सचिन दिवाण – sachin.diwan@expressindia.com

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस हाती आलेल्या जर्मन व्ही-२ क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि शास्त्रज्ञांच्या मदतीने सोव्हिएत युनियननेही त्यांच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला गती दिली. जर्मन व्ही-२ च्या आधारावर सोव्हिएत युनियनने विकसित केलेले पहिले क्षेपणास्त्र होते आर-१ रॉकेट. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो) देशांनी त्याला एसएस-१ ए स्कूनर असे नाव दिले. ४८ फूट लांबीचे स्कूनर क्षेपणास्त्र २२०० पौंड पारंपरिक स्फोटकांसह १८५ मैल अंतरावर मारा करू शकत असे. रेडिओ संदेशांद्वारे त्याचे दिशादर्शन केले जात असे. स्कूनर क्षेपणास्त्र १९५० साली सोव्हिएत सैन्यात दाखल झाले.

सुरुवातीच्या रॉकेटमध्ये जर्मन शास्त्रज्ञांनी साधारण १०० सुधारणा सुचवल्या. त्यातून सर्गेई कोरोलेव्ह यांच्या नेतृत्वाखाली आर-२ रॉकेट तयार झाले. त्यावरून एसएस-२ सिब्लिंग हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले. ते १९५२ साली सोव्हिएत सैन्यात दाखल झाले. सिब्लिंग क्षेपणास्त्रे ५८ फूट लांब होते आणि ३३०० पौंड पारंपरिक स्फोटकांसह ३७५ मैल अंतरावर मारा करू शकत होते. त्यानंतर सोव्हिएत युनियनने जर्मन तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करून स्वत:चे डिझाइन विकसित केले. त्यातून आर-५ हे रॉकेट आणि एसएस-३ शाइस्टर हे क्षेपणास्त्र आकारास आले. शाइस्टर क्षेपणास्त्र १९५६ साली सोव्हिएत सैन्यात सामील झाले आणि त्याचा पल्ला ७५० मैल इतका होता. शाइस्टर हे सोव्हिएत युनियनचे अण्वस्त्रे वाहून नेऊ शकणारे पहिले क्षेपणास्त्र होते. त्यावर ८० किलो टन क्षमतेचे अण्वस्त्र किंवा रासायनिक अस्त्रे बसवता येत. नंतर ही क्षमता १ मेगा टनपर्यंत वाढवण्यात आली.

त्यापुढील जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे सोव्हिएत क्षेपणास्त्र होते आर-१२ रॉकेट किंवा एसएस-४ सँडेल. या क्षेपणास्त्राच्या चाचण्या १९५५ मध्ये सुरू झाल्या आणि १९५९ साली ते सैन्यात दाखल झाले. सँडेल क्षेपणास्त्र २ ते २.३ मेगाटनची अण्वस्त्रे घेऊन १२५० मैलांवर मारा करू शकत असे. हे सोव्हिएत युनियनचे बरेच खात्रीशीर आणि अनेक वर्षे सेवेत राहिलेले क्षेपणास्त्र होते. अशी ६०० हून अधिक क्षेपणास्त्रे तयार करण्यात आली. १९६२ साली क्युबातील क्षेपणास्त्र संकटांदरम्यान एसएस-४ सँडेल क्षेपणास्त्र विशेष गाजले. सोव्हिएत युनियनने हीच क्षेपणास्त्रे क्युबात तैनात केली होती. त्यांच्या माऱ्याच्या टप्प्यात अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक शहरे येत होती. त्यावरून अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये तणाव वाढून जग अणुयुद्धाच्या उंबरठय़ावर आले होते. अखेरच्या क्षणी सोव्हिएत युनियनने नमती भूमिका घेतल्याने अनर्थ टळला.

याच मालिकेतील एसएस-५ स्कीआन हे क्षेपणास्त्र आर-१४ रॉकेटवर आधारित होते. ते २ मेगाटनच्या अण्वस्त्रासह २८०० मैलांवर मारा करू शकत होते. स्कीआन १९६१ साली सोव्हिएत सैन्यात दाखल झाले. त्याने सोव्हिएत युनियनच्या मारक क्षमतेत मोठी भर पडली. त्याच्या सुधारित आवृत्तीत ३०० किलो टनची दोन अण्वस्त्रे वाहून नेण्याची सोय करण्यात आली होती.