर पँझर रणगाडय़ांवर तर हवेत युंकर्स (जंकर्स) जेयू ८७ श्टुका डाइव्ह बॉम्बर आणि मेसरश्मिट बीएफ १०९ या विमानांवर होती. हवेत उंचावरून एकदम सरळ खाली सूर मारून लक्ष्यावर अचूक बॉम्ब फेकणारे श्टुका आणि त्याच्या जोडीला जोरात शिळ घातल्यासारखा येणारा सायरनचा आवाज याने शत्रूच्या उरात धडकी भरवली होती. श्टुकावरील या सायरनला जर्मनीने ‘जेरिको ट्रम्पेट’ असे नाव दिले होते. युद्धाच्या पूर्वार्धातील जर्मनीच्या झंझावाती विजयांमध्ये श्टुका विमानांचा सिंहाचा वाटा होता.

नेहमीप्रमाणे हवेत विमान क्षितिजसमांतर पातळीवर ठेवून जमिनीवर केलेली बॉम्बफेक तितकीशी अचूक होत नव्हती. अमेरिकी वैमानिकांनी १९२० च्या दशकात निकाराग्वाच्या सरकारला तेथील डाव्या बंडखोरांविरुद्ध लढण्यासाठी केलेल्या मदतीच्या कारवायांदरम्यान डाइव्ह बॉम्बिंगची पद्धत विकसित केली होती. जर्मन हवाईदलाचे आघाडीचे अधिकारी अर्न्‍स्ट उदेत १९३४ साली अमेरिका दौऱ्यावर गेले असता त्यांनी अमेरिकी नौदलाच्या कर्टिस हॉक डाइव्ह बॉम्बरमधून बॉम्बफेकीचा अनुभव घेतला आणि त्याने ते चांगलेच प्रभावित झाले. त्यांनी जर्मनीत डाइव्ह बॉम्बिंगचा जोरदार पुरस्कार केला. ह्य़ुगो युंकर्स यांच्या कंपनीतील डिझायनर हर्मन पॉलमान यांच्या कल्पनेतून जेयू-८७ श्टुका डाइव्ह बॉम्बर साकारले. ते १९३७ पर्यंत जर्मन हवाईदलात सामील झाले होते.

स्पेनमधील गृहयुद्धात प्रथम श्टुका विमानांचा वापर झाला. त्यात त्यांच्या वापराचे तंत्र सुधारण्यात आले. ब्लिट्झक्रिगसाठीची ही पूर्वतयारी ठरली. सुरुवातीच्या श्टुका विमानांवर ब्रिटिश रोल्स रॉइस इंजिन होते. पण नंतर त्याऐवजी जर्मन युंकर्स युमो इंजिने बसवण्यात आली. सुरुवातीच्या मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करून ते अधिक वेगवान आणि प्रभावी केले गेले.

युंकर्स जेयू ८७ डी-१ हे मॉडेल १९४० साली वापरात आले. त्याचा वेग ताशी ४१० किमी होता आणि त्यावर ४ मशिनगन होत्या. ते १८०० किलो बॉम्ब वाहून नेऊ शकत असे. जर्मनीने एकंदर ५७०० श्टुका विमानांचे उत्पादन केले. पोलंड आणि फ्रान्समध्ये जर्मन हवाईदलाला फारसा विरोध झाला नाही. तेथे श्टुकाची कामगिरी उत्तम होती. त्यांना ‘फ्लाइंग आर्टिलरी’  असे म्हटले जात असे. श्टुका युद्धनौकांवरील हल्ल्यातही प्रभावी होती. ते जानेवारी १९४१ मध्ये ‘इलस्ट्रिअस’ या विमानवाहू नौकेवरील हल्ल्याने सिद्ध झाले. पण ब्रिटनविरोधी कारवाईत जेव्हा श्टुकाचा सामना हॉकर हरिकेन आणि सुपरमरीन स्पिटफायर विमानांशी होऊ लागला तेव्हा त्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. ग्रीस, क्रीट, उत्तर आफ्रिका, माल्टा आणि पूर्व आघाडीवर त्यांची उपयुक्तता कायम होती. युंकर्स जेयू ८८ ही सुधारित आवृत्ती अधिक प्रभावी होती.

मुक्त विचारांच्या ह्य़ुगो युंकर्स यांना मात्र नाझी राजवटीने त्यांची कंपनी आणि खासगी पेटंट्स सरकारजमा करून नजरकैदेत ठवले होते. त्यातच १९३५ साली ७६ व्या वाढदिवशी त्यांचा मृत्यू झाला.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com