News Flash

राजयोग

राजयोग येणार म्हणजे निवृत्तीच्या आयुष्यात नेमकं काय होणार, हा प्रश्न मला बरेच दिवस भेडसावत होता.

निवृत्ती आयुष्यात कशाची तरी वाट बघत होता. हे वाट बघणं बसस्टॉपवर बसून बसची वाट बघणं किंवा कुठल्यातरी बागेत, कॉफी शॉपमध्ये प्रेयसीची वाट बघत बसणं एवढं सरळ नव्हतं. माणूस आयुष्यात कशाची ना कशाची तरी वाट बघतच असतो. बेकारी नोकरीची वाट बघते. इच्छाशक्ती योग्य संधीची वाट बघते. उत्सुकता रिझल्टची वाट बघते. वय उलटून गेलेले योग्य जोडीदाराची, तर अनेक वेळा प्रेमात आपटी खाऊनसुद्धा प्रेमवीर एखाद्या नवीन प्रेयसीची वाट बघतच असतात. कुंभार रखरखीत उन्हाची, तर शेतकरी पावसाची वाट बघतो. श्रीमंत अजून श्रीमंत होण्याची वाट बघतात, तर गरीब श्रीमंत होण्याची वाट बघतात. एखादी गर्भवती स्त्री प्रसूतीवेदना संपण्याची वाट बघत असेल, किंवा एखादी नवविवाहित या प्रसूतीवेदना कधी येणार याची वाट बघत असेल. फार अवघड कशाला, काही लोक दिवस उजाडायची, तर काही दिवस मावळायची वाट बघत असतात. वाट बघणं नैसर्गिक आहे. मानवी आयुष्याचा तो अविभाज्य, अटळ भाग आहे. मी म्हणतो, काहीजण मृगजळाचीसुद्धा वाट बघत असतील. पण जी गोष्ट अस्तित्वात आहे की नाही, हेच माहीत नाही अशा कुठल्या गोष्टीची वाट बघणं शक्य आहे?
अजून ज्या कुठल्या गोष्टींची वाट बघितली जाऊ शकते, त्यातल्या कुणाचीच निवृत्ती वाट बघत नव्हता. निवृत्ती वाट बघत होता राजयोगाची! त्याला कुठल्यातरी ज्योतिषाने म्हणे असं सांगितलं होतं की, तुझ्या पत्रिकेत राजयोग आहे. आणि असा योग कधीतरी आपल्या आयुष्यात येईल म्हणून तो स्वत:च्या नावाप्रमाणे ऐन तारुण्यात सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्यांतून निवृत्ती स्वीकारल्यासारखा वागत होता आणि राजयोगाची वाट बघत होता. खरे तर तो वाट बघत नव्हता, तर वाट लावत होता. तो काहीच उद्योग करत नसे. शिक्षण बेताचं. घरची परिस्थितीही जेमतेमच. एकूण सगळ्याच बाबतीत त्याचा आवाका फार काही असामान्य नव्हता. पण माणूस प्रेमळ होता. दुसऱ्याला मदत करणारा, सुस्वभावी होता. साधेपणात विनोबा भावेंनासुद्धा मागे टाकणारा होता. मनापासून करायला देवाची पूजा तो नित्यनेमाने करत असे. हा पूजा करताना देवसुद्धा कंटाळून, थकून झोपी जात असावेत. त्यांना झोपवूनच निवृत्ती पूजा आवरती घेत असे. घरात जुन्या कुठल्यातरी देवांच्या तसबिरी लावल्या होत्या. त्या तसबिरींवर धूळ साठलेली होती की रंग उडाले होते, हे कळत नव्हतं. त्यामुळे मग ते नक्की देवच आहेत की अजून कुणाचे (नट-नटय़ांचे किंवा पूर्वजांचे) फोटो आहेत, तेही कळायचं नाही. केवळ त्याच्या सांगण्यावरून त्या देवांच्या तसबिरी आहेत यावर मी विश्वास ठेवला होता. बरं त्या एवढय़ा होत्या, की नुसत्या मोजता मोजता नजरेखालून गेल्या तरी अंगात आळस संचारून डुलकी लागली असती. निवृत्तीची पूजा करायची पद्धतही भयानक कंटाळा आणणारी होती. घराच्या खिडक्या-दारं, बेल बंद करून, टेलिफोनचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवून, कानात कापसाचे बोळे कोंबून रोज तीन- तीन तास पूजा चालत असे.
दुपारच्या झोपेबाबतीतही हेच धोरण होतं निवृत्तीचं. ‘सगळं बंद करून कसला झोपतोस? कुणी गेलं तरी कळवायची सोय नाही या आधुनिक युगात.’ आम्ही मित्र दुपारच्या झोपेवरून त्याला फारच बोलत असू. म्हणून मग त्याने स्वत:ला असा कुठलातरी आजार झाल्याचं जाहीर केलं- की ज्यात रात्रीच्या झोपेव्यतिरिक्त अजून सहा तास झोप घेणं आवश्यक होतं. कुणी काही बोलायला लागलं की खिशातून डॉक्टरांनी झोपेच्या बाबतीत लिहून दिलेलं मेडिकल सर्टिफिकेट तो आमच्यासमोर नाचवत असे. आम्हा मित्रांना ते सहज पटण्यासारखं नव्हतं. मग आम्ही सगळ्यांनी वर्गणी काढून त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्याचं ठरवलं. त्यास काही निवृत्ती तयार होईना. ‘माझ्या डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगितलं आहे. हा देह जर नीट चालवायचा असेल आणि शरीराची झीज जर नीट भरून काढायची असेल तर जास्तीत जास्त विश्रांती आवश्यक आहे. नाहीतर आजार फोफावेल आणि लवकर मरण ओढवेल. मला डॉक्टरांच्या निर्णयाचा अनादर करायचा नाही..’ वगैरे सांगून त्याने आमच्या तोंडाला पानं पुसली होती. पण काही चतुर मित्रांचं म्हणणं होतं की, त्याने ‘मी रात्रंदिवस खाणीत काम करतो,’ असं सांगून डॉक्टरला गंडवलं असणार. नाहीतर शरीराची झीज वगैरे शब्द डॉक्टर याच्याबाबतीत कशाला वापरतील? आम्ही म्हणायचो, ‘पण तू देह चालवतोयस कुठे शरीराची झीज व्हायला? तो तर सतत पलंगावरच्या गादीतला कापूस झिजवत अंथरुणावर लवंडलेला असतो- राजयोगाची स्वप्नं बघत.’
राजयोग येणार म्हणजे निवृत्तीच्या आयुष्यात नेमकं काय होणार, हा प्रश्न मला बरेच दिवस भेडसावत होता. ‘राजयोग म्हणजे राजासारखं आयुष्य जगायला मिळणार त्याला!’ असा खुलासा कुणीतरी केला होता; पण मला काही केल्या कुठल्या राजासारखं आयुष्य या निवृत्तीच्या नशिबी असू शकेल असा कुणी राजाच डोळ्यांपुढे येईना. निवृत्ती भविष्यात कधी राजा झालाच तर कसं वाटेल त्याला राजाच्या पोशाखात बघायला- याची काही केल्या आमच्यापैकी कुठल्याच मित्राला कल्पना करता येत नव्हती. अगदी टाय-सूट जरी निवृत्तीने घातला असता तरी फडक्यात चक्का बांधून खुंटीवर टांगून ठेवल्यासारखा दिसला असता तो. ऐन तारुण्यातही खूप दिवस ठेवून ठेवून शिळ्या झालेल्या फुग्यासारखी पर्सनॅलिटी होती त्याची. अगदी स्वच्छ आंघोळ केल्यानंतरसुद्धा शेणाने सारवलेल्या भिंतीवर बरेच दिवस दुर्लक्ष केल्यामुळे एखादी गोवर चिकटून राहते तसं वाटत असे त्याला बघितल्यावर. आता अशी गोवर कितीही सजवली तरी ती सोन्याची होणार नाही. ती शेणाचीच राहणार. पण त्याच्या गप्पा मात्र कुणीतरी विद्वत्ताप्रचूर धर्मोपदेशक बोलतोय अशा असत. निवृत्तीला डोळ्यासमोर ठेवून एका मित्राने राजयोगाची एक सोपी व्याख्या मला सांगितली होती. एखाद्या भिकाऱ्याला जर रोज चार आणे मिळत असतील आणि एखाद् दिवशी जर अचानक त्याला रुपया मिळाला, तर तो दिवस म्हणजे त्याच्यासाठी राजयोगच!
एक दिवस इराण्याच्या हॉटेलमध्ये निवृत्तीशी दिलखुलास गप्पा मारण्याचा माझा करमणूकयोग आला. ‘राजयोग म्हणजे काय रे?’ या प्रश्नाभोवतीच चर्चा फिरणार होती हे लक्षात घेऊन मी काही प्रश्न मनात तयार ठेवले. ‘प्रत्यक्ष राजा होण्याचा योग, ते वैभव, ती सत्ता, ते सामथ्र्य माझ्या पायाशी लोळण घेणार आहे एक दिवस. (त्याच्या या बोलण्याचा काही मित्रांवर खरोखरीच परिणाम झाला होता. चुकून जर हा वेडा राजा झालाच, तर आपले संबंध सौहार्दपूर्ण असलेले बरे म्हणून काही मित्र त्याची खुशामत करायचे. आणि हा महामूर्ख राजयोगाचा अजूनच पसारा वाढवायचा.) अरे, असं एवढय़ा सहजासहजी विनाकारण वरचेवर भेटू शकणार नाहीस तू मला. माझी वाट बघायला लागेल तुला.’ (‘पण मला तुला उगीच विनाकारण भेटायची इच्छाच नाहीये. आणि वरचेवर तर मुळीच नाही. माझा वेळ अजिबात जात नसेल तर टाइमपास करायला आपण भेटणार फार फार तर!’ – माझ्या मनातलं वाक्य!) ‘दास-दासी, नोकर-चाकर यांनी सतत वेढलेला असणार मी.’ (मला वाटलं, ‘मी कामात खूप बिझी असणार म्हणून भेटणार नाही’ म्हणतोय की काय? राजाचा पराक्रम, धाडस वगैरे शब्द चुकूनही निवृत्तीच्या मनात येत नसत.) ‘पण मी काय म्हणतो- तो जो कुठला योग आहे तो येईल तेव्हा येईल. तोपर्यंत एखादी नोकरी का नाही करत?’ मी आपलं माझ्या मिड्लक्लास विचारांनी थोडंसं खाजवून बघितलं. ‘मूर्ख आहेस!’ (राजांची सिंहगर्जना) ‘अरे, एकदा का माझ्या नशिबी राजाचं जीणं आलं की अवघड जाईल मला ते. जर माझा भूतकाळ कोणी तपासलाच तर काय सांगायचं- काय करत होते निवृत्ती यापूर्वी? तर काय दीडदमडीची नोकरी! (पण मग ‘काहीच करत नव्हते. रस्त्यांवरच्या वांझ गायींसारखं गावभर उंडारत होते. हे तर किती लाजिरवाणं आहे.’ मनात- फक्त मनात.) ‘अरे, इतिहास लिहिला जाणार माझा. (डोक्यावर परिणाम झाल्याचं कुठं डोळ्यात दिसतय का ते मी बघायला लागलो.) तेवढं सोप नाहीये ते.’
‘पण असं कधी कुणाचं काही झालंय असं ऐकलं आहेस का तू?’
‘अशी माणसं सारखी सारखी जन्म घेत नसतात. हजार वर्षांतून एकदा कधीतरी ती धरतीवर अवतरतात. म्हणूनच त्याला राजयोग म्हणतात. (आता हजार र्वष मागे जाऊन मी काही खरं-खोटं तपासणार नाही, हा कॉन्फिडन्स त्याच्या डोळ्यांत चमकून गेला.) आरामदायी, वैभवसंपन्न आयुष्य. म्हणेल ती इच्छा पूर्ण होतीये. धनप्राप्तीसाठी वणवण करावी लागत नाहीये.. असं असतं ते सगळं. हे असं तुमच्यासारखी उद्याची भ्रांत नाही. गाडीत पेट्रोल किती लिटर भरू? मोठय़ा हॉटेलपेक्षा इराण्याकडेच चहा पिऊ. (चहाचा तिसरा कप नरडय़ाखाली उतरवत निवृत्ती हे वाक्य बोलत होता.) कपडे लॉन्ड्रीत कशाला? घरीच इस्त्री करू. द्राक्षं नको, केळीच खाऊ. कोिल्ड्रक नको, पाणीच पिऊ. बर्गर नको, वडापावच खाऊ. खिशात नोटा नको, नाणीच ठेवू.. वगैरे फालतू प्रश्न पडणारच नाहीत. (वाऽ! हा असा योग या बेअक्कल निवृत्तीऐवजी माझ्या आयुष्यात येईल तर काय बहार येईल! निवृत्तीच्या ज्योतिषाला निदान एकदा तरी भेटून येण्याचा मोह मला होऊ लागला.)
‘अरे, पण आत्तासुद्धा वैभवसंपन्न नसलं तरी आरामदायी आहेच की तुझं आयुष्य! कदाचित तू म्हणतोयस तो योग आला असेल आणि तुला कळलंच नसेल तर? किंवा मग तू एवढी वाट बघतोयस बघून कंटाळा करत असेल तुझ्याकडे यायला?’ मी उगाच माझ्या परीने त्याचे पंख छाटण्याचे प्रयत्न करत होतो. त्याची इच्छा चांगलीच होती. पण आता बेडकाला जर गरूडभरारीची स्वप्नं पडायला लागली तर त्याला काय शाबासकी देणार?
‘अरे, हा योग काही लपतछपत येत नाही काही. दिवाळी आलेली समजते की नाही तुला? की एखाद् वर्षी कंटाळा करते ती यायला? अरेच्चा! या वर्षी दिवाळी येऊन गेली आणि समजलंच नाही असं झालंय का कधी?’ (खरं तर हल्ली व्हायला लागलंय तसं.)
‘बरं, मग काय करणार राजयोग आल्यावर?’ माझा अजून एक बावळट प्रश्न.
‘काय करणार म्हणजे? अरे, वैभवात लोळणार नुसता. विचार कर- सकाळी उठल्यापासूनच तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी आजूबाजूचे लोक धडपडतायत. तुम्हाला आराम मिळावा म्हणून काळजी घेतायत. अजून काय हवं सांग?’ (परत तेच- आराम करणार, लोळणार, दास-दासी.. एवढंच बोलत होता निवृत्ती.)
हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की, स्वत:च्या आळशीपणाला एक छान नाव दिलं आहे त्याने. राजयोग! ही गोष्ट अस्तित्वात आहे की नाही हेसुद्धा नक्की माहीत नाही; पण निवृत्ती मात्र वाट बघत होता. मला अचानक माझं एक काम आठवलं. मला काही कर्तव्ययोग चुकणार नव्हता- त्यामुळे मी म्हणालो, ‘चला निघू या.’
मोठय़ा रूबाबातच महाराज उठले. चहाचं बिलही मीच दिलं. कारण ‘असली फालतू बिलं माझ्याकडे मागायला लाज नाही वाटत?’ असा काहीतरी आवेश होता महाराजांचा. हॉटेलमधून बाहेर पडून पेट्रोलसाठी माझ्याकडूनच पन्नास रुपये घेऊन भ्रमंतीयोगाकडे महाराज रवाना झाले. प्रजेला लुबाडणारा राजा होणार हा- असं तात्काळ माझं मत झालं.
एक दिवस डोक्यावर वीज कोसळावी अशी एक बातमी ऐकून माझा चेहरा वाकडातिकडाच झाला. भविष्यात वाकडय़ा चेहऱ्याने अभिनय करायला लागला तर तो कसा दिसेल, ते यानिमित्ताने वारंवार आरशात बघून चेहऱ्याचं नीट निरीक्षण करून घेतलं. ही मुलगी कुठल्या पुराणकथेतून आली आहे की काय? त्या असतात ना शापित अप्सरा! अमूकतमूक माणसाशी जर लग्न करून संसार केलास, तरच तुझी शापातून मुक्तता होईल. कोण असेल आणि किती विचित्र असेल ती कन्या- हे बघण्यासाठी आम्हा मित्रांची झुंबड उडाली. पण आमचा फारच अपेक्षाभंग झाला. नाक, कान, डोळे जागच्या जागी आणि नीटस असलेली ती एक गोड स्वभावाची कन्या होती. तिच्या शेजारी निवृत्ती म्हणजे हिरव्यागार मेथीच्या गड्डीच्या खाली चिखलाने माखलेली मुळं दिसतात तसा तो दिसत होता. तो देखावा बघून तर मी उडालोच. राजयोग का काय म्हणतोय निवृत्ती तो बहुधा हाच. वाळवंटात ब्रह्मकमळ उगवलेलं बघून जसे डोळे विस्फारले जातील तशी सगळ्यांची स्थिती झाली होती. एकूण कर्तृत्व, आर्थिक स्थिती तरी कमीत कमी मुली बघतात, असं मी ऐकून होतो. प्रेम आंधळं असतं, हे पण ऐकून होतो. पण ते बिनडोक आणि उथळ असतं हे प्रथमच बघत होतो. शिवाय निवृत्ती दिसायलाही वयाने मोठा दिसत असे. कुणा मित्राच्या घरी तो गेला असताना त्या मित्राच्या आज्जीने त्याला लाडू खायला दिला आणि ‘चावेल ना?’ असा प्रश्न विचारला होता. यावरून त्याच्या मोठं दिसण्याची कल्पना येऊ शकते. आम्ही चेष्टेने ‘पांडव तुला ज्युनियर असतील ना? तुला निवृत्तीआजोबा म्हणत असतील ना?’ वगैरे चिडवायचो. निवृत्ती जर नाटकात असेल तर आपला प्रेक्षक हा आबालवृद्ध असणारच असे सगळे म्हणायचे. आबाल बाकी सगळ्यांचे प्रेक्षक आणि सगळे वृद्ध निवृत्तीचे प्रेक्षक. काही वृद्ध महिलांनी निवृत्तीचं काम आवडलं म्हणून त्याला फ्लाइंग किस दिलं.. काहींच्या तर फ्लाइंग किस देता देता कवळ्या पडल्या, वगैरे काल्पनिक कथाही काही मित्रांनी प्रसिद्ध केल्या होत्या.
पण निवृत्ती मनाने एकदम राजामाणूस असल्याने कदाचित हे भाग्य त्याच्या नशिबी आलं असेल. कमीत कमी राजयोग सोडून भोगयोगाकडे निवृत्तीची गाडी वळली यातच आम्हा काही मित्रांना समाधान होतं.
काही दिवस असेच निघून गेले. आणि अचानक डोक्यावर आभाळच कोसळलं. निवृत्ती एका हॉटेलमध्ये काम करायला लागला- अशी बातमी कानावर आली. आता मात्र कमालच झाली. पण म्हणजे काय काम, कसलं काम, कुठलं हॉटेल.. एक ना दोन, अनेक प्रश्न मनात पॉपकॉर्नसारखे उडत होते. इतके दिवस स्वत:विषयी त्याने तयार केलेल्या प्रतिमेला प्रत्येकाच्या मनात तडा जात होता. कुणीच या बातमीवर विश्वास ठेवायला तयार होईना. या प्रकरणाची खात्री करावी म्हणून एक दिवस आम्ही दोघं-तिघं मित्र त्या हॉटेलमध्ये गेलो, तर खरंच निवृत्ती गल्ल्यावर बसून पैसे मोजत होता. माझ्या मनात आलं- आता याची इतिहासात काय नोंद होणार आहे? पण काही का असेना, निवृत्ती कामाला लागला ही गोष्टच पुरेसा आनंद देणारी होती. त्याला केवळ दुपारच्या वेळी काम करताना बघायला मिळावं म्हणून काही मित्र पुण्याच्या कानाकोपऱ्यातून येऊन त्या हॉटेलमध्ये हजेरी लावायला लागले. निवृत्ती काही आयुष्यभर तिथे काम करणार नव्हता. पण कुठलं का होईना, काम करण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण होणं खूप आवश्यक होतं. आणि त्या कुठल्याशा मुलीने ते करून दाखवलं होतं. आयुष्यात स्त्री आली की तुमचं आयुष्य बदलतं, हे मी पुस्तकातल्या गोष्टींमध्ये वाचलं होतं. चित्रपटांतून पाहिलं होतं. पण प्रत्यक्ष मी आत्ताच बघत होतो. आता प्रश्न होता- की हे किती दिवस टिकणार?
आणि जे व्हायचं तेच झालं. हळूहळू दुपारची झोप निवृत्तीला खुणवायला लागली. कामावर विनाकारण बुट्टी मारायला लागला. हे काम आवडत नसेल म्हणून मित्रांनी कामाचे दुसरे पर्याय सुचवले. ते त्याने धुडकावून लावले. त्याचं मन त्या हॉटेलच्या गल्ल्यावर बसून राजयोगाची वाट बघत होतं. परत जुन्या वाटेवरच निवृत्ती परतला. ती जी कोणी कन्या होती, तिनेही थोडे दिवस निवृत्तीची वाट बघून शेवटी वेगळ्या रस्त्याची निवड केली आणि ती कायमची निघून गेली. सगळ्यांनीच आपापला रस्ता पकडला आणि कामानिमित्त ते जगभर कुठे कुठे विखुरले गेले.
बरीच र्वष लोटल्यानंतर मधे एकदा खूप वर्षांनी निवृत्तीची गाठ पडली. तो तसाच होता- जसा काही वर्षांपूर्वी होता. तेव्हाही वृद्ध दिसायचा, आजही तसाच दिसत होता. मग आम्ही त्याच इराण्याच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला बसलो. नात्यातल्याच कुठल्यातरी मुलीशी त्याचं लग्न झालं असून निवृत्ती आता बाप झालाय, ही महत्त्वपूर्ण बातमी हाती आली.
‘तू पुण्यात काय करतोयस?’ निवृत्तीने विचारलं. मी म्हणालो, ‘माझा कारयोग आला. नवीन कार घेतलीये. तिची डिलिव्हरी घ्यायला आलोय.’ मी उगाच गंमत म्हणून विषय काढला- ‘काय रे निवृत्ती, तुझ्या राजयोगाचं काय झालं?’ रेडियोचं एखादं स्टेशन अचानक टय़ून होऊन सुरू व्हावं तसा निवृत्ती अव्याहतपणे सुरू झाला.. ‘अरे म्हणजे काय, एक ना एक दिवस येणारच तो. पत्रिकेतच लिहिलं आहे तसं.’
आणि परत तेच सगळं पुन्हा एकदा सुरू झालं. माझ्या स्वत:च्या हाताने दगड मारून मी पाणी गढूळ केलं होतं. माझ्या लक्षात आलं, माझा नाइलाजयोग सुरू झाला आहे. आता पुन्हा सगळं ऐकून घेतल्याशिवाय पर्याय नाही.
निखिल रत्नपारखी – nratna1212@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 1:01 am

Web Title: opportunities to become prince
Next Stories
1 अतूट
2 देव जरी मज कधी भेटला..
3 नावात काय नाही?
Just Now!
X