तीन पांढऱ्या पडद्यावर काढलेल्या पेन्टिंगपासून सुरू झालेले सार्वजनिक गणेशोत्सावमधील देखावे कालांतराने थर्मोकॉल, चलचित्र, विद्युत रोषणाई आणि आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या भव्य देखाव्यांवर येऊन स्थिरावले आहेत. झपाटय़ाने बदलणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत आज तीनशे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जात असले तरी ४४ वर्षांपूर्वीच्या तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मजा काही औरच होती. पाच हजार रुपयांत साजरे होणाऱ्या ह्य़ा सार्वजनिक गणेशोत्सवांनी आता कोटीच्या कोटी उड्डाणे केली आहेत. अठरापगड जातीच्या या सायबर सिटीत घरगुती गणेशोत्सवांची संख्याही तेवढीच झपाटय़ाने वाढली असून ती वीस हजारांच्या घरात गेली आहे.
राज्यातील इतर कोणत्याही शहरांपेक्षा नवी मुंबईतील लोकसंख्येचा वेग हा चार पट आहे. नवी मुंबईजवळचे नयना क्षेत्र विकास आणि इमारत पुनर्बाधणीचे सत्र सुरू झाल्यानंतर हा वेग यापेक्षा दुप्पट वाढणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अशा या बदल्यात नव्या मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे साजरेपण देखील तेवढय़ाच झपाटय़ाने बदलत गेले आहे. श्रीमंत शहर म्हणून देणगी देणाऱ्यांची संख्याही कमी नसल्याने अनेक मंडळांनी देखाव्यांचे बजेट वाढविण्यास सुरुवात केली आहे. तुर्भे येथील शिवसेना विभागप्रमुख बबनशेठ पाटील यांनी तुर्भे येथील बाजारपेठ नजरेसमोर ठेवून शहरातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. जिल्हा परिषदेच्या शाळेतील बावस्कर गुरुजींना या गणेशोत्सवातील चार पडदे वेगवेगळ्या निसर्ग देखाव्यांनी रंगविले होते. त्यानंतर पारसिक डोंगराच्या कुशीत सुरू झालेल्या दगडखाणी, नवी मुंबई निर्मितीसाठी आलेले कंत्राटदार, एमआयडीसीतील कंपन्या यांमुळे मंडळाच्या देणगीमध्ये भर पडू लागली आणि टप्प्याटप्प्याने हाताने चालविण्यात येणारी चलचित्रे, थर्मोकॉलचे कार्यकर्त्यांनी रात्रभर जागून केलेले मखर आणि आता ठेकेदारी पद्धतीने देण्यात येणाऱ्या भव्य प्लास्टर ऑफ पॅरिसचे देखावे असे या गणेशोत्सवातील चित्र प्रत्येक वर्षी बदलत गेले आहे. करमणुकीचे साधन म्हणून त्या वेळी लागणारे मोठय़ा पडद्यावरील चित्रपट पाहण्यास पंचक्रोशीतील रहिवाशांची अलोट गर्दी उसळत होती. यानंतर वाशी सेक्टर १७ येथील सार्वजनिक गणेशोत्सवाने श्रीमंत देखाव्यांची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला असून वाशीचा राजा म्हणून हा गणेशोत्सव नावारूपाला येत आहे. याच वाशीत अशा दहा-बारा सार्वजनिक गणेशोत्सवांचा बोलबाला आहे. नेरुळमधील लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती गणेशोत्सव प्रबोधनात्मक संदेश देण्याचा दरवर्षी प्रयत्न करीत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा हा सिलसिला आता ग्रामीण भागातही पोहोचला आहे. यापूर्वी गावात सार्वजनिक गणेशोत्सव हा प्रकार नव्हता. नवी मुंबईतील २९ गावांत सुमारे तीन ते चार घरगुती गणपतींची संख्या आज १२ हजारांच्या घरात गेली असून शहरातील विविध जाती-धर्माच्या रहिवाशांनी घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यास जास्त प्राधान्य दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक किंवा घरगुती गणेशोत्सवाचा उद्देश प्रबोधन आणि जनसंपर्क हा आहे. ‘गणपतीला या’ हे सांगण्यासाठी पूर्वी ग्रामस्थ घरोघरी जाऊन आमंत्रण देत असत पण आता व्हॉटसअप, एसएमएस आणि मेल करून हे आवतण देऊन वेळ मारून नेली जात आहे.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Painting to plaster of paris changing nature of the ganesh festival
First published on: 29-08-2014 at 01:01 IST