जालना शहरात श्री गणेश विसर्जन मिरवणूक रात्रभर चालली. सायंकाळी साडेअकराच्या सुमारास सुरू झालेल्या मिरवणुकीस मामा चौकातून प्रारंभ झाला. मिरवणुकीत ७६ सार्वजनिक गणेश मंडळे सहभागी झाली होती.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री राजेश टोपे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार कैलास गोरंटय़ाल, गणेश महासंघाचे अध्यक्ष प्रशांत वाटेकर, नगराध्यक्ष पार्वतीबाई रत्नपारखे, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. या वर्षी घाणेवाडी जलाशयात श्री विसर्जनास प्रतिबंध असल्याने मोतीबाग तलावात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळे त्याचप्रमाणे घरगुती श्रीमूर्तीचे विसर्जन मोतीबाग तलावात करण्यात आले.
या वर्षी शहरातील सदर बाजार आणि जुना जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीत २८९ सार्वजनिक गणेश मंडळे स्थापन करण्यात आली होती. मिरवणुकीतील ७६ सार्वजनिक गणेश मंडळे वगळता उर्वरित २००पेक्षा अधिक सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन स्वतंत्ररीत्या केले. मिरवणुकीच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. रात्री बारानंतर डीजे आणि लाऊडस्पीकर वाजवण्यास प्रतिबंध झाल्यामुळे मिरवणूक काही काळ थांबली होती. परंतु नंतर ती पूर्ववत झाली. सकाळी ७ वाजता मिरवणुकीतील शेवटच्या श्रीमूर्तीचे विसर्जन झाले.
िहगोलीत विसर्जन मिरवणूक दोन दिवसांची
मंगळवारी ११ गणपतींचे विसर्जन
वार्ताहर, िहगोली
‘गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांसह मिरवणुकीने सोमवारी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्य़ात एकूण १ हजार १०४ गणेश मंडळांनी श्रींच्या मूर्तीची स्थापना केली होती. त्यापकी सोमवारी १ हजार ९३ गणेश मंडळांनी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केले, तर मंगळवारी उर्वरित ११ गणेश मंडळाच्या वतीने श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
गेल्या दहा दिवसात विविध मंडळाच्या वतीने अन्नदान, रक्तदान आदी कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील गड्डेपीर गल्लीत असलेल्या चिंतामणी गणेशाच्या दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणात भाविक आल्याने दर्शनाच्या लागलेल्या रांगांमुळे शहरातील काही गणेश मंडळांना सोमवारी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करता आले नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक एन. अंबिका यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh immersion procession enthusiastically
First published on: 10-09-2014 at 01:49 IST