गेल्या काही महिन्यांत रुपयाच्या दरात झालेली घसरण आणि त्यामुळे वाढलेली महागाई यांची झळ यंदाच्या गणेशोत्सवालाही बसली आहे. मंदीमुळे वैयक्तिक वर्गणी आणि जाहिरातींचे प्रमाण कमी झाल्याने मोठी सार्वजनिक गणेश मंडळे वगळता इतर मंडळांना निधीची जमवाजमव करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मूर्ती, सजावट व पूजा सहित्य, मांडव अशा सर्वच बाबींचा खर्च वाढल्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांना प्रसंगी स्वत:च्या खिशातून पैसे टाकावे लागत आहेत.
गणेश मंडळांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन सध्या जाहिराती हेच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महागाई वाढत असल्याने या जाहिरातीही कमी झाल्या आहेत. मंडळांना वैयक्तिक स्वरुपात मिळणारी वर्गणी जवळजवळ बंदच झाली आहे. या दोन प्रमुख कारणांमुळे अनेक छोटी-मोठी मंडळे संकटात सापडली आहेत. ‘कार्यकर्त्यांचा अभाव आणि पैशांची कमतरता यांमुळे ३० टक्के मांडवांमध्ये अगदी थोडीशी सजावट दिसून येते. विसर्जन मिरवणूक, पूजा यांचा खर्च कमी करता येत नसल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना काही प्रसंगी छाट द्यावी लागते. तर काही ठिकाणी वर्गणी मिळावी, पूजा साहित्य मिळावे यासाठी देवाचा लौकिक उगाचच वाढवला जातो,’ असे ज्येष्ठ गणेशोत्सव कार्यकर्ते आनंद सराफ यांनी सांगितले.
‘मांडवांचे दर सुमारे २५ टक्क्य़ांनी वाढले आहेत. खर्च वाढल्यामुळे मंडळांकडे पैसे शिल्लक रहात नाहीत. मांडव टाकणाऱ्या कामगारांचे प्रमाण कमी झाले आहे,’ अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे कार्यकर्ते भोला वांजळे यांनी दिली. ‘मंडळांना मिळणाऱ्या जाहिरातींचे प्रमाण ६० ते ७० टक्क्य़ांनी कमी झाले आहे’, असेही ते म्हणाले.
गणेश पेठेतील अमर हिंद तरुण मंडळाचे यंदाचे ७५ वे वर्ष आहे. पण या वर्षी या मंडळालाही अपेक्षेप्रमाणे जाहिराती मिळाल्या नाहीत. ‘यंदा वर्गणी गेल्या वर्षीपेक्षा कमी मिळाली. वर्गणी खर्च करुन झाली की कार्यकर्त्यांना स्वत:च्या खिशातून पैसे घालावे लागतात’, अशी माहिती मंडळाचे चिटणीस सागर कळंबे यांनी दिल
सोसायटय़ांनाही महागाईची झळ
सार्वजनिक मंडळांप्रमाणाचे सोसायटीच्या मंडळांनाही महागाईची झळ बसली आहे. सोसायटीमधून मिळणारी वर्गणी जरी वाढली असली तरी खर्च त्याच्या दुप्पट प्रमाणात वाढले आहेत, त्यामुळे ताळमेळ बसत नाही, अशी माहिती सिंहगड रस्त्यावरील माणिक बागेतील सुंदर गार्डन मित्र मंडळाचा खजिनदार आशुतोष तांबे याने दिली.