News Flash

ढाली आणि चिलखते

शस्त्रे आणि त्यांच्यापासून बचाव करण्याच्या पद्धती विकसित होणे ही समांतर आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

शस्त्रे आणि त्यांच्यापासून बचाव करण्याच्या पद्धती विकसित होणे ही समांतर आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सुरुवातीला लाकडी चौकटीवर मृत जनावरांचे कातडे लावून, तसेच लाकडी फळ्यांच्या ढाली बनवल्या गेल्या. भारतात कासवाच्या पाठीपासून बनवलेल्या ढाली वापरल्या जात. प्राचीन ग्रीक सैनिक जी लाकडाची गोलाकार ढाल वापरीत तिला ‘आस्पिस’ म्हणत. त्याचाच रोमन प्रकार म्हणजे ‘होप्लॉन’. या ढालीवरून त्या सैनिकांना ‘होप्लाइट’ असे नाव पडले. रोमन योद्धय़ांमध्ये पुरुषभर उंचीची, आयताकृती आणि काहीशी अर्धवर्तुळाकार वाकवलेली ‘स्कुटम’ नावाची ढाल वापरात होती. रोमन सैनिकांचे गट या ढाली बाजूंनी आणि डोक्यावरून एकत्र धरून ‘टेस्टय़ुडो फॉर्मेशन’ किंवा ‘टॉरटॉइज फॉर्मेशन’ तयार करत असत. कासवाच्या पाठीसारखी दिसणारी ही सैनिकांची एकत्र रचना भेदणे शत्रूसाठी आव्हान असे. घोडेस्वार लहान वर्तुळाकार ‘परमा’ नावाची ढाल वापरत.

प्राचीन काळी ग्रीस आणि मॅसिडोनियामध्ये (सिकंदर किंवा अलेक्झांडरचा प्रदेश) ‘लिनोथोरॅक्स’ नावाचा चिलखताचा प्रकार वापरला जात असे. त्यात ‘लिनन’ या प्रकारच्या कापडाच्या लांब पट्टय़ा डिंकाने एकावर एक चिकटवून शरीराचा वरचा भाग (थोरॅक्स) झाकणारे संरक्षक कवच तयार केले जात असे. तलवारी व बाणांच्या हल्ल्यांपासून ते प्रभावी असे. मात्र उन्हात डिंक तापून ते सैनिकांसाठी असह्य़ बनत असे. याशिवाय चामडे, कापडावर जोडलेले शंखशिंपले आदी कठीण वस्तू यांच्यापासूनही चिलखते तयार केली जात.

धातुकलेचा विकास झाल्यानंतर ब्राँझ, लोखंड, पोलाद आदींपासून ढाली आणि चिलखते बनवली जाऊ लागली. युरोपमधील सेल्टिक लोकांनी सर्वप्रथम ख्रिस्तपूर्व ५०० सालाच्या आसपास ‘चेनमेल’ म्हणून ओळखले जाणारे धातूच्या छोटय़ा-छोटय़ा कडय़ा एकत्र जोडून केलेले जाळीदार चिलखत तयार केले. त्याचा जगभर प्रसार झाला. त्याचा भेद करणारे बाण आणि कुऱ्हाडी वापरात आल्यानंतर लोखंडी जाळीवर महत्त्वाच्या अवयवांना वाचवण्यासाठी धातूचे पत्रे लावले जाऊ लागले. पुढे त्यांनाही भेदणारी शस्त्रे वापरात आली. अशा चिलखतात काख, कमरेचा भाग, हातापायांचे सांधे, मान आदी भाग हल्ल्यासाठी काहीसे सोपे असत. तेथून बारीक टोकाच्या तलवारी खुपसून शत्रूला मारले जात असे. नंतरच्या काळात हत्ती-घोडे आदी प्राण्यांनाही चिलखत घातले जाऊ लागले. मात्र चिलखत जसजसे अधिक जाड आणि सर्वागाला झाकणारे बनले तसतशी सैनिकांची हालचाल मंदावली.

गनपावडरच्या शोधानंतर अस्तित्वात आलेल्या बंदुका आणि तोफांनी अशा चिलखतांना कालबाह्य़ बनवले. त्याने युद्धाचे तंत्रच बदलून टाकले. तरीही चिलखताचा विकास काही थांबला नाही. बंदुकीच्या गोळ्या आणि बॉम्ब-तोफगोळ्यांच्या कवचापासून आणि छऱ्र्यापासून संरक्षण करणाऱ्या नव्या चिलखतांचा शोध लागला. यात कापड उद्योगात झालेल्या संशोधनाचा फायदा झाला. केवलार, ट्वारॉन आणि डायनिमा यांच्यासारखे कृत्रिम धागे चिलखत बनवण्यासाठी वापरले जाऊ लागले. ते इतके शक्तिशाली असतात की शेकडो किलोमीटर प्रति तास वेगाने येणाऱ्या बंदुकीच्या गोळ्या आणि बॉम्बमधील छर्रे आणि तोफगोळ्यांचे धारदार कपचे रोखू शकतात. अलीकडे इराक, अफगाणिस्तान आणि अन्यत्र झालेल्या युद्धांमध्ये या चिलखतांनी त्यांची उपयुक्तता सिद्ध केली.

sachin.diwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 3:47 am

Web Title: shields and armor weapon history
Next Stories
1 क्रॉसबो
2 धनुष्य-बाण
3 गाथा शस्त्रांची : वेढा फोडणारी आयुधे
Just Now!
X