कलेला वयाचे बंधन नसते, हे परदेशी गुरुजींकडे पाहिल्यावर चटकन आपल्या लक्षात येते. अतिशय कमी वेळात व तरुणालाही लाजवेल इतक्या सहजरीत्या वयाच्या ८६ व्या वर्षी गणेशाच्या सुंदर मूर्ती ते आपल्या हाताने साकारत, त्या जिवंत असल्याचा भास निर्माण करतात. त्यांच्या या कलेबद्दल आश्वी परिसराला नवल व अभिमान असून या वयातही काम करण्याची जिद्द व टापटिपपणा पाहून या अविलयाचा तरुणांना हेवा वाटतो.

रजपतसिंग रघुनाथसिंग परदेशी (गुरुजी) मूळचे कोतुळचे (ता. अकोले). लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्याने त्यांनी शालेय वयातच चित्रकलेबरोबरच शिल्पकलेचेही ज्ञान आत्मसात केले. यातून वेगवेगळे प्राणी, देव-देवता व नेत्यांची हुबेहूब चित्रे रेखाटण्याचा छंद त्यांना जडला. सण-उत्सवात बैल पोळ्यासाठी मातीचे बैल, गणेश चतुर्थीसाठी गणेशाच्या मूर्ती, दीपावलीत लक्ष्मीच्या आकर्षक व सुंदर अशा मूर्ती ते आजतागायत स्वत:च्या हाताने घडवतात. आवड असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला ते ही कला शिकवतात. गुरु जींनी असंख्य विद्यार्थी घडवले. हे विद्यार्थी कलेमुळे आपली ओळख निर्माण करुन मोठया पदावर काम करत आहेत. परदेशी गुरु जी आश्वी खुर्दच्या (ता. संगमनेर) जिल्हा परिषद शाळेत रु जू होताच त्यांनी अल्पावधीतच ग्रामस्थांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. त्या वेळी नवीनच उभारलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाच्या इमारतीवर काढलेले कोरीव नाव आज पस्तीस वर्षांनंतरही दिमाखाने झळकत आहे. परिसरातील बहुसंख्य शाळा, मंदिर, इमारतींवरील कोरीव नक्षीकाम परदेशी गुरु जींनी केलेले आहे. गुरु जींनी आपली शिक्षकाची नोकरी सांभाळत कला जोपासली व आता ती मुलगा राजु परदेशी याच्याकडे हस्तांतरित करत पुढील पिढीकडे सोपवली आहे.

गुरु जी निवृत्त होऊन तीस वर्षे लोटली. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे आपल्या कलेवरील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. या वयातही अतिशय सुरेख गणेश मूर्ती ते आपल्या हाताने साकारतात. मुलगा राजू परदेशी कला शिक्षक म्हणून काम करताना आपल्या वडिलांनी दिलेली कला आनंदाने जोपासत, आपल्या वडिलांविषयी अभिमान बाळगून आहेत. सध्या गुरु जींचं कुटुंब लोणी (ता. राहता) येथे स्थायिक झाले असले तरी आश्वी परिसरातील नागरिकांच्या मनामधील त्यांच्या विषयीचा आदर व प्रेम कणभरही कमी झालेला नाही.

आश्वीकरांना अभिमान

रजपतसिंग रघुनाथसिंग परदेशी उर्फ परदेशी गुरु जी यांनी आश्वी खुर्द येथे असताना आपला शिक्षकी पेशा सांभाळत गावातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान देत, सुसंस्कृत पिढी घडवण्याचे काम केले असून, आज वयाच्या ८६ व्या वर्षीही ते आपली कला जोपासत असल्याने आम्हा आश्वी खुर्द ग्रामस्थांना त्यांचा अभिमान आहे.

-बापुसाहेब गायकवाड, पोलीस पाटील, आश्वी खुर्द