उत्साह व चैतन्याची देवता असलेल्या गणपती बाप्पाची आरास अधिकाधिक आकर्षक व्हावी यासाठी सार्वजानिक गणेश मंडळात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंचा उपयोग केला जातो. त्यात पर्यावरणपूरक वस्तू अभावानेच आढळून येत असताना लक्ष्मीनगरातील राणी लक्ष्मीनगर गणेशोत्सव मंडळात प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात  आहे. पर्यावरणाच्या  संवर्धनासाठी विविध उपक्रम मंडळ राबवित आहे.  
पर्यावरणाच्या दृष्टीने विविध सामाजिक संघटना आणि महापालिकेकडून जनजागृती केली जात असली तरी अनेक गणेश मंडळांकडून त्याचे पालन होताना फारसे दिसत नाही. मात्र, लक्ष्मीनगरातील राणी लक्ष्मीनगर गणेशोत्सव मंडळ त्याला अपवाद आहे. समाजातील गरिबांना मदत करीत असताना दरवर्षी दोन मुले किंवा मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च मंडळातर्फे केला जातो. गणेश मंडळाला १४ वर्षे झाले आहेत. पूर्वी मंडळात मातीची गणपतीची मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात होती. मात्र, दोन वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पितळाच्या गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. पूजेसाठी मातीची मूर्ती बसविली जाते. त्या मूर्तीचे कृत्रिम टाक्यामध्ये विसर्जन करण्यात येते. २५० किलोची असलेली पितळीची गणेश मूर्ती ५ फूट उंचीची असून ती उत्तरप्रदेशमधील अलिगढला तयार करण्यात आली आहे. गणेशोत्सव आटोपला की मंडळाच्या सदस्यांकडे ती ठेवली जाते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असली तरी सामाजिक भान जपले जाते. परिसरातील राहणाऱ्या मुलांच्या, महिलांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. पर्यावरण या विषयावर जनजागृती करण्यासाठी घरोघरी झाडे देण्याचा कार्यक्रम दरवर्षी केला जातो.
पाण्याची बचत करण्यासाठी घरोघरी पत्रके देऊन जनजागृती केली जाते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तींची मोठय़ा प्रमाणात विक्री झाल्यामुळे त्यांचे कृत्रिम तलावात करण्यात यावे यासाठी परिसरात महापालिकेच्या सौजन्याने कृत्रिम टँकची व्यवस्था केली जात असून नागरिक त्याला चांगला प्रतिसाद देतात. या शिवाय शहरातील तलावाच्या ठिकाणी मंडळातर्फे पर्यावरणाच्या दृष्टीने जनजागृती केली जाते. अनेक लोक आजारी असताना त्यांना वेळीच उपचार मिळत नाही त्यामुळे संस्थेतर्फे एका सामाजिक संघटनेला रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे. त्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून समाजातील गरिबांवर उपचार केले जातात. या शिवाय रक्तदान, नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले जातात. डिजेमुळे ध्वनीप्रदूषण होऊ नये याची काळजी मंडळातर्फे घेतली जाते. परिसरात गणेश मंदिर असल्यामुळे मंदिरात अनेक उपक्रम राबिविले जातात. गणेशोत्सव केवळ मनोरंजनाचे व्यासपीठ होऊ नये तर पर्यावरण आणि प्रदूषणाच्या दृष्टीने सामाजिक भान जपले जावे त्यादृष्टीने मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दहा दिवस काम करीत असतात.