23 January 2018

News Flash

स्वयंपाकाची ऐशीतैशी

स्वयंपाकघरात माझ्या प्रवेशास कारण ठरली ती माझी नोकरीनिमित्त झालेली बदली.

नरेंद्र घनवटकर | Updated: June 17, 2017 4:24 AM

एकदा दुपारी मुलीचा फोन आला, बाबा, तुम्हाला झटपट कॅरमल चिक्की करायचीय, सोप्पं आहे व पटकन होईल. खरंच अगदी थोडय़ा वेळात मस्त चिक्की तयार झाली. मग काय, मी एवढय़ावर थांबतोय होय, ड्रायफ्रूटच्या चिक्कीचा घाट घातला, पण प्रमाण जास्त झाल्यामुळे पटकन गोळा झाला व माझी धावपळ उडाली..

स्वयंपाकघरात माझ्या प्रवेशास कारण ठरली ती माझी नोकरीनिमित्त झालेली बदली. सात-आठशे लोकवस्तीचे ठिकाण. जेवण-खाण्याची सोय नाहीच. गावात काही दिवस जेवणाची सोय मोठय़ा मिनतवारीनेच झाली. नंतर परत जेवणाचा प्रश्न आ वासून उभा राहिला. तोपर्यंत मला फक्त खाण्याची चव होती, हाताला चव यायचा प्रश्नच नव्हता. मग सुरू झाली स्टोव्हपासून तयारी. मुंबईत गॅस होता, पण स्टोव्हशी दोस्ती नव्हती. भांडीकुंडी जमा होत गेली. त्या काळी साध्या फोनची वानवा होती, अन्यथा व्हॉटस्अ‍ॅपवर रेसिपीज बघून काही करता आले असते. आठवडय़ाच्या शेवटी मुंबईला आल्यावर आई व पत्नीकडून वेगवेगळ्या, पण सोप्या पदार्थाची माहिती पदरात पडू लागली.

भात-वरणापर्यंत मजल मारली. आता काही वेगळे करावेसे वाटू लागले आणि तसा मुहूर्त साधून आला. संकष्टी चतुर्थी होती. उपासाचा दिवस. तशात रताळ्याचे गोड काप माझे आवडीचे. विचार केला, सोपे आहे. रताळ्याच्या फोडी केल्या, तुपाची फोडणी करून त्यात काप टाकून त्यात गूळ चिरून टाकला व झाकण ठेवून माझ्या दुसऱ्या कामाला लागलो. काही वेळाने स्वयंपाकघरातून जळल्याचा वास व धूरही येऊ  लागल्यावर पळापळ झाली. झाकण काढून बघतो तर काय, गूळ वितळून पातेलं करपलं व रताळ्याच्या फोडी करपून कडक झाल्या होत्या. पातेलं साफ करण्यापेक्षा टाकून देण्यात शहाणपण होतं. एवढं झाल्यावर कडक उपास घडणे आलेच. हळूहळू एकेक गोष्टी जमू लागल्या. मग सकाळच्या नाष्टय़ासाठी पोहे, शिरा, उपमा होऊ  लागला, पण साबुदाणा खिचडी आपला ‘चिकटपणा’ सोडायला तयार होईना, मग तिचा नाद सोडून दिला.

यथावकाश मुंबईला बदली झाल्यानंतर घरचे स्वयंपाक घर खुणावू लागले, पण घरचं महिला मंडळ दाद लागू देत नव्हतं; पण वेळप्रसंगी अडीअडचणीला माझी उपयुक्तता त्यांना पटू लागली. आता माझ्या पदार्थ करण्यात सफाई येऊ  लागली. अर्थात कमीअधिक चुका होत. दरम्यानच्या काळात बिघडलेल्या पदार्थापासून नवीन पदार्थ करण्याबाबत मीपण पत्नीस सूचना केली. झालं काय, तिने मोठय़ा उत्साहाने अनारसे करावयास घेतले. सर्व कृती पुस्तकात बघून. पीठ तयार झाले, पण मग अनारशांनी तळणीत हसायला सुरुवात केल्यावर आम्हीच रडवेले झालो. म्हटलं सर्व आवरून ठेवून दे. दुसऱ्या दिवशी सकाळी ती पोळी करत होती व मी स्वयंपाकघरात डोकावलो आणि एकदम विचार आला, आपण पुरणपोळी करताना जसं पोळीत पुरण भरतो, त्याऐवजी कालचं अनारशाचं पीठ घातलं तर. पत्नीने काहीसे आढेवेढे घेतच बेतास मान्यता देत पोळी लाटली आणि महाराजा, काय सांगू, खुसखुशीत पोळी तय्यार झाली आणि महत्त्वाचे म्हणजे ती कशाची केली आहे हे कोणीच ओळखू शकले नाही. आता मला वेगवेगळे प्रयोग करण्यास हुरूप आला. यातूनच तयार झाली वेगळी बटाटा भजी. पारंपरिक भज्यात बटाटय़ाचे काप फक्त मीठ लावून पिठात बुडवून तळतात. मी मात्र बटाटय़ाच्या कापाला आलं, लसूण, मिरची, कोथिंबिरीची पेस्ट चोळून मग पिठात बुडवून भजी तळली. मस्त चवीची बटाटा भजी झाली. एकदा बाजारहाट करताना उत्तम सीताफळं दिसली. झालं, डोक्यात चक्रं फिरली. म्हटलं सीताफळ बासुंदी करू या. दूध आटवायला ठेवले. ते आटेपर्यंत सीताफळाचा गर काढून घेतला. दूध आटवून साखर घालून बासुंदी उकळत असतानाच त्यात गर घातला पण.. सीताफळाच्या बासुंदीऐवजी नासवणी झाली. संध्याकाळी खुलासा झाला- बासुंदी थंड झाल्यावर मग सीताफळाचा गर टाकायचा. एक नवीन धडा मिळाला- दूध गरम असताना काही टाकण्यापूर्वी विचार करावा. दुसऱ्या वेळी मात्र मस्त बासुंदी करून फ्रिजमध्ये गार करून पत्नीस वाढली, तिची शाबासकी मिळवली. मे महिन्यात मामेबहिणीने नातवाच्या मुंजीचे आमंत्रण करायला मुलगा सुनेसह दुपारनंतर येते म्हणून फोन केला. ‘ही’ तर कामावर गेली होती. मग सरबराई करण्याची जबाबदारी माझ्यावर पडली. शुभकार्याचे आमंत्रण म्हणून गोड पदार्थ करणे भाग म्हणून गोडाचा साजूक तुपातला शिरा वेलची, मनुका, केळं घालून सजवला व देताना डिशमध्ये मूद पाडून दिला. मे महिना व दुपारची वेळ म्हणून थंडगार पन्हे दिल्यावर मात्र त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. एकदा दुपारी मुलीचा फोन आला, बाबा, तुम्हाला झटपट कॅरमल चिक्की करायचीय, सोप्पं आहे व पटकन होईल. दाण्याची भरड व तीळ घ्या. त्याच्याएवढी साखर पॅनवर थोडं तूप घालून तापवा. कॅरमल तयार होईल. तपकिरी रंग आल्यावर तीळ, दाणे घाला. घट्ट होऊ  लागल्यावर थाळीत पसरून वडय़ा पाडा. खरंच अगदी थोडय़ा वेळात मस्त चिक्की तयार झाली. मग मी काय एवढय़ावर थांबतोय होय, ड्रायफ्रूट चिक्कीचा घाट घातला, पण प्रमाण जास्त झाल्यामुळे पटकन गोळा झाला व माझी धावपळ उडाली. त्यात बेदाणे व अंजीर घातल्यामुळे चिक्की नरमही झाली. असो. एक अनुभव तर शर्टात (पदरात)पडला. अजूनही एक पदार्थ हुलकावणी देतोय तो म्हणजे दुधी वडी. तशी जमते, पण मराठमोळ्या दुकानात मिळते तशी लुसलुशीत जिभेवर विरघळणारी हवी. ती करीनच मी, पण त्याआधी गरमागरम मसाला बटाटा भजी खायला कधी येताय?

नरेंद्र घनवटकर

narendra.ghanvatkar@yahoo.com

 

 

 

First Published on June 17, 2017 4:24 am

Web Title: cooking is an art and cooking booknarendraghanvatkar
  1. N
    nanda Gokhale
    Jun 19, 2017 at 12:16 am
    व खूप छान. पुरुषांनी नवीन पदार्थ केला म्हणजे खूप कौतुक.
    Reply