तुम्ही मतदानासाठी पाचशे रुपये कोणाकडूनही घ्या, पण मतदान मात्र भाजपलाच करा असे वादग्रस्त विधान संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले आहे. पणजीजवळील प्रचारसभेत ते बोलत होते.

गोवामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरही राज्यात प्रचारसभा घेत आहेत. पणजीजवळील चिंबेलमधील झोपडपट्टी असलेल्या भागात पर्रिकर यांची प्रचारसभा होती. या प्रचारसभेत पर्रिकर म्हणाले, निवडणुकीच्या काळात तुम्ही उमेदवारासोबत फिरण्यासाठी पाचशे रुपये घेतले तर यात मला काही गैर वाटणार नाही. पण तुम्ही जेव्हा मतदानाला जाल त्यावेळी कमळचे बटण दाबा असे आवाहन त्यांनी केले.

विशेष म्हणजे पर्रिकर यांच्याआधी अरविंद केजरीवाल यांनीदेखील असेच विधान केले होते. ‘काँग्रेस आणि भाजपकडून मतदारांनी पैसे घ्यावेत. मात्र मतदान आम आदमी पक्षालाच करावे,’ असे वादग्रस्त वक्तव्य केजरीवाल यांनी केले होते. यामुळे लोकप्रतिनिधित्व कायद्याचा भंग झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यामुळे कायद्यातील अनुच्छेद १२३(१), १७१(बी), १७१(ई) यांचा भंग झाल्याने केजरीवाल यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते. हा वाद ताजा असतानाच पर्रिकर यांनीदेखील याच स्वरुपाचे विधान केल्याने आता त्यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अरविंद केजरीवाल यांनीदेखील पर्रिकर यांच्या विधानावर टीका केली आहे. आता निवडणूक आयोगाने पर्रिकर यांच्या कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. निवडणूक आयोग पर्रिकर यांच्यावर कारवाई करण्याची धमक दाखवेल का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान कार्यालय आणि निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.