04 August 2020

News Flash

आग्या नाळ – सिंगापूर नाळ

जेमतेम एक फुटी रुंद तिरकस पायवाटेवर पसरलेल्या बारीक दगडांमुळे आणि वाळलेल्या गवतामुळे पाय निसटू लागले.

एकल्याच्या नाळेने रायगड जिल्ह्य़ातील दापोली गाठायचं आणि मग सिंगापूर नाळेने चढून वर घाटमाथ्यावर सिंगापूर गावी जायचं असा एक संपूर्ण दिवसाचा साधा बेत.. पण त्याने आम्हाला बरेच धडे शिकवले.

घाटमाथ्याच्या एकल गावातून एकल्याच्या नाळेने कोकणातील रायगड जिल्ह्य़ातील दापोली गाठायचं आणि मग पुन्हा सिंगापूर नाळेने चढून वर घाटमाथ्यावर सिंगापूर गावी जायचं असा एक संपूर्ण दिवसाचा प्लान ठरवला होता. कधी काळी येथील गावकऱ्यांनी दळणवळणासाठी वापरलेल्या या वाटा आज तशा विस्मृतीत गेलेल्या, पण डोंगरभटक्यांकडून वापरल्या जात असल्यामुळे हा ट्रेक बरेच दिवस डोक्यात घोळत होता. तशी किल्ल्यांची भटकंती झाली होतीच, पण घाटवाटांचं वेड अजून लागलेलं नव्हतं.

रात्री केळद खिंडीतून गाडीने उजवीकडे वळण घेतले मात्र समोरच्या तीव्र चढावाच्या कच्च्या रस्त्यावर गाडीच्या खडखडाटाने आम्हाला जागं आली. पुणे सातारा मार्गावरील नसरापूर फाटय़ावरुन पन्नास एक किलोमीटरवरच्या एकल गावात जाण्यासाठी केळद खिंडीने जायचे होते. तेव्हा गुगल मॅप्स आणि व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपचा सुळसुळाटदेखील नव्हता. आधी जाऊन आलेल्यांचं लिखाण आणि पुस्तकातील माहिती हाच आधार. त्यामुळेच केळद खिंडीनंतरचा रस्ता सरत्या पावसात उखडला आहे याची माहितीच नव्हती. ट्रेक सुरू होण्याआधीच हे रस्त्याचं विघ्न समोर आलं होतं. शेवटी सोबतच्या बाईकवरून टिबल सीट प्रवास करीत पाच खेपा करून आम्ही दहाजण पहाटे पहाटे एकल गावाजवळ पोहोचलो. एकल आणि सिंगापूर ही दोन्ही गावं केळद खिंड ते मोहोरी या कच्च्या रस्त्यापासून बऱ्यापैकी खाली डोंगरउतारावरील सपाटीवर, पण घाटमाथ्यावरची असल्यामुळे या ट्रेकसाठीची महत्त्वाची. एकलला पोहोचेपर्यंत पहाटेची चाहूल लागली होती, पण अजून अंधारलेलंच होतं. गावाला जाग आलेली नव्हती.

दसरा असल्यामुळे गावात पोहोचताच आम्ही गावातील शाळेसमोर एका स्वच्छ जागी सोबत आणलेली ट्रेकिंगची पुस्तके आणि थोडी साधनसामग्री मांडून त्यांची पूजा केली. नारळाचा प्रसाद वाटून, हलकी न्याहारी उरकतानाच गावकऱ्यांना आम्ही येथे का आलोय ते सांगितले. आम्ही तसे घाटवाटांसाठी नवखेच असल्यामुळे वाटाडय़ा मिळाला तर उत्तम होतं. पण शेतीची कामं अंगावर असल्यामुळे संपूर्ण दिवस वाटाडय़ा मिळण तसं कठीणच वाटू लागलं. शेवटी एक दादा नाळेपर्यंत सोडायला तयार झाले.

दादांना शेतावर जायला उशीर होत होता. ते आम्हाला सोडून लगोलग शेतावर जाणार होते, त्यामुळे अधिक वेळ न दवडता आम्ही दादांच्या मागून धावू लागलो. गावामागे खालच्या अंगाला असलेली काही शेतं ओलांडून गावाच्या उजवीकडे असलेल्या टेकडीच्या पोटातील कारवीच्या जाळीत शिरलो. कारवीचे रान सुरू होताच दादांनी हातातल्या कोयत्याने सफाईने फांद्या छाटायला सुरुवात केली. खरं तर हीच कारवी अनेक वेळा डोंगरचढाईत आधाराला येते. पण ते उन्हाळ्यात. आता पावसाळ्यापासून या वाटेने कोणी गेलं नसल्याने पायाखालची मळलेली वाट असूनदेखील वाट दिसत नसल्यामुळे फांद्या दूर करणं अपरिहार्य होतं. दादांचा हात सफाईनं चालत होता आणि आम्ही कारवीचे ओरखडे वाचवत, अंग चोरत मुक्याने त्यांच्या मागून चालत होतो. पंधराएक मिनिटांच्या वाटचालीनंतर ही वाट एका टेपाडाच्या पोटाशी पोहचली. एकल गावाची नाळ टेपाडाच्या पलीकडे होती. आम्ही जेथे उभे होतो तेथून टेपाडाचा कडा उजव्या हाताशी ठेवत एका निमुळत्या निसरडय़ा आडव्या टप्प्यावरून टेपाडाला वळसा घालत पलीकडच्या नाळेत उतरायचं होतं. जेमतेम एक फुटी रुंद तिरकस पायवाटेवर पसरलेल्या बारीक दगडांमुळे आणि वाळलेल्या गवतामुळे पाय निसटू लागले. त्यात डावीकडे खोल दरीच्या दर्शनाने हृदयाचे ठोके चुकवायला सुरुवात केली होती. एकमेकांना आधार देत एक एक करून नाळेत उतरलो. नाळेत कसला तरी विचित्र असा घू. घू. असा आवाज घुमत होता. नाळेच्या दोन्ही कडय़ांवरील मधमाश्यांच्या पोळ्यांमुळे हा आवाज येत असल्याचे दादांनी सांगितले. या माश्यांना आग्या माश्या म्हणतात आणि यांच्यामुळेच या नाळेला एकल्याच्या नाळेपेक्षा आग्याची नाळ म्हणून अधिक ओळखलं जात असल्याचं दादांकडून कळलं. पुढची वाट समजावून सांगून दादा शेताकडे निघून गेले.

सह्याद्रीच्या डोंगररांगांत अशा अनेक नाळ आहेत. काही स्थानिकांच्या जाण्यायेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तर काही क्वचितच वापरल्या जाणाऱ्या. घाटमाथ्यावरुन डोंगरातून पाणी वाहून जाते त्या भागातून काढलेल्या वाटेला नाळ म्हणतात. या अशा वाटांवर पाण्यासोबत वाहून आलेल्या दगडांचा नुसता खच पडलेला असतो. पावसाळा नुकताच सरून गेल्यामुळे या वर्षी वाहून आलेले दगड आग्या नाळेत अजून अस्थिर होते. डुगडुगणाऱ्या दगडावर तोल सांभाळत नाळ उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. पलीकडे इंग्रजी सी (उ) आकारात वळलेल्या वक्राकार डोंगररांगांतून अशाच दोन-तीन नाळ उतरताना दिसत होत्या. तेव्हा याबद्दल फारसे काहीच माहीत नव्हते. किंबहुना घाटवाटांचा चस्का अजून लागलाच नव्हता. आग्या नाळेतून समोर दिसणारे पठार म्हणजे फडताड नाळेकडे जाताना लागतो तो माळ, त्याला गावकरी दुरुगाचा माळ म्हणतात. या माळाकडे जाताना एक जंगलाचा मोठा पट्टा लागतो. या पट्टय़ात जननी देवीचे ठाणं आहे. त्याच्या आधी थोडे खालच्या अंगाला एक आणखी छोटी सपाटीची जागा आहे त्या भागाला गावकरी धाकला दुरुग म्हणून संबोधतात. या धाकल्या दुरुगाच्या खाली दरीत साधारण निम्म्या उंचीवर डोंगरापासून विलग झालेला एक सुळका आहे. या सुळक्याला तसे विशेष नाव नाही, पण स्थानिक याला दुरुगाचा सुळका म्हणतात. मात्र हे सर्व ज्ञान घाटवाटांच्या प्रेमात पडून पुढील दोनतीन वर्षे वेडवाकडे भटकल्यावर मिळाले.

आग्या नाळेतून हे सर्व पाहताना मोकळी दगडी वाट संपल्यावर पुढे कारवीची जाळी लागली. या जाळीतून वाकून, बसून उतरत जात आम्ही एका डोहापाशी उतरलो. एकाखाली एक असे दोन सुरेख डोह पाहून येथे थांबण्याचा मोह कोणालाही आवरला नाही. तेथील निरव शांततेत वाहत्या पाण्याच्या मंजुळ खळखळाटात डोहाशेजारी बसून थोडी पोटपूजा केली. स्वच्छ नितळ गार पाण्याने भरलेले डोह पाहून सोबत्यांना पाण्यात उतरण्याचा मोह काही आवरला नाही. या मोहापायी गरजेपेक्षा जरा जास्तच वेळ येथे खर्ची पडला. डोहापासून पुढे नाळ उजवीकडे वळताना दिसत होती. डोहापासून पुढे नाळेचा उतारही फारच मंदावला होता. त्यामुळे आमच्यातील अनेकांना आपण संपूर्ण नाळ उतरलोच असे वाटू लागले होते. साहजिकच त्या डोहात अंमळ जरा अधिकच डुंबणं झालं. लवकर डोहाबाहेर येण्याच्या विनवण्यांना सपशेल धुडकावून लावत सर्वचजण पाण्यात डुंबत होते. अखेर एकेकाला दामटवून पाण्याबाहेर काढावे लागले.

डोहापासून अवघ्या पाचच मिनिटांत नाळेत एक मोठा टप्पा लागला. येथे  पाणी कडय़ावरून दोन टप्प्यांत थेट १५० फूट खोल डोहात झेपावत होते. समोर दूरवर नाळ टप्प्याटप्प्यात उतरताना दिसत होती. मजामस्तीत बराच वेळ वाया घालवल्याची जाणीव सर्वानाच होऊ लागली होती. आणि हा टप्पा उतरून जाण्यासाठी वाट शोधणे गरजेचे होते. आधे इधर, आधे उधर असे पसरून खाली उतरण्याचा मार्ग शोधू लागलो. थोडय़ाच वेळात उजवीकडून गवतातून उतरणारी पुसटशी वाट मिळाली. ह्य़ा वाटेच्या सुरुवातीला एका मोठय़ा खडकाच्या तळाशी जननी देवीचं ठाणं आहे. पण हे ठाणं आम्हाला पुढे बऱ्याच वर्षांनतर पुन्हा एकदा आग्याची नाळ चढून आलो तेव्हा सोबतीला आलेल्या मामांनी दाखवले. थेट ८० अंशात उतरत जाणारी ही वाट उतरताना वाटेवर पसरलेल्या मुरुम, माती आणि वाळलेल्या गवतामुळे पाय ठरत नव्हते. कसेबसे एकमेकांना आधार देत आम्ही एकदाचे तो टप्पा उतरून पुन्हा नाळेत आलो. आता अजिबात वेळ न दवडता थेट दापोलीच्या दिशेने चालायला लागलो.

थोडय़ाच अंतरावर या नाळेला डावीकडून आणखी एक नाळ येऊन मिळाली. येथूनच नाळ उजवीकडे वळली. आता बहुतेक उतराई संपली होती. नाळेचे रूपांतर विस्तीर्ण ओढय़ात झाले होते. असे ओढे नेहमीच पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेल्या दगड-गोटय़ांनी भरलेले असतात. या लहान-मोठय़ा दगडांवरून उडय़ा मारत, तोल सांभाळत वाटचाल करणं खूपच त्रासदायक अनुभव असतो. दुपारच्या रणरणत्या उन्हात आम्ही या दगडांवरून टणाटण उडय़ा मारत शक्य तितक्या वेगाने दापोलीकडे सरकत होतो. पण ही दगड-धोंडय़ांतील पायपीट पार अंत पाहणारी ठरली. तास सव्वा तासाच्या या दगडी शिक्षेने चांगलंच घामटं काढलं. या दगडावरून त्या दगडावर तोल सांभाळत पुढे सरकण्याच्या कसरतीमुळे पेकाटात गोळे यायला लागले. दापोली गावात पोहोचायला दुपारचे अडीच वाजले होते.

गावातील मंदिराच्या ओसरीवर बसून जेवण उरकेपर्यंत मात्र आभाळ पार बदलून गेलं. दुपारच्या असह्य़ उष्म्याची जागा सुखद शीतल वाऱ्याने घेतली. मृत्तिका गंध आसमंतात दरवळू लागला. गारव्याने क्षणभर भुरळच पडली खरी, पण पुढच्याच क्षणी डोंगराकडे नजर गेली आणि पुढे उभ्या ठाकलेल्या संकटाची जाणीव झाली.

सिंगापूर नाळेच्या माथ्यावरील डोंगरावर काळ्या ढगांनी गर्दी केली होती. वरून येणारा तो मृत्तिकागंध घाटावर पाऊस बरसू लागल्याची जाणीव करून देत होता. ढगांची लाट पुढे पुढे सरकत होती. थोडय़ाच वेळात आकाश काळवंडून धुवांधार पाऊस बरसणार अशी चिन्हे दिसायला लागली होती. अचानक आलेल्या पावसामुळे दापोलीतून कोणी वाटाडय़ा तयार होईना. काळोखात, जंगलात, तेही पाऊस बरसत असताना वाट हरवण्याची शक्यात अधिक होती. त्यामुळे अशा मोसमात अशी जोखीम घेण्यापेक्षा महाडमाग्रे मुंबईला परतणे इष्ट ठरणार होतं. पण हरपुडात अमोल गाडी घेऊन आमची वाट पाहत होता. दापोली गावात रेंजच नसल्याने त्याला तेथून निघायला सांगणं शक्य नव्हतं. एकदा रेंज मिळाली पण कदाचित अमोलला रेंज नसावी. सिंगापूर, हरपूड, पासली गावांतील गोळा केलेले सगळे नंबर फिरवले, पण काहीच उपयोग नव्हता. आम्ही कळवल्याशिवाय अमोल निघणार नव्हता. यापूर्वीच्या ट्रेकला गाडीच्या ठिकाणी पोहोचायला कितीही उशीर झाला तरी तो वाट पाहत थांबायचा. त्यामुळे त्याला सोडून निघणं शक्य नव्हतं. आणि अशा वातावरणात सिंगापूर नाळेने चढून जाणं जोखमीचं होतं. सोमवारी कामावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता अशा दोघा सवंगडय़ांना महाडमार्गे मुंबईला पाठवलं व उरलेले घाट चढून जाण्यास सज्ज झाले.

फोनाफोनीच्या गोंधळात बराच वेळ गेला होता. अधिक वेळ न दवडता आम्ही पटापट ओढा ओलांडून पलीकडच्या जंगलात शिरलो. गावकऱ्यांकडून साधारण वाट समजावून घेतली होती. जंगलातून १५ मिनिटं चालत एका छोटय़ा ओढय़ापाशी पोहोचलो. तो ओलांडला आणि समोरून आलेल्या एका मामांकडून पुन्हा एकदा वाट समजावून घेतली. ओढय़ाच्या पलीकडे एकच मळलेली पायवाट समोरची टेकडी चढत होती. आम्हाला हीच पायवाट धरून घळीत पोहोचायचं होतं. टेकडीवरील घनदाट जंगलाच्या पट्टय़ात शिरताच जंगलातील कुंद आणि दमट वातावरणामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या. दुपारी एकल्याच्या नाळेतील दगड-धोंडय़ावरून चालण्याच्या कंटाळवाण्या कसरतीनंतर हा अंगावर येणारा चढ चढणं म्हणजे ओल्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं होतं. कष्टानेच एक एक पाऊल पुढे रेटत आम्ही एक टप्पा पार केला.

दुसऱ्या टप्प्याची चढाई सुरू झाली आणि वर आकाशात मेघांची चादर जोरदार वाऱ्यांसोबत पुढे सरकू लागली. अचानक काळवंडून आलं. अजिबात न थांबता आम्ही अखंड चढत एकदाचे सिंगापूर नाळेत पोहोचलो. पाच-दहा मिनिटे नाळेत चढून मग उजवीकडच्या टेपाडाच्या पोटातून आडवं चालत जाऊन पठार गाठायचं होतं. आम्ही आडव्या वाटेला लागलो आणि धो धो पावसाला सुरुवात झाली. जेमतेम एक पाऊल बसेल एवढय़ा अरुंद वाटेवर अंधारात एका हातात टॉर्च पकडून दुसऱ्या हाताने कसंबसं दगडांना धरत आम्ही हळूहळू पुढं सरकू लागलो. एव्हाना आमच्यातले काही भिडू पार गळपटले होते. एकूणच चालण्याची गती पार मंदावली होती. ओल्या, निसरडय़ा झालेल्या दगडांवरून तोल सांभाळत पठारावर पोहोचायला बराच वेळ लागला. पठारावर पोहोचलो की सिंगापूर गाव नजरेच्या टप्प्यात येईल ही वेडी आशा पठारावरून चहुबाजूला पसरलेलं अंधाराचे साम्राज्य पाहून पुरती धुळीला मिळाली. पठारावरील ओढा ओलांडून पलीकडील गवतातून चढत जाणाऱ्या पायवाटेने चालत राहिलो. ओलेचिंब झालेल्या शरीरावर पठारावरचे झोंबरे वारे अधिकच बोचू लागले. ढेपाळलेले जीव पाय ओढत चालत होते. एक टेपाड चढून आम्ही शेताच्या पट्टय़ात आलो, पण गाव कुठं  दिसत नव्हतं. गाव जवळपास असेल तर कुठंतरी मिणमिणता का होईना एखादा तरी दिवा दिसतो, कुठं कुत्र्यांचे आवाज येतात. पण इथं तर नुसतं काळोखाचं साम्राज्य आणि चहूकडे पसरली होती स्मशान शांतता. शेतामागून शेतं पार करूनही गावाचं काही चिन्ह दिसत नव्हतं. आपण चुकीची वाट तर धरली नाही ना, हा विचार करीत असतानाच समोर एक झाप दिसला. त्याच्या पलीकडची चढण ओलांडून अखेर आम्ही गावात दाखल झालो. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे गावातली बत्ती गुल झाली होती. आणि अचानक आलेल्या पावसामुळे सगळी मंडळी घरात चिडीचूप बसली होती. त्यामुळेच गावात अजिबात जाग नव्हती. समोरच्या एका घरात पडवीत जळणाऱ्या शेकोटीने आम्हाला जरा उबेची जाणीव करून दिली. थंडीने कुडकुडलेल्या जीवांनी शेकोटीकडे धाव घेतली. घरातील दादांना आम्ही कोण, कुठून आलो, वगैरे सांगितलं. आता अशा पावसात हरपूडला जाण्यासाठी मदत हवी होती, वाटाडय़ा हवा होता. दादा स्वत: आमच्यासोबत यायला तयार झाले. पण अचानक आलेल्या पावसाने गावात दसऱ्याचा सण अजून साजरा व्हायचा होता. तेवढं झालं की निघू म्हणाले.

शेकोटीशेजारी बसून जरा ऊब मिळाल्यावर पोटात उसळलेल्या आगडोंबाची जाणीव होऊ लागली. रात्री दहा वाजता गावात कोणी काही शिजवून द्यावं अशी अपेक्षा करणंही चुकीचं होतं. दुपारच्या भाकऱ्या शिल्लक होत्या. मावशींनी पटकन झुणका बनवून दिला. एक एक भाकरी आणि झुणका, कांद्यासोबत पोटात गेल्यावर दमलेल्या जिवांना जरा तरतरी आली. तोपर्यंत ढोल बडवण्याचा आवाज येऊ लागला. गावातल्या दसऱ्याचं साजरीकरण सुरू झालं होतं. गावकरी मंडळी ढोल बडवत, टाळ वाजवत गावातील प्रत्येक घरासमोर जात होती, हळद कुंकू गुलाल लावूून आपटय़ाच्या पानांची देवाणघेवाण होत होती. थोरामोठय़ांचे आशीर्वाद घेऊन मग ढोल बडवत सगळे अंगणात िरगण करून नाचत होते. वरात आमच्या दारात आल्यावर आम्हीही या जलशात जल्लोषात सामील झालो. पाय मोडेस्तोवर चालून आलेला थकवा ढोलकीच्या तालावर नाचताना अजिबात जाणवत नव्हता. उलट सगळा थकवा कुठच्या कुठे पळून गेला होता. गावकरी पुढच्या घरी सरकले आणि दादा सोबतीला आणखी एका मामांना घेऊन आले. सिंगापूर गावातून चढून आम्ही मोहोरी-केळद िखडीच्या रस्त्यावर आलो. समोरच्या डोंगरधारेवरून उतरून पुढचं टेपाड चढायला लागलो. पाऊस थांबला असला तरी गार वारे अंगाला झोंबत होते. हरपुड गावात पोहोचलो तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते. गावात गाडी असणार या विश्वासाने आसुसले जीव गाडी शोधू लागले. पण गाडीचा पत्ताच नव्हता. कितीही उशीर झाला तरी अमोल आम्हाला सोडून जाणार नव्हता. पण गाडी हरपुडात नव्हती. आमच्या आगमनाने जागे झालेल्या कुत्र्यांच्या गोंधळामुळे  एक-दोन उठून गावकरी घराबाहेर आले होते. त्यांच्यातील एकाने आम्हाला सांगितलं की त्याने अशी गाडी वारोती गावात पाहिली होती. वारोती ते हरपुड रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे, रस्त्यावर खडी पसरून ठेवली असून त्यामुळे गाडी येऊ शकली नसेल अशी शक्यता त्याने वर्तवली.  अजून चार किलोमीटर तंगडतोड करावी लागणार होती तर.

सिंगापूरच्या दादांना निरोप देऊन आम्ही वारोतीच्या रस्त्याला लागलो. रस्त्यावर पसरलेली खडी पायाला टोचत होती. सगळेच प्रचंड दमले होते, पण कोणी एक शब्दानेही कुरकुर करत नव्हतं. शांतपणे चालत वारोतीत पोहोचायला आणखी एक तास लागला. गाडी जिथपर्यंत येऊ शकत होती तिथपर्यंत आणून अमोल गाडीतच झोपला होता. पावसामुळे मोबाइलची रेंज गेली होती.

‘किती उशीर केलात, आता दुसऱ्या दिवशीच्या भाडय़ाचे वांदे होणार’ वगरे कोणत्याही तक्रारी न करता अमोलने लगेच गाडी काढली. पुढच्या दहा मिनिटांत दमलेले साथीदार निद्राधीन झाले.

या ट्रेकने अनेक धडे शिकवले. आग्या नाळेत डोहाजवळ उगाच वेळ वाया गेला नसता तर कदाचित पाऊस सुरू व्हायच्या आत आम्ही वर चढून आलो असतो, आणि मग हा सगळा त्रास टळला असता. नाळेतून उतरताना वाटेत डोह लागले तर बहुतेक वेळा तो नाळेचा शेवट नसतो, नाळेत आणखी टप्पे असू शकण्याचे ते संकेत असतात. ट्रेक करताना शारीरिक क्षमतेइतकीच इच्छाशक्ती महत्त्वाची असते. आमच्या तंगडतोडीत शारीरिक क्षमतेपेक्षा इच्छाशक्तीचा वाटा अधिक होता. डोंगरात माहीत नसलेल्या वाटा हुडकताना सोबतचे सवंगडी हे अचानक येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्याप्रमाणे प्लानमध्ये होणाऱ्या बदलाशी जुळवून घेऊ शकतील, साथ देऊ शकतील इतके समंजस आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. आमच्यातल्या एका जरी गडय़ाने अध्र्या वाटेत माघार घेतली असती तर जंगलात रात्र काढण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नव्हतं. अर्थातच डोंगर कायमच भरपूर शिकवत असतो आणि ही शिकवण पुढे कामी येत असते. गेल्या चार वर्षांच्या घाटवाटांच्या भटकंतीत हा अनुभव पदोपदी लक्षात राहिला आहे. आग्या नाळ आणि सिंगापूर नाळेचा ट्रेक म्हटला तर तसा धोपट मार्ग, पण त्याने भविष्यात बिकट वाटांवर जाण्याची ऊर्मी चेतवली हे मान्य करायला हवं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2017 1:01 am

Web Title: raigad trek
Just Now!
X