28 January 2021

News Flash

अरिहंत अणुपाणबुडी

आयएनएस अरिहंत ही भारताची स्वदेशी बनावटीची पहिली अणुपाणबुडी नोव्हेंबर २०१८ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाली.

आयएनएस अरिहंत ही भारताची स्वदेशी बनावटीची पहिली अणुपाणबुडी नोव्हेंबर २०१८ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाली. ही पाणबुडी अणुशक्तीवर चालते आणि अण्वस्त्रे बसवलेली क्षेपणास्त्रे वाहून नेते. अरिहंतमुळे भारताची जमीन, पाणी आणि हवा अशा तिन्ही माध्यमांतून अण्वस्त्रे डागण्याची यंत्रणा (न्यूक्लिअर ट्राएड) पूर्ण झाली आहे. आता अग्नि, पृथ्वी, ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, मिराज-२००० आणि सुखोई लढाऊ विमाने आणि अरिहंत अणुपाणबुडीवरून भारत अण्वस्त्रहल्ला करू शकतो. युद्धकाळात यातील किमान एक यंत्रणा खात्रीशीरपणे वापरता येऊ शकेल. त्यामुळे भारताची किमान खात्रीशीर अण्वस्त्रे (मिनिमम क्रेडिबल न्यूक्लिअर डिटेरन्स) बाळगण्याची भूमिका पूर्णत्वास गेली आहे. अरिहंत म्हणजे शत्रूचा नाश करणारे साधन किंवा व्यक्ती.

भारताने १९७४ साली पोखरण येथे पहिला अणुस्फोट केल्यानंतर अणुपाणबुडीच्या विकासाची योजना आकार घेऊ लागली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीस अणुपाणबुडीसाठी गोपनीय निधी उपलब्ध करून दिला. १९८४ साली या प्रकल्पाला अधिकृत मान्यता मिळाली आणि १९९८ साली त्यावर प्रत्यक्ष काम सुरू झाले. विशाखापट्टणम येथील शिपबिल्डिंग सेंटरला या कामासाठी ११ वर्षे लागली. त्यात लहान आकाराची अणुभट्टी तयार करण्याचे मोठे आव्हान होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २६ जुलै २००९ रोजी अरिहंतचे जलावतरण केले. ऑगस्ट २०१३ मध्ये अरिहंतवरील अणुभट्टी कार्यान्वित झाली. ऑगस्ट २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस अरिहंत नौदलात सामील झाली.

अरिहंतचे वजन ६००० टन असून तिची लांबी ११० मीटर आणि रुंदी १५ मीटर आहे. ती ताशी २४ नॉट्सच्या वेगाने प्रवास करू शकते आणि समुद्रात ३०० मीटर खोलवर सूर मारू शकते. अणुशक्तीवर चालत असल्याने अरिहंत कित्येक महिने समुद्रात शत्रूला सुगावा न लागता प्रवास करू शकते. तिच्यावर साधारण १०० अधिकारी आणि नौसैनिक राहू शकतात. शत्रूच्या युद्धनौका आणि पाणबुडय़ांचा शोध घेण्यासाठी अरिहंतवर अत्याधुनिक ‘सोनार’ यंत्रणा आणि संवेदक आहेत. अरिहंतवर के-१५ सागरिका या प्रकारची, स्वदेशी बनावटीची १२ अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे बसवता येतात. त्यांचा पल्ला ७०० किमी आहे. त्यासह पाणतीर (टॉर्पेडो) डागण्याची सोय आहे. अरिहंतची मारक क्षमता वाढवण्यासाठी के-४ आणि के-५ ही अनुक्रमे ३५०० आणि ५००० किमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे (सबमरीन लाँच्ड बॅलिस्टिक मिसाइल्स-एसएलबीएम) देशातच विकसित केली जात आहेत. अरिहंत वर्गातील अरिदमन या पुढील अणुपाणबुडीचीही सध्या बांधणी केली जात आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2018 12:54 am

Web Title: nuclear submarine
Next Stories
1 आयएनएस कोलकाता
2 विजयंता आणि अर्जुन रणगाडे
3 पिनाक एमबीआरएल
Just Now!
X