मानाच्या श्री बाराभाई गणपतीचे विशेष आकर्षण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव विदर्भातील काही जुन्या गणेशोत्सव मंडळांनी आणि घराण्यांनी तेवढय़ाच श्रद्धेने व भक्तिभावाने जोपासला आहे. या मंडळ व घराण्यांच्या उत्सवाने आता शतके ओलांडली आहेत. मात्र, त्यांच्याकडील गणेशाची मूर्ती, त्यामागच्या कलाकारांचे हात आजही ती परंपरा जतन करून आहेत. अकोल्यातील जुने शहरात जयिहद चौकातील सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेला मानाचा श्री बाराभाई गणपती संपूर्ण विदर्भात प्रसिध्द आहे. या गणपतीची प्राचीन परंपरा नाथ कुटुंबीय व अकोलेकरांनी भक्तिभावाने जपली आहे.

श्री बाराभाई गणपती अकोला शहरातील गणेशोत्सवाचे एक आगळे-वेगळे आकर्षण. वऱ्हाडातील सर्वात प्राचीन व पारंपरिक गणपती म्हणून श्री बाराभाई गणपतीचा नावलौकिक आहे. श्री बाराभाई गणपतीची स्थापना नेमकी केव्हापासून झाली याची कोणतीही नोंद नाही. या गणपतीचा पेशवेकालीन बाराभाईच्या कारस्थानाशी निकट संबंध असावा म्हणूनच याला बाराभाई हे नाव प्राप्त झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. प्राचीन काळी श्री बाराभाई गणपतीची रुढीपरंपरेने स्थापना केल्या जात होती. मात्र, कालांतराने गणेशोत्सवातील सार्वजनिक उत्साह कमी झाला व ही परंपरा संपुष्टात येऊ नये म्हणून संस्थापक अध्यक्ष कै.भगवाननाथ इंगळे यांनी आपल्या घरी श्री बाराभाई गणपतीची स्थापना केली. तेव्हापासून श्री बाराभाई गणपती संपूर्णत: नाथ कुटुंबाचा आहे. श्री बाराभाई गणपतीची परंपरा नाथ कुटुंबीयांनी गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली. या गणपतीला मानाचे स्थान प्राप्त होऊन आज १२७ वर्षे लोटले आहेत.

लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यानंतर इंग्रजकालीन परिस्थतीतही अकोल्यातून कै.भगवाननाथ इंगळे यांनी श्री बाराभाई गणपतीसह शहरातील सात-आठ मंडळांची मिरवणूक काढली होती. तेव्हापासून अकोल्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत पहिल्या स्थानावर श्री बाराभाई गणपती व दुसरया स्थानावर श्री राजराजेश्वाराचा गणपती पालखीत असतो. अकोल्यातील ही प्रथा १८९० च्या सुमारास सुरू झाली. श्री बाराभाई गणपतीची मूर्ती गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून एकच आहे. या अगोदर जुन्या पिढीतील मूर्तीकार ओंकारराव मोरे ठाकूर हे श्री बाराभाई गणपतीची मूर्ती तयार करीत होते. त्यांच्या मृत्यूनंतर वारंवार प्रयत्न करूनही श्री बाराभाई गणपतीची मूर्ती तयार करण्यात यश आले नाही. त्यामुळे ही मानाची मूर्ती विसर्जित करण्यात येत नाही. पूजेच्या मूर्तीचे मात्र विसर्जन करण्यात येते. या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक दिंडय़ा असतात. श्री बाराभाई गणपतीची पालखी वाहणारे भोईराज सुध्दा पिढय़ांपिढय़ा आपली सेवा गणेश चरणी अर्पण करीत आहेत. अनेक वर्षांपासून असलेल्या या गणपतीचे अकोलेकरांच्या मनात श्रध्देचे भाव आहेत. श्री बाराभाई गणपतीला अनेकजण नवस बोलतात, साकडे घालतात. भक्तांच्या श्रध्देला आणि विश्वासाला श्री बाराभाई गणपतीने कधीही तडा जाऊ दिला नाही, असे मोठय़ा अभिमानाने नाथ कुटुंबीय सांगतात.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Historical tradition of ganeshotsav in akola
First published on: 28-08-2017 at 00:20 IST