19 October 2019

News Flash

स्टेल्थ तंत्रज्ञानावर आधारित लढाऊ विमाने

आजची हवाई युद्धे मानवी दृष्टीच्या पल्ल्याच्या पलीकडची (बियाँड व्हिज्युअल रेंज - बीव्हीआर) झाली आहेत.

अमेरिकी एफ-२२ राप्टर

आजची हवाई युद्धे मानवी दृष्टीच्या पल्ल्याच्या पलीकडची (बियाँड व्हिज्युअल रेंज – बीव्हीआर) झाली आहेत. ज्या विमानाचे रडार अधिक शक्तिशाली असेल ते शत्रूच्या विमानाला प्रथम पाहून, त्यावर लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र डागून प्रथम नष्ट करू शकते. त्यामुळे आधुनिक लढाऊ किंवा बॉम्बफेकी विमानांसाठी शत्रूच्या रडारपासून लपून राहण्याची क्षमता खूप महत्त्वाची आहे.

एखाद्या विमानाची ‘रडार सिग्नेचर’ म्हणजे शत्रूच्या रडारवर त्याचे दिसण्याचे प्रमाण बहुतांशी विमानाच्या आकारावर अवलंबून असते. रडारच्या लहरी विमानावर आपटून परत जातात आणि त्यापासून दृश्यपटलावर (स्क्रीन) त्याची प्रतिमा तयार होते. विमानावर आपटणाऱ्या शत्रूच्या रडारच्या लहरी परावर्तित होऊन परत न जाता अन्य दिशेला वळवल्या (डिफ्लेक्ट) तर रडारवर दिसणारी विमानाची प्रतिमा खूप अस्पष्ट होऊ शकते. ते साध्य करण्यासाठी विमानाच्या रचनेत ठरावीक कोनातील सपाट पृष्ठभाग वापरले जातात. त्याने रडारच्या लहरी अन्यत्र वळतात.

विमानाची रडारवरील दृश्यमानता कमी करण्यासाठी आणखी एक तंत्र वापरले जाते. त्यात विमानाच्या पृष्ठभागावर रडारच्या लहरी शोषून घेणारा रंग किंवा फरशा (रडार अब्सरॅबट पेंट किंवा टाइल्स) लावल्या जातात. त्यांच्या विशिष्ट रसायनात रडारच्या लहरींच्या ऊर्जेचे रूपांतर उष्णतेत केले जाते आणि ती ऊर्जा विमानात शोषून घेतली जाते.

अमेरिकेचे एफ-११७ नाइटहॉक, एफ-२२ राप्टर, बी-१, बी-२ आणि रशियाचे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान (फिफ्थ जनरेशन कॉम्बॅट एअरक्राफ्ट) ‘एफजीसीए पीएके-एफए’ या विमानांमध्ये हे तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामुळे ही विमाने शत्रूच्या रडारपासून जवळपास अदृश्य राहून हल्ले करू शकतात.

अमेरिकेने १९७५ मध्ये एफ-११७ चा विकास सुरू केला आणि १९८० च्या दशकात ही विमाने हवाई दलात सामील झाली. प्रथम पनामा आणि नंतर इराक येथील संघर्षांत ती वापरली गेली. १९९१ साली इराकविरुद्ध ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्ममध्ये सामील झालेल्या एकूण १९०० लढाऊ आणि बॉम्बफेकी विमानांमध्ये केवळ ३६ (२.५ टक्के) एफ-११७ विमाने होती; पण इराकमधील ३० टक्के लक्ष्ये एकटय़ा एफ-११७ विमानांनी टिपली. कोसोवोतील संघर्षांत १९९९ साली एक एफ-११७ विमान पाडले गेले होते. मात्र स्टेल्थ विमानांचे तंत्रज्ञान अत्युच्च दर्जाचे असून त्यांच्या निर्मितीचा खर्चही अफाट आहे. एका एफ-११७ ची किंमत ४० दशलक्ष डॉलर होती, तर २१ बी-२ विमानांच्या निर्मितीचा खर्च ४५ अब्ज डॉलर होता.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

 

First Published on September 3, 2018 1:07 am

Web Title: different types of weapons part 96