27 February 2021

News Flash

गाथा शस्त्रांची : हमर, कुगर आणि सुरुंगरोधी वाहने

सैन्यासह नागरी जीवनातही त्यांची मागणी वाढत होती.

अमेरिकी हमर किंवा हम्व्ही कुगर माइनप्रुफ व्हेईकल,  आरजी-३१ नायला

जीपच्या यशाने जगभरच्या सेनादलांना चांगलेच प्रभावित केले होते. देशोदेशी जीपच्या अनेक आवृत्ती वापरात आल्या होत्या. सैन्यासह नागरी जीवनातही त्यांची मागणी वाढत होती. सैनिकांना आणि दारूगोळा वाहून नेणे, तोफा ओढून नेणे, दारूगोळा, रसद, औषधे आदी युद्धभूमीवर पोहोचवणे अशी कोणतीही कामे जीप सहज पार पाडत असे. दुसऱ्या महायुद्धातच जीपवर मशिनगन बसवून त्याचा वापर झाला होता. पुढे जीपला थोडे अधिक संरक्षक कवच पुरवून, त्यावर मशिनगन बसवून अधिक सुधारित आवृत्ती तयार झाल्या. कोरिया, व्हिएतनाम आणि अन्य युद्धांत त्यांचा वापर झाला. त्यानंतर अमेरिकेला अधिक सुधारित वाहनाची गरज भासू लागली.

अमेरिकी लष्कराने १९७९ साली जीप आणि लहान ट्रकचे काम करू शकेल अशा शक्तिशाली वाहनाच्या निर्मितीसाठी निकष जाहीर केले. त्याने एम १५१ क्वार्टर टन जीप, एम ५६१ गॅमा गोट आदी वाहने बदलली जाणार होती. त्याला ‘हाय मोबिलिटी मल्टिपर्पज व्हिल्ड व्हेईकल’ (एचएमएमडब्ल्यूव्ही) असे म्हटले होते. त्यानुसार अनेक कंपन्यांनी प्रतिसाद दिला. त्यातून १९८१ साली ‘हमर’ किंवा ‘हम्व्ही’ नावाची शस्त्रसज्ज जीप तयार झाली. विविध सुधारणा होऊन या जीप आजही अमेरिकी सैन्यात वापरात आहेत. त्यांनी पनामामध्ये १९८९ साली ऑपरेशन जस्ट कॉज, इराकमध्ये १९९१ सालचे ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म, सोमालियातील १९९२-९३ सालचे ऑपरेशन रिस्टोअर होप, इराकमधील २००३ सालचे ऑपरेशन इराकी फ्रीडम, अफगाणिस्तानमधील कारवाया आदी संघर्षांत उत्तम कामगिरी केली.

इराकमधील युद्धाच्या अनुभवानंतर अमेरिकेने त्यात सुधारणा करण्यासाठी ‘माइन रेझिस्टंट अ‍ॅम्ब्युश प्रोटेक्टेड’ (एमआरएपी) वाहने बनवण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्यातून २००७ नंतर कैमान, आरजी-३१ नायला, कुगर, मॅक्सप्रो, बुशमास्टर अशी सुरुंगरोधी वाहने तयार झाली. याची खासियत म्हणजे वाहनाचा तळ सपाट ठेवण्याऐवजी इंग्रजी ‘व्ही’ अक्षरासारखा केला आहे. त्याने भूसुरुंगाची ऊर्जा विखुरली जाऊन वाहन आणि त्यातील सैनिकांची वाचण्याची शक्यता वाढते.

सचिन दिवाण – sachin.diwan@ expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 1:52 am

Web Title: rg 31 nyala american hummer cougar armoured vehicle
Next Stories
1 गाथा शस्त्रांची : जीप : युद्धभूमीवरील ‘यांत्रिक घोडय़ा’ची कहाणी
2 गाथा शस्त्रांची : रणगाडय़ाच्या आधारावर विकसित अन्य वाहने
3 गाथा शस्त्रांची : आर्मर्ड पर्सोनेल कॅरियर आणि इन्फन्ट्री कॉम्बॅट व्हेइकल
Just Now!
X