सी-किंग हे हेलिकॉप्टर अमेरिकेच्या सिकोस्र्की एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनने १९५७ साली प्रामुख्याने पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर म्हणून विकसित केले. सोव्हिएत युनियनच्या पाणबुडय़ा शोधणे आणि त्या नष्ट करणे हे सी-किंगचे प्रमुख काम. मात्र त्याच्या विविध आवृत्ती शत्रूच्या हल्ल्याची आगाऊ सूचना देणे (अर्ली वॉर्निग सिस्टीम), सैनिक आणि सामानाची वाहतूक करणे, बचावकार्य तसेच लढाऊ भूमिकेतही वापरल्या जातात.

ब्रिटनची वेस्टलँड ही कंपनी अनेक वर्षांपासून अमेरिकी सिकोस्र्की कंपनीची हेलिकॉप्टर परवाना घेऊन तयार करत आली आहे. त्यानुसार ब्रिटिनमध्येही सी-किंग हेलिकॉप्टरचे उत्पादन होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १९६५ सालच्या युद्धानंतर पाकिस्तानने आधुनिक पाणबुडय़ा खरेदी करण्यावर भर दिला. त्या शोधून नष्ट करण्यासाठी भारताने ब्रिटनकडून सी-किंग हेलिकॉप्टर खरेदी केली. १९७१ च्या बांगलादेशमुक्ती युद्धापर्यंत ती भारतीय नौदलात दाखल होऊ लागली होती. मात्र तेव्हा त्यांचा फारसा वापर झाला नाही. त्यानंतर भारतीय नौदलात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. अमेरिका, ब्रिटन, भारतासह अर्जेटिना, ब्राझील, डेन्मार्क, इराण, इराक, इजिप्त, सौदी अरेबिया, पेरू, मलेशिया, स्पेन, कॅनडा, बेल्जियम, नॉर्वे, जर्मनी या देशांच्या सैन्यदलांत सी-किंग हेलिकॉप्टर कार्यरत आहेत. सी-किंग हेलिकॉप्टरचा वापर काही काळ अमेरिकी अध्यक्षांच्या प्रवासासाठीही (मरीन वन) केला जात होता.

सी-किंग ताशी २४५ किमी वेगाने १२३० किमी प्रवास करू शकते. डॉप्लर रडार, सोनार, चुंबकीय संवेदक आदी प्रणालींमुळे सी-किंग पाणबुडी शोधण्यात वाकबगार आहे. पाणबुडय़ा आणि युद्धनौका नष्ट करण्यासाठी त्यावर टॉर्पेडो, रॉकेट्स,  सी-ईगल क्षेपणास्त्रे आहेत. त्यावरील रडार शत्रूच्या हल्ल्याची आगाऊ सूचना देऊ शकतात. सी-किंग २२ ते २९ सैनिकांना त्यांच्या शस्त्रास्त्रांसह युद्धभूमीवर वाहून नेऊ शकते. त्यामुळे इजिप्तने त्यांचा खास कमांडो पथकांसाठी वापर केला आहे.

ब्रिटन आणि अर्जेटिना यांच्यातील १९८२ सालच्या फॉकलंड युद्धात सी-किंग हेलिकॉप्टरनी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यासह १९९१ सालचे कुवेतच्या मुक्तीसाठीचे आखाती युद्ध, १९९३ साली बाल्कन आणि कोसोवो संघर्ष, २००३ साली इराकवरील आक्रमण आदी युद्धांत त्यांचा वापर झाला. एक बहुउद्देशीय हेलिकॉप्टर म्हणून सी-किंगची ख्याती आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com