16 February 2019

News Flash

हॅरियर जंप जेट

कोरिया आणि व्हिएतनाम येथील युद्धांतून आणखी एक अनुभव आला होता.

विमानवाहू नौकेवर तैनात हॅरियर जंप जेट विमाने

लढाऊ विमानांना उड्डाण करण्यासाठी आणि उतरण्यासाठी लागणाऱ्या लांब धावपट्टय़ा (रनवे) हा १९५० आणि १९६०च्या दशकात लष्करी योजनाकारांसाठी एक मोठा चिंतेचा विषय होता. युद्धक्षेत्रात किंवा दुर्गम भागांत इतक्या लांब धावपट्टय़ा उपलब्ध होणे शक्य नसे. तसेच शत्रूने धावपट्टय़ांवर बॉम्बफेक करून त्या निकामी केल्या तर विमाने हवेत झेपावूच शकत नसत. अरब आणि इस्रायल यांच्यातील १९६७ सालच्या युद्धात हा अनुभव आला होता. या युद्धात इस्रायलने प्रथम हल्ला करून इजिप्तच्या धावपट्टय़ा आणि त्यावरील विमाने नष्ट केली. त्यामुळे इस्रायलचे युद्धात हवाई प्रभुत्व राहिले.

तसेच कोरिया आणि व्हिएतनाम येथील युद्धांतून आणखी एक अनुभव आला होता. प्रत्यक्ष युद्धक्षेत्रापासून हवाईदलाचे विमानतळ आणि धावपट्टय़ा बऱ्याच लांब होत्या. त्यामुळे पायदळाला जेव्हा हवाई मदतीची (एअर सपोर्ट) गरज असे तेव्हा लढाऊ विमाने त्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकत नसत. त्यासाठी धावपट्टय़ा युद्धक्षेत्राच्या जवळ आणि कमी लांबीच्या असणे गरजेचे होते. तसेच कमी जागेत उड्डाण करू शकणारी आणि उतरू शकणारी विमाने असणे जरुरीचे होते. हेलिकॉप्टर कोठूनही उड्डाण करून कोठेही उतरू शकत. पण त्यांच्या वेगावर मर्यादा होती.

या गरजेतून हॅरियरसारख्या कमी लांबीच्या धावपट्टीवरून उड्डाण करू शकणाऱ्या आणि उतरू शकणाऱ्या किंवा सरळ हवेत उड्डाण करू किंवा उतरू शकणाऱ्या (व्हर्टिकल ऑर शॉर्ट टेक ऑफ अ‍ॅण्ड लॅण्िंडग- व्हीएसटीओएल) विमानांचा उदय झाला. मात्र या बाबतीतले सुरुवातीचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले होते. १९६०च्या दशकात ब्रिटनच्या हॉकर सिडले कंपनीने राल्फ हॉकर या तंत्रज्ञानाच्या मदतीने पेगॅसस इंजिन वापरून हॅरियर विमान तयार केले. त्यात जेट इंजिनाच्या चार एग्झॉस्ट नोझलमधून हवेचा झोत जमिनीकडे किंवा जमिनीला समांतर वळवण्याची सोय होती. जेटचा झोत जमिनीकडे वळवून सरळ हवेत उडी घेतल्यासारखे उड्डाण करता येत असे. नंतर हवेत जेटचा झोत जमिनीला समांतर ठेवून विमानाला पुढे दिशा मिळत असे. हे कठीण तंत्रज्ञान साध्य झाल्यानंतर हॅरियर विमाने टेनिस मैदान, कार पार्किंग अशा कोठूनही उड्डाण करू शकत.

ही विमाने विमानवाहू नौकांसाठी अगदी आदर्श होती. त्यातून सी-हॅरियर ही आवृत्ती तयार झाली. ती भारतीय विमानवाहू नौकांवरही होती. ब्रिटनने १९८२च्या फॉकलंड युद्धात अर्जेटिनाविरुद्ध हॅरियर विमानांचा प्रभावी वापर केला. हॅरियरचा वेग ध्वनीपेक्षा थोडा कमी (ताशी १०५८ किमी) असला तरी त्यावर कॅनन, बॉम्ब, रॉकेट्स, क्षेपणास्त्रे असा शस्त्रसंभार होता. सोव्हिएत युनियनने याकोवलेव्ह याक-३६ ही व्हीएसटीओएल प्रकारची विमाने विकसित केली. मात्र ती हॅरियरइतकी प्रभावी ठरली नाहीत. हॅरियर अमेरिकी सेनादलांतही वापरात होती.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

First Published on August 20, 2018 1:04 am

Web Title: different types of weapons part 86