पहिल्या महायुद्धातील लढाऊ विमानांमध्ये एअरको डीएच-२, अल्बाट्रॉस डी ३, ब्रॅडेनबर्ग डी १, फॉकर आइनडेकर, मोरान-सॉनियर मॉडेल एन, न्यूपोर्ट टाइप १७, फाल्झ डी ३, आरएएफ एसई-५, सॉपविथ पप, स्पॅड १३, व्हिकर्स गनबस अशा अनेक विमानांचा समावेश असला तरी फॉकर ट्रायप्लेन, सॉपविथ कॅमल आणि एसई-५ या विमानांचा विशेष उल्लेख करणे गरजेचे आहे. त्यांनी या हवाई युद्धाचे पारडे फिरवण्यात मदत केली.

पहिल्या महायुद्धादरम्यान हवाई युद्धक्षेत्र डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार काम करत होते, असे म्हटले जाते. म्हणजे नवनवीन विमाने खूप वेगाने विकसित होत होती. विमानांचा संकल्पना, ड्रॉइंग बोर्ड, उत्पादन ते युद्धभूमी हा प्रवास एका वर्षांपेक्षा कमी वेळात होत होता. जर्मनीचे अल्बाट्रॉस डी २ हे विमान १९१६च्या दरम्यान युरोपच्या पश्चिम आघाडीवर वर्चस्व गाजवत होते. फ्रान्सने त्यापेक्षा वरचढ न्यूपोर्ट १७ दाखल करताच जर्मनीने अल्बाट्रॉस डी ३ ही सुधारित आवृत्ती दाखल केली. ब्रिटनने सॉपविथ ट्रायप्लेन युद्धात उतरवताच जर्मनीने त्याची नक्कल करून फॉकर द्रायडेकर १ किंवा डीआर १ हे तीन पंख असलेले विमान तयार केले.

एप्रिल १९१७ मध्ये अमेरिकेचा युद्धात प्रवेश झाला आणि जर्मनीची चिंता वाढली. युद्धात वरचष्मा मिळवण्याच्या गडबडीत जर्मनीने डॉर्नियर आणि जंकर्स विमाने विकसित केली. पण मोठय़ा प्रमाणावर उत्पादनासाठी फॉकर डी ७ आणि फाल्झ डी १२ ही विमाने निवडली. प्रथम अमेरिकेचे हवाईदल  सुसज्ज नव्हते, पण त्यांनी लवकरच लिबर्टी इंजिनवर आधारित डीएच-४ ही विमाने बनवली.

जर्मनीच्या फॉकर डीआर १ ट्रायप्लेनवर तीन पंख होते. त्यामुळे त्या विमानाला हवेत चांगला उठाव किंवा ‘लिफ्ट’ मिळत होती. त्यामुळे फॉकर ट्रायप्लेनचा ‘रेट ऑफ क्लाइंब’ म्हणजे हवेत उंची गाठण्याचा वेग चांगला होता. ते अधिक चपळ (मॅनुवरेबल) होते. त्याचा विमानांच्या हवाई लढतीत म्हणजे ‘एरियल डॉगफाइट्स’मध्ये खूप उपयोग होता. त्याचा वेग ताशी १६५ किमी इतका होता. याचा फायदा घेत जर्मन हवाई दलाच्या मानफ्रेड रिख्तहॉफेन यांच्यासारख्या तरबेज वैमानिकांनी (‘एसेस’) एकहाती शत्रूची ८० विमाने पाडली. त्यांच्या आवडत्या लाल रंगाच्या फॉकर ट्रायप्लेनवरून त्यांना ‘रेड बॅरन’ अशी उपाधी मिळाली होती. युद्धाच्या अखेरीस रिख्तहॉफेन यांचे विमान फ्रान्सच्या भूमीत पाडण्यात आले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. फ्रान्सने शत्रुत्व विसरून या जर्मन वैमानिकावर वीराला साजेसे लष्करी इतमामात अंतिम संस्कार केले. त्यांच्या शवपेटीवरील पुष्पचक्रावर लिहिले होते- ‘टू अवर ब्रेव्ह अ‍ॅण्ड रिस्पेक्टेबल एनेमी’. फॉकर विमानांच्या या पराक्रमाला शत्रूने ‘फॉकर स्कर्ज’ असे नाव दिले होते.

ब्रिटनच्या सॉपविथ कॅमल आणि एसई-५ या विमानांनी जर्मनीचे हवाई प्राबल्य कमी करण्यात मोठी भूमिका बजावली. सॉपविथ कॅमलचा वेग ताशी १८२ किमी होता आणि त्यावर व्हिकर्सच्या दोन मशीनगन होत्या. सॉपविथ कॅमलने पहिल्या महायुद्धात शत्रूची सर्वाधिक म्हणजे १२०० हून अधिक विमाने पाडण्याचा बहुमान मिळवला.

सचिन दिवाण sachin.diwan@expressindia.com