सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ पुण्यात नेमका कुठे झाला, त्यासाठी लोकमान्य टिळक आणि अन्य मंडळींची बैठक कुठे झाली होती, त्या वेळी त्यांच्यात काय चर्चा झाली होती या माहितीसह गेली १२३ व्या वर्षांत पदार्पण करत असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या मंडळाची ओळख उमलत्या पिढीला करून देण्याचा आगळा वेगळा उपक्रम यंदा गणेशोत्सवात केला जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात नऊ दिवस चालणाऱ्या या उपक्रमात पुण्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा १२३ वे वर्षे आहे. सन १८९२ मध्ये या मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक व पुण्यातील अन्य मंडळींनी सार्वजनिक गणेशोत्सव कसा सुरू केला आणि त्यापूर्वी पुण्यात काय काय घडामोडी झाल्या होत्या, हे सध्याच्या शालेय विद्यार्थ्यांनाही समजणे आवश्यक आहे, या हेतूने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट आणि अॅपलिंक टेक्नॉलॉजी यांनी संयुक्त रीत्या या उपक्रमाचे आयोजन केले आहे. कंपनीचे अभिजित फडणीस यांनी ही माहिती ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
हा उपक्रम उत्सवातील नऊ दिवस सकाळी, दुपारी व सायंकाळी असा तीन वेळांमध्ये केला जाणार आहे. शाळांच्या वेळा लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले असून शाळांचे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक व मुख्याध्यापक गटागटांनी बुधवार पेठेतील या गणपती मंडळासमोर एकत्र येतील. विद्यार्थी मंडळाजवळ एकत्र आल्यानंतर मुख्याध्यापकांच्या हस्ते आरती केली जाईल त्यानंतर विद्यार्थी सामूहिक अथर्वशीर्ष पठण करतील. विद्यार्थ्यांना आरती व अथर्वशीर्षांचे पुस्तकही या वेळी देण्यात येईल. त्यानंतर भाऊ रंगारी मंडळाची माहिती देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना भाऊ रंगारी भवन (जुना वाडा) दाखवले जाईल. ही एक ऐतिहासिक महत्त्व असलेली वास्तू असून या ठिकाणी भाऊ रंगारी, लोकमान्य टिळक व आदी निवडक मंडळींची पहिली बैठक झाली होती. त्या वेळचे चित्र व तो प्रसंग विद्यार्थ्यांसमोर वर्णनातून उभा केला जाईल. तसेच विद्यार्थ्यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचीही माहिती या वेळी दिली जाईल. वाडय़ात असलेले भुयार, स्वातंत्र्यसमरातील शस्त्र लपवून ठेवण्याच्या जागा हा इतिहासही या वेळी विद्यार्थ्यांना सांगितला जाईल. पुण्यातील विविध शाळांमधील चौथी ते नववीतील विद्यार्थ्यांना या आगळ्या वेगळ्या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.
विद्यार्थी मोठय़ा संख्येने येतील हे लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व व्यवस्थाही केल्या जाणार असून शाळांचा चांगला प्रतिसाद या उपक्रमाला मिळाला आहे.

 पाच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
ऐतिहासिक वास्तूची माहिती घेणार
सामूहिक अथर्वशीर्ष पठण आणि आरती