श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त पुण्यात तब्बल १ हजार ९७० किलो मोदकाच्या आकाराचा चॉकलेट केक तयार करण्यात आला. या केकची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. त्याबाबतचे प्रमाणपत्र पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. ‘द केक हाऊस’च्या १६ जणांनी अवघ्या ८ तासात हा विक्रम केला. याशिवाय सणस मैदानावर आज सकाळी १ तास ३१ मिनिटांत ३ हजार ८२ शाडूच्या मूर्ती साकारण्याचा विक्रम विद्यार्थ्यांनी नोंदवला. यामुळे पुण्यात आज एकाच दिवशी दोन उपक्रमांची गिनीज बुकात नोंद झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सातारा रोडवरील पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या कलादालनात हा विक्रम करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी स्वप्निल डांगरीकर, केक साकारण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम पाहणारे धर्मनाथ गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले की, शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त विविध उपक्रम सुरु असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणारा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.

पुण्यामध्ये साकारलेल्या मोदकाच्या आकारातील केकची गिनीज बुकात नोंद झाल्याचे स्वप्निल डांगरीकर यांनी जाहीर केले. यापूर्वी सन २००९ मध्ये १ हजार ४१ किलोचा केक स्पेनमध्ये साकारण्यात आला होता. त्यानंतर आठ तासात १ हजार ९७० किलोचा केक पुण्यात साकारण्यात आला. हा केक तयार करण्यासाठी १ हजार किलो तयार केक पावडर, १ हजार किलो चॉकलेट ट्रफल आणि ५० लिटर क्रिम वापरण्यात आल्याची माहिती धर्मनाथ गायकवाड यांनी दिली. या केकचा आकार २३ बाय ३५ फूट असून यासाठी तीन दिवसांपासून तयारी सुरु होती.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh festival 2017 two guinness world records took place in a single day in pune
First published on: 24-08-2017 at 19:34 IST