28 January 2021

News Flash

तेजस लढाऊ विमान

बंगळूरु येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) कडे १९८३ साली एलसीएच्या रचनेची जबाबदारी सोपवण्यात आली.

भारतीय हवाई दलाकडे मोठय़ा प्रमाणावर असलेल्या रशियन मिग-२१ या विमानांना पर्याय म्हणून १९८०च्या दशकात स्वदेशी बनावटीच्या, वजनाने हलक्या लढाऊ विमानाच्या (लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट – एलसीए) निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यातून तेजस हे स्वदेशी लढाऊ विमान आकारास आले.

बंगळूरु येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) कडे १९८३ साली एलसीएच्या रचनेची जबाबदारी सोपवण्यात आली. १९८४ साली त्यासाठी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीची (एडीए) स्थापना करण्यात आली तसेच देशातील अन्य अनेक प्रयोगशाळा आणि संस्थांचे सहकार्य घेण्यात आले. एलसीएसाठी शक्तिशाली जेट इंजिन तयार करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. त्यासाठी स्वदेशी कावेरी नावाच्या इंजिनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे तेजससाठी अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या एफ-४०४ या आफ्टरबर्निग टबरेफॅन इंजिनची निवड करण्यात आली. भारताने पोखरण येथे १९९८ साली केलेल्या दुसऱ्या अणुस्फोटांनंतर या इंजिनांच्या पुरवठय़ावरही बंधने आली. अशा अनेक कारणांनी प्रकल्पाला विलंब होत गेला. अखेर २००४ साली जनरल इलेक्ट्रिकशी एफ-४०४ जीई-आयएन २० ही इंजिनाची सुधारित आवृत्ती पुरवण्याचा करार झाला. एलसीएचा मूळ सांगाडा (एअरफ्रेम) अ‍ॅल्युमिनियम-लिथियम मिश्रधातू, कार्बन कॉम्पोझिट आणि टायटॅनियमचे मिश्रधातू यातून बनवला आहे. त्यामुळे तो हलका आणि मजबूत आहे. यासह एलसीएसाठी त्रिकोणी आकाराचे पंख (डेल्टा विंग्ज), ग्लास कॉकपिट (अ‍ॅनालॉगऐवजी डिजिटल डिस्प्ले असलेले कॉकपिट), इलेक्ट्रॉनिक फ्लाइट कंट्रोल सिस्टीम, फ्लाय-बाय-वायर यंत्रणा, अत्याधुनिक रडार यंत्रणा आदी व्यवस्था विकसित करणे गरजेचे होते. यातील बहुतांश यंत्रणा देशातच विकसित करण्यात आल्या. आता एलसीएचे साधारण ७० टक्के भाग स्वदेशी बनावटीचे आहेत.

तेजसच्या प्रारूपाचे (प्रोटोटाइप) पहिले यशस्वी उड्डाण ४ जानेवारी २००१ रोजी झाले. त्यानंतरही त्यात अनेक बदल करीत तेजसची मार्क-१ ही आवृत्ती हवाई दलात वापरासाठी तयार झाली. २००३ साली एलसीएचे तेजस असे नामकरण झाले. तेजसची मार्क-१ या आवृत्तीच्या उत्पादनाला परवानगी मिळून २०१६ साली हवाई दलात ४५ व्या स्क्वॉड्रनची उभारणी करून त्यात तेजस दाखल करण्यात आले. सध्या हवाई दलाने अशा ४० विमानांची मागणी नोंदवली आहे. तेजसच्या मार्क-१-ए आणि मार्क-२ या अधिक सुधारित आवृत्ती बनवल्या जात आहेत. त्यात अधिक शक्तिशाली इंजिन, सुधारित यंत्रणा आणि शस्त्रास्त्रे बसवली जात आहेत. तेजसची नौदलासाठीची आवृत्तीही तयार करण्याचा प्रयत्न झाला. तेजस एका इंजिनावर आधारित विमान असून त्याचा कमाल वेग ताशी २२०५ किमी (माक १.८) आहे. त्याचा पल्ला (दुहेरी) १७५० किमी आहे. तेजस ५०० किमीच्या त्रिज्येत (कॉम्बॅट रेडियस) प्रभावीपणे लढू शकते आणि अधिकतम १६००० मीटर (५२,५०० फूट) उंची गाठू शकते. त्यावर कॅनन, विविध प्रकारचे बॉम्ब, क्षेपणास्त्रे आदी शस्त्रसंभार बसवण्याची सोय आहे.

मात्र इतक्या वर्षांनंतरही तेजस अद्याप पूर्णपणे विकसित झालेले आणि युद्धात परिणामकारकता सिद्ध केलेले विमान नाही. त्यामुळे त्याच्या उपयोगितेबद्दल आणि वेळेत उत्पादनाबद्दल हवाई दल साशंक आहे. तसेच त्याची किंमतही काहीशी अधिक, म्हणजे एका तेजस मार्क-१-ए विमानासाठी ४६३ कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे सध्या तातडीची गरज भागवण्यासाठी फ्रान्सकडून राफेल विमाने घ्यावी लागत आहेत.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2018 12:49 am

Web Title: hal tejas multirole fighter
Next Stories
1 एचएफ -२४ मरुत आणि अजित विमाने
2 अरिहंत अणुपाणबुडी
3 आयएनएस कोलकाता
Just Now!
X