मानवी संस्कृतीच्या सुरुवातीला वल्ही आणि शिडाच्या जोरावर जहाजे हाकली जात असल्यापासून आज अणुशक्तीवर चालणाऱ्या महाकाय युद्धनौकांपर्यंत नौदलात अनेक स्थित्यंतरे झाली. या बदलांत तीन घटन महत्त्वाचे आहेत. नौका बनवण्याचे सामान आणि ती तरंगती ठेवण्याचे तंत्र (फ्लोटिंग), नौकेला गती देणारे तंत्र (प्रॉपल्शन) आणि नौकेवरील शस्त्रसंभार (फायर पॉवर).

या तिन्ही अक्षांवर गेल्या शेकडो वर्षांत मोठे बदल झाले. मात्र नौदलाची मूलभूत कार्ये फारशी बदललेली नाहीत. व्यापारी मार्गाचे आणि जहाजांचे, किनारपट्टीचे, सागरी संपत्तीचे आणि जमिनीचे रक्षण करणे, गस्त घालणे आणि युद्धाच्या प्रसंगी समुद्रावर शत्रूशी दोन हात करणे आणि शत्रूच्या भूमीवर सैन्य उतरवणे. ही कार्ये कशी पार पाडली जातात त्याच्या पद्धतीत बदल होत गेले. तंत्रज्ञानातील प्रगतीनुसार युद्धनौकांचे प्रकारही बदलत गेले. वाफेच्या शक्तीच्या शोधानंतर युद्धनौकांना नवे बळ मिळाले आणि त्यांचा पल्ला वाढला. त्यानंतर डिझेल इंजिनांनी नौकांना आणखी शक्ती मिळवून दिली. त्यापुढे गॅस टर्बाईन इंजिन आणि अणुभट्टी यांनी वेगळी क्रांती केली. नौका बनवण्यासाठीच्या सामानात लाकूड, लोखंड, पोलाद, फायबरग्लास असे बदल होत गेले. त्यांना संरक्षण पुरवण्यासाठी आता त्यावर केवलारसारख्या शक्तिशाली कृत्रिम धाग्यांचा वापर केला जात आहे. शस्त्रांचा विचार करता तलवारी, धनुष्यबाण, भाले, कुऱ्हाडींपासून बंदुका-तोफांकडे झालेले स्थित्यंतर आणि त्यानंतर लढाऊ विमाने, अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे यांच्यापर्यंत झालेला प्रवास मोठा आहे.

या बदलांनी युद्धनौकांची रचना, स्वरूप आणि युद्धतंत्रात बदल होत गेले. सुरुवातीला एकमेकांजवळ जाऊन दुसऱ्या युद्धनौकेवर उतरून स्वारी करावी लागत होती. मग बंदुका-तोफांना लाइन-ऑफ-बॅटल हा प्रकार अस्तित्वात आला आणि शिप ऑफ द लाइन असा नौकांचा प्रकारही निर्माण झाला. त्याचे सुधारित रूप आधुनिक बॅटलशिप आणि ब्रॉडसाइड तोफांमध्ये पाहायला मिळाले. नंतर टॉर्पेडो आणि क्षेपणास्त्रांमुंळे युद्धनौकांच्या समोरासमोरील चकमकी बंद झाल्या. तोफांचा वापर किनाऱ्यावरील हल्ल्यांपुरता मर्यादित झाला. पाणबुडय़ा आणि विमानांचा सामना करण्यासाठी विनाशिका आणि फ्रिगेटचे स्वरूप बदलले. अणुपाणबुडय़ा आणि विमानवाहू नौकांनी सागरी युद्धाचा आयाम आणखी विस्तारला. त्याला अ‍ॅम्फिबियस असॉल्ट शिप, माइनस्वीपर्स, सप्लाय डेपो शिप आदींची साथ मिळून अन्य प्रदेशात सैन्य उतरवण्याच्या कारवाया सोयीच्या झाल्या.   आज नौदलाच्या कारवाया अधिकाधिक एकत्रित (जॉईंट ऑपरेशन्स) बनल्या आहेत.

सचिन दिवाण

sachin.diwan@ expressindia.com