पहिल्या महायुद्धानंतर मोठय़ा युद्धनौकांचा म्हणावा तसा दबदबा राहिला नव्हता. त्यांना पाणबुडय़ा आणि विमानवाहू नौकांनी आव्हान देण्यास सुरुवात केली होती. तरीही प्रमुख नौदलांनी त्यांना पूर्णपणे सोडचिठ्ठी दिली नव्हती. व्हर्यायचा तह आणि वॉशिंग्टन करारानुसार नौदलाच्या विकासावर आलेली बंधने जर्मनीने अ‍ॅडॉल्फ हिटलरची सत्ता आल्यानंतर झुगारून देण्यास सुरुवात केली.

जर्मनीने १९३६ साली बिस्मार्क आणि टर्पिट्झ या दोन महाकाय युद्धनौकांच्या बांधणीस सुरुवात केली. १९३९ साली बिस्मार्कची बांधणी पूर्ण झाली तेव्हा ती जगातील सर्वात मोठय़ा युद्धनौकांपैकी एक होती. बिस्मार्कची लांबी साधारण ८०० फूट आणि वजन ४१,७०० टन होते. तिच्यावर १५ इंच व्यासाच्या अजस्र तोफा होत्या. तसेच १२ ते १४ इंच जाड पोलादी चिलखत होते. तरीही २०००हून अधिक नौसैनिकांना घेऊन ती ताशी २९ नॉट्स वेगाने प्रवास करू शकत असे. ब्रिटिश नौदलाला शह देण्यासाठी बिस्मार्क हा हिटलरच्या हातातील हुकमी एक्का होता.

Russia-Ukraine war tanks become obsolete in modern warfare
Russia-Ukraine War: आधुनिक युद्धात रणगाडे निकाली निघालेत का?
dgca fines air india rs 30 lakh after death of elderly passenger due to lack of wheelchair
इस्रायलमधील परिस्थिती चिघळली? तेल अवीवला जाणारी एअर इंडियाची सेवा पुन्हा स्थगित!
Iran attacks Israel four key questions
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आता पुढे काय होणार? अमेरिकेची भूमिका काय?
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?

सप्टेंबर १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि जर्मनीने पहिल्या महायुद्धाप्रमाणेच यू-बोट्सच्या मदतीने अटलांटिक समुद्रात व्यापारी जहाजे बुडवून ब्रिटनची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली. त्याच्या जोडीला बिस्मार्कलाही धाडण्याचा हिटलरचा मानस होता. मे १९४१ मध्ये अ‍ॅडमिरल गुंथर लुट्जेन्स यांच्या नेतृत्वाखाली बिस्मार्क तिच्या पहिल्या मोहिमेवर निघाली. बरोबर प्रिन्झ युजेन नावाची क्रूझर युद्धनौका होती. मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्या मार्गात विघ्ने येत होती. वाटेत नॉर्वेतील बंदरात असताना एका ब्रिटिश टेहळणी विमानाने त्यांना पाहिले आणि छायाचित्रे घेतली. शत्रूला बिस्मार्कच्या हालचालींची माहिती मिळाली आणि एकाच ध्येयाने पछाडले – सिंक द बिस्मार्क. ब्रिटिशांनी नौदलाचा मोठा ताफा बिस्मार्कला नष्ट करण्याच्या कामी लावला.

२४ मे १९४१ रोजी ब्रिटिश नौदलाच्या प्रिन्स ऑफ वेल्स आणि हूड या युद्धनौकांनी आइसलॅण्डच्या किनाऱ्याजवळ बिस्मार्कला गाठले आणि त्यांच्यात पहिली चकमक झडली. त्यात बिस्मार्कच्या तोफांनी हूडचा अचूक वेध घेऊन तिला बुडवले. त्याने चवताळलेल्या ब्रिटनने बिस्मार्कचा पिच्छा पुरवला. त्यात ब्रिटिश नौदलाच्या किंग जॉर्ज-५, रॉडनी या युद्धनौका, व्हिक्टोरियस आणि आर्क रॉयल या विमानवाहू नौका होत्या. बिस्मार्कला सुरुवातीच्या हल्ल्यात पुढील भागात तोफगोळा लागल्याने तिच्यातून इंधनगळती होत होती आणि पूर्ण वेगाने प्रवास करता येत नव्हता. त्यामुळे बिस्मार्क फ्रान्सच्या किनाऱ्याकडे वळवण्यात आली. वाटेत ब्रिटिश युद्धनौकांच्या तोफांनी आणि विमानवाहू नौकांवरील स्वोर्डफिश विमानांवरील टॉर्पेडोंनी बिस्मार्कवर हल्ला केला. त्यात बिस्मार्कला अनेक आघात झाले. अखेर २७ मे रोजी उत्तर अटलांटिक महासागरात बिस्मार्कला जलसमाधी मिळाली. त्याने युद्धनौकांचा एक अध्याय अल्पावधीत संपला आणि हिटलरचे स्वप्नही भंगले.

sachin.diwan@ expressindia.com