23 February 2019

News Flash

शहरबात : ‘सण’ नव्हे, ‘फेस्टिव्हल’!

मुंबईतील सार्वजनिक उत्सव ही शिवसेनेची राजकीय प्रयोगशाळा मानली जाऊ लागली.

ब्रिटिश सत्तेशी लढा देण्यासाठी लोकांची मानसिकता तयार करण्याकरिता प्रथम लोकांना संघटित केले पाहिजे आणि त्यासाठी काही तरी निमित्त साधले पाहिजे, हे ओळखून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, पण पुढे उत्सव परंपरेचा अर्थच बदलून जाईल आणि केवळ स्वार्थकारण फोफावेल, हे त्यांच्या स्वप्नातही नसावे. विधायक कार्यासाठी जनसंघटन घडविण्याचे माध्यम म्हणून सुरू झालेले अनेक सार्वजनिक उत्सव बघता बघता बाजारपेठांच्या हातात गेले आणि या बदलाचा गंधदेखील न जाणवता, एखाद्या संथ विषप्रयोगासारखा हा बदल सामान्य उत्सवप्रिय जनतेच्या मनामनात भिनत गेला. राजकारण आणि व्यापारी वृत्तीचे कॉर्पोरेट अर्थकारण यांनी हातात हात घालून अत्यंत जाणीवपूर्वक तयार केलेल्या साखळीत उत्सवप्रिय मानसिकता पुरती जखडली गेली आणि उत्सव हा राजकारण आणि कोणत्याही ‘थरा’च्या अर्थकारणाचा आधार बनला.

गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो किंवा रक्षाबंधनाचा सण असो, गर्दीने फुलणाऱ्या बाजारपेठा हीच सणांच्या चाहुलीची पहिली खूण झाली आहे. चित्रवाणी वाहिन्यांवर आणि वृत्तपत्रांमध्येही जाहिरातींचा वर्षांव सुरू होतो आणि ‘मुहूर्ता’च्या संकल्पनेचा पगडा असलेली भाविक मने त्याला हुरळून खरेदीच्या मोहाने खिशात हात घालतात. पूर्वी सणांना संस्कृतीचे कवच होते. प्रत्येक सणाचे एक सांस्कृतिक वेगळेपण असायचे. आता बाजारपेठांनी सणांचा कब्जा घेतल्यानंतर, सण म्हणजे केवळ ‘खिसा आणि खरेदी’ असे नवे समीकरण तयार झाले. सणांचे हे महत्त्व अगदीच झिडकारून टाकता येणार नसले, तरी बाजारपेठांच्या गळेकापू आक्रमकपणामुळे सणांचे सांस्कृतिक व पारंपरिक महत्त्व मात्र हळूहळू संपत चालले आहे. आता तर, जनसंघटनांचा उद्देश केव्हाच मागे पडला आहे आणि केवळ भक्तिभावनांचा फायदा उठवत स्वार्थ साधण्याची स्पर्धा असे उत्सवांचे स्वरूप होऊ लागले आहे. या स्पर्धेशी सामान्य माणसाला थेट असे काहीही देणेघेणे नसते.
सार्वजनिक उत्सवांमध्ये जनता भक्तिभावाने सहभागी होते, हे जाणवू लागल्यानंतर याचा फायदा घेण्याची युक्ती बहुधा राजकीय पक्षांना प्रथम सुचली. मुंबईतील सार्वजनिक उत्सव ही शिवसेनेची राजकीय प्रयोगशाळा मानली जाऊ लागली. जनतेच्या भाविकतेला भावेल अशा रीतीने उत्सवाची आखणी करून जनतेचा विश्वास संपादन केल्याने, नेतृत्वाची माळ गळ्यात पडणे सोपे होते, हे सेनेच्या नेतृत्वाने जाणले आणि मुंबईत राजकीय बस्तान बसविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवांचा आधार घेतला. याचा राजकीय फायदा मिळू शकतो, हे सिद्ध होऊ लागल्यावर अन्य राजकीय पक्षांचे गल्लीबोळांतील नेतेही भक्तिभावनेवर स्वार होण्यासाठी सज्ज झाले. गल्लीबोळांत झळकणारे हे प्रसिद्धी फलक त्याच क्षणी मनावर फारसा परिणाम घडवत नसले, तरी हे प्रसिद्धी तंत्रच पुढे अनेकांना मोठेपण मिळवून देणारे ठरले.
शिवसेनेच्या हातात गेलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव आपल्यालाही लाभदायक ठरावा अशी सुप्त इच्छा असलेले अनेक जण पुढे या उत्सवाच्या आधाराने आपले आपले बस्तान बसविण्यासाठी सरसावले. यामध्ये काँग्रेसचेही लहानमोठे अनेक पुढारी होते. भारतीय जनता पक्षालादेखील या सार्वजनिक उत्सवांचे राजकीय महत्त्व उमगले आणि शिवसेनेच्या गणेशोत्सवापाठोपाठ भाजपच्या नेत्यांनी नवरात्रोत्सवाचाही कब्जा मिळविण्याचा खटाटोप सुरू केला. मध्यंतरी तर, भाजपच्या सध्या खासदार असलेल्या एका नेत्याने लालकृष्ण अडवाणी यांनादेखील हाती टिपऱ्या घेऊन रिंगणात नाचायला लावले होते. त्यानंतरच्या निवडणुकीपर्यंत या नेत्याचे नाव सर्वतोमुखी पोहोचले. शिवसेनेतून काँग्रेसवासी झालेल्या संजय निरुपम यांनी तर, उत्तर भारतीयांच्या छठपूजेचा सार्वजनिक सोहळा मुंबईत आक्रमकपणे सुरू केला आणि हा सण सर्वतोमुखीही होतानाच निरुपम यांच्याभोवती प्रसिद्धीचे वलय निर्माण झाले.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बोलबाला होऊ लागला, त्याच्या आधी राम कदम या नावाभोवती मुंबईमध्ये मोठे वलय तयार झाले होते. त्याचे कारण, दहीहंडी उत्सवातील बक्षिसासाठी त्यांनी उघडलेली विक्रमी रकमेची थैली! सांस्कृतिक आणि पारंपरिक सणाचे महत्त्व आणि स्वरूप ओलांडून दहीहंडीचा सण राजकीय व कॉर्पोरेट क्षेत्राच्या हातात गेला, हे याच दरम्यान स्पष्ट झाले. मग लाखो रुपयांच्या बक्षिसांनी मढलेल्या दहीहंडय़ा फोडण्यासाठी येणाऱ्या गोविंदांच्या कौतुकाआधी, बक्षिसे लावणाऱ्या नेत्यांच्या जाहिरातींनी मुंबई-ठाण्याचे कानेकोपरे व्यापून जाऊ लागले आणि प्रसिद्धीच्या ‘नौबती’ झडू लागल्या. कालपरवापर्यंत ‘बंटी’ नावाने परिचित असलेल्या तरुणाचे राजकीय भविष्यदेखील यातूनच उजळून गेले.
अर्थात, केवळ राजकीय नेतृत्वानेच सार्वजनिक सणांचा बेमालूम वापर करून घेतला असे नाही. मुंबईवर आपले वर्चस्व असावे, अशी सुप्त इच्छा राजकारणाच्याही पलीकडच्या अनेक क्षेत्रांमध्ये दडलेली आहे. मुंबईच्या सार्वजनिक उत्सवांवर ‘अंडरवर्ल्ड’चेही सावट दिसते. आपल्या साम्राज्याचा पाया भक्कम करण्यासाठी व ते विस्तारण्यासाठी अनेक ‘भाई’ लोकांनी सार्वजनिक गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सवांचाच आधार घेतला. सुमारे चाळीस वर्षांपूर्वीच्या दशकात, माटुंग्याच्या वरदराजन नावाच्या दाक्षिणात्य ‘डॉन’चा गणेशोत्सव हे अख्ख्या मुंबईचे कुतूहल होते. वाय. सी. पवार या पोलीस अधिकाऱ्याने वरदराजनच्या साम्राज्यावर घाव घालण्यासाठी पहिली कारवाई त्याच्या माटुंग्याच्या गणेशोत्सवावरच केली आणि हा उत्सवच बंद पाडला. तरीदेखील, गणेशोत्सवांचा आधार घेत आपले वर्चस्व आणि वचक कायम ठेवण्याचा खटाटोप अनेक गुंडांनी सुरूच ठेवला होता. अश्विन नाईक, अरुण गवळी यांचे गणेशोत्सव त्यांच्या भपकेबाज देखाव्यांमुळे जनतेमध्ये चर्चेचा विषय होते. चेंबूरचा सह्य़ाद्री मंडळाचा गणेशोत्सव हे तर कोटय़वधींच्या भपकेबाज देखाव्यामुळे मुंबईकरांचे आकर्षण ठरले. शहरांतील मोठे उद्योजक, जवाहिरे, व्यावसायिक आणि बिल्डर्सना उत्सवासाठी देणग्या देण्याची सक्ती करून एक प्रकारची खंडणी या निमित्ताने उकळली जात असे.
अलीकडे मुंबईच्या अनेक गणेशोत्सवांना ‘राजा’चे विशेषण दिसते, तर अनेक सार्वजनिक गणपती ‘नवसाला पावणारे’ असल्याची पद्धतशीर जाहिरातही होते. श्रद्धाळू भाविकांची गर्दी साहजिकच अशा गणेशोत्सवांकडे वाढते. भाविकांच्या समजुतीवर भपक्याचा अतिरिक्त पगडा म्हणून आकर्षक देखाव्यांची आतषबाजी केली जाते आणि एकेका गणेशोत्सवाचे दहा दिवसांचे अर्थकारण कोटींच्या घरात जाऊन पोहोचते. नवसाला पावणाऱ्या गणपतींच्या चरणी लाखोंच्या देणग्या जमा होतात आणि गणेशोत्सवांची भरभराट होते. अर्थात, काही सार्वजनिक मंडळे या देणग्यांचा विनियोग सार्वजनिक व विधायक उपक्रमांसाठी करतात, हे नमूद करणेही आवश्यक आहे.
जाहिरातबाजीतून उत्सवाकडे भाविकांचा ओढा वाढविण्याचा मार्ग खुला झाल्यानंतर, कॉर्पोरेट क्षेत्रांची नजर अशा गणेशोत्सवांकडे वळणे साहजिकच होते. मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांच्या प्रवेशद्वारांवर नामांकित उद्योगांच्या स्वागत कमानी दिसतात. याद्वारे गणेशोत्सव मंडळांना लाखो रुपये देण्याची या उद्योगांची तयारी असते. निखळ गणेशभक्तीबरोबरच, व्यावसायिक वृद्धी हादेखील यामागे हेतू असतोच. दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या मनात या जाहिराती भराव्यात आणि सणासुदीच्या काळात अलीकडे जाणीवपूर्वक जोपासली गेलेली खरेदीची मानसिकता आणखी प्रबळ व्हावी हा उद्देश गणेशोत्सव काळात सुफळ संपूर्ण झालेला दिसतो. भक्तिभावाने भारलेल्या भाविकांच्या मनात सणाची नवी व्यावसायिक संकल्पना रुजविण्यात जाहिरातींचे सध्याचे युग पुरते यशस्वी ठरल्याचे प्रत्येक सणातूनच स्पष्ट झाले आहे.
पूर्वीच्या काळी, गुरुपुष्यामृत-अक्षय तृतीयेसारखे दिवस निखळ सण म्हणून साजरे व्हायचे. अशा काही सणांना समजुतीचे आधार असल्यामुळे, नाममात्र खरेदीही व्हायची. दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजरेटर, वातानुकूलन यंत्रे या चैनीच्या वस्तू न ठरता गरजेच्या वस्तू होत गेल्या, तसतशी खरेदीची मानसिकता केवळ सोन्याऐवजी अशा वस्तूंकडे वळत गेली. पुढे त्यात मोटारगाडय़ांचीही भर पडत गेली आणि सणाच्या निमित्ताने वाहनखरेदीचा ओघ वाढत गेला. सणांची मानसिकता आणि व्यावहारिक जगाचे शहाणपण यांचा चतुराईने मेळ घालत सण आणि खरेदीचे नवे नातेही निर्माण होऊ लागले. यामुळे एक बदल नक्की झालाय, तो म्हणजे भारतीय सणांना आंतरराष्ट्रीय महत्त्वही प्राप्त झाले आहे. भारतीय सणांवर जगभरातील उद्योगांची नजर लागून राहिली आणि नवी ‘प्रथा’ जुन्या ‘परंपरां’वर मात करू लागली.

First Published on August 30, 2016 3:27 am

Web Title: festival celebartion in mumbai