सचिन दिवाण

अमेरिकेने १९८०च्या दशकात स्ट्रॅटेजिक डिफेन्स इनिशिएटिव्ह (एसडीआय किंवा स्टार वॉर्स) कार्यक्रम सुरू केला तोपर्यंत रडार, लेझर किरण आणि संवेदक (सेन्सर) आदी क्षेत्रांत पुरेशी प्रगती झाली होती. त्यांचा वापर करून शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच पाडणे शक्य होते. अर्थात ही प्रणाली १०० टक्के खात्रीशीर कधीच ठरली नसती. तरीही अमेरिकेत त्यावर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक होऊ लागली होती. त्याने सोव्हिएत युनियनची अस्वस्थता वाढली होती. त्यापूर्वी म्युच्युअली अ‍ॅशुअर्ड डिस्ट्रक्शन (मॅड) संकल्पनेनुसार एकाने हल्ला तर दुसऱ्याकडून त्याचाही संपूर्ण विनाश होण्याची खात्री होती. त्यामुळे जगात सत्तासंतुलन राखले गेले होते. आता सोव्हिएत क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रे निष्प्रभ करण्याची शक्यता निर्माण झाल्याने हे संतुलन ढळले. त्यावर सोव्हिएत युनियनच्या नेत्यांनी बरीच टीका केली आणि स्वत:चे तशाच प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली.

ह्य़ूज रिसर्च लॅबोरेटरीचे थिओडोर मैमन यांनी १९६० मध्ये प्रथम लेझर तयार केले. लाइट अँप्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन या शब्दसमूहाचे लेझर हे लघुरूप आहे. नेहमीचे प्रकाशकिरण दूरवरच्या प्रवासात एकत्र न राहता पसरतात. त्यामुळे त्यांची शक्ती विखुरली जाते. लेझर किरण हे एकत्रित राहतात आणि दूरच्या प्रवासातही विखुरले जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यात बरीच शक्ती सामावलेली असते. लेझर किरण एकाच लहान ठिपक्यावर केंद्रित करता येतात. या गुणधर्मामुळे लेझर किरणशलाका वापरून अनेक गोष्टी साध्य करता येतात. धातू किंवा दगड अचूक कापता येतात. याचाच पुढे शस्त्रांसाठी वापर करण्याची कल्पना पुढे आली.

लेझर किरण थोडे कमी तीव्रतेने सैनिकांच्या डोळ्यांवर सोडल्यास त्याने तात्पुरते किंवा कायमचे अंधत्व येऊ शकते. लेझर किरणशलाका विमाने, कृत्रिम उपग्रह, इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आदीवर सोडल्यास त्यांच्या कामकाजात बिघाड होऊ शकतो. लेझर किरणशलाका वापरून दूरवरची क्षेपणास्त्रे किंवा विमाने पाडण्याचे तंत्रज्ञानही विकसित केले जात आहे. त्याला अद्याप पूर्ण यश लाभलेले नाही. लेझर गायडेड बॉम्बमध्ये बॉम्बला अपेक्षित लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लेझर किरणांचा वापर केला जातो. त्याची अचूकता सर्वाधिक असते. सध्या युद्धनौकांवर शत्रूच्या विमाने आणि क्षेपणास्त्रांपासून बचावासाठी लेझर किरणांवर आधरित शस्त्रे बसवली जात आहेत.

लेझर किरणांचे अनेक स्रोत आहेत. अमेरिकेने एसडीआय प्रकल्पात प्रथम एक्स-रे (क्ष-किरण) लेझर वापरण्याचा विचार केला. अणुस्फोटातून मोठय़ा प्रमाणावर क्ष-किरण उत्पन्न होतात. त्यांचे एकत्रीकरण करून लेझर तयार करता येतील आणि त्यांचा बारीक झोत क्षेपणास्त्रे किंवा अण्वस्त्रांवर सोडून ती नष्ट करता येतील अशी कल्पना होती. त्यासह रासायनिक , स्थायू पदार्थ, वायूरूप आदी स्रोतांपासून लेझर तयार करता येतात. त्यांना केमिकल लेझर, सॉलिड स्टेट लेझर, गॅस लेझर म्हणतात.

या लेझरचे स्रोत जमिनीवर, पाण्यात (जहाजांवर) किंवा अंतराळात भ्रमण करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांवर बसवून त्यांचा शस्त्रासारखा वापर करण्याची स्टार वॉर्स प्रकल्पात योजना होती. लेझरचे उपग्रहांवर बसवता येतील इतके लहान स्रोत तयार करणे हेदेखिल एक आव्हान होते. तसेच एका स्रोतापासून निर्माण झालेले लेझर किरण अंतराळात ठेवलेल्या मोठय़ा आरशांवरून परावर्तित करून जगात हव्या त्या ठिकाणी वळवता येतील आणि त्या भागातून येणारी क्षेपणास्त्रे पाडता येतील अशीही कल्पना होती. लेझरचा शस्त्र म्हणून कितपत वापर होऊ शकेल याबद्दल शंकाही उत्पन्न केल्या जातात.

sachin.diwan@ expressindia.com