26 January 2020

News Flash

Holi 2017 : घरच्याघरी नैसर्गिक रंग कसे बनवाल!

कृत्रिम रंग वापरुन आरोग्य धोक्यात टाकायचे नाही

मागील एक-दोन दशकांमध्ये रंगपंचमीच्या नावावर रंग खेळण्याचा तो धिंगाणा रस्त्यांवर आणि वसाहतीमध्ये चालू असतो, ते पाहता हे सण-संस्कृतीचे कोणते रुप आहे? हा खरोखरच आपल्या सण-संस्कृतीचाच भाग आहे काय? अशी शंका कोणत्याही शहाण्या माणसाच्या मानात येते. तीन-चार दशकांपूर्वी अतिश्रीमंतांपर्यंत आणि विशिष्ट समाजापर्यंत मर्यादित असणारा हा रंग खेळण्याचा तमाशा त्यांच्या पावलावर पाऊल टाकता-टाकता आपण कधी अनुसरु लागलो, ते आपल्याला कळले सुद्धा नाही. बरं, हा रंग खेळण्याचा शरीरावर होणारा परिणाम त्या एका दिवसांपर्यंत मर्यादित असता, तरी एकवेळ चालले असते. मात्र हे विचित्र व गडद प्रकारचे रंग तयार करण्यासाठी ज्या घातक पदार्थांचा वापर केला जातो, त्यामुळे शरीरावर होणारे विषाक्त परिणाम हे त्या एक दिवशीच नव्हे तर पुढचे अनेक दिवस त्रास देत राहतात,काही वेळा गंभीर अपाय सुद्धा करतात.

तोंडे वेगवेगळ्या रंगांनी माकडांसारखी रंगवून कळपाने फिरणा-या या मुला-मुलींना आपण तोंडावर काय फासले आहे, याची कल्पना तरी असते काय? हे चकाकणारे गडद रंग बनवण्यासाठी मुख्यत्वे वापरतात : वापरुन जुने झालेले डिझेल, जुने इंजिनऑईल, कोळशाची किंवा विटेची पूड, डांबर, वगैरे. आणि वेगवेगळे गडद रंग कशाचे बनतात माहीत आहे? जांभळा रंग बनतो क्रोमिअम आयोडाईडपासून, काळा रंग तयार करण्यासाठी वापरतात लेड ऑक्साईड, हिरवा रंग तयार होतो कॉपर सल्फेटपासून, -मर्क्युरीसल्फाईटपासून बनतो लाल, चमकणारा चंदेरी रंग तयार करण्यासाठी वापरतात अमोनिअम ब्रोमाईड, वगैरे. आता ही केमिकल्स आरोग्याला हानिकारक असतात, हे काही वाचकांना वेगळे सांगायला नको.

डिझेल किंवा ऑईल आपल्या त्वचेला लावण्याची हिंमत आपण एरवी कधी तरी करु काय? संपूर्ण वर्षभर आपला चेहरा सुंदर दिसावा म्हणून नाना उपाय करणार्‍या, चेह-यावर वेगवेगळी क्रीम्स, जेल्स, स्क्रब्स चोपडणा-या या मुला-मुलींना रंगपंचमीच्या एकाच दिवसात चेहर्‍याला रंग फासून आपण आपल्या त्वचेचा सत्यानाश करतोय, ते कसे कळत नाही. हे झाले त्वचा आणी सौंदर्याबद्दल, आरोग्याला होणारे धोके तर त्याहुनही भयंकर आहेत.

या रंगांमधील केमिकल्स तोंडात गेल्यामुळे मळमळ, उलट्या, जुलाब होऊ शकतात तर श्वासावाटे फुफ्फुसांत गेल्याने दमा-खोकल्याचा त्रास होतो. काही वेळा तर परिस्थिती गंभीर झाल्यामुळे हॉस्पिटलला ॲडमिट करण्याची वेळ येते. रंग डोळ्यात गेल्यामुळे डोळ्यांना इजा होण्याचा क्वचित कायमचा दॄष्टीदोष होण्याचा,इतकंच नव्हे तर आंशिक किंवा पूर्ण अंधत्व येण्याचीही शक्यता असते. याहुनही गंभीर बाब म्हणजे रंगपंचमीला वापरल्या जाणार्‍या रंगांमधील घातक केमिकल्समुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोकाही संभवतो.रंगपंचमी बेरंग करु नका,वाचकहो.आणि वर दिलेले घातक दुष्परिणाम टाळायचे असतील तर नैसर्गिक रंग घरच्याघरीच बनवा.
रंगपंचमी खेळण्यासाठी केमिकल्स वा तत्सम घातक पदार्थांपासून तयार केलेले रंग वापरणे टाळलेच पाहिजे. या कृत्रिम रंगांमधील केमिकल्समुळे आणि इतर घातक पदार्थांमुळे त्वचा विद्रूप होण्याबरोबरच आरोग्यावर सुद्धा अतिशय घातक परिणाम संभवतात. मात्र याचा अर्थ रंगपंचमी साजरी करुच नये असं नाही, तर या घातक रंगांपासून दूर राहायला हवे. नैसर्गिक रंग वापरुन सुद्धा रंग खेळता येतील की! समजून घेऊ घरच्याघरी नैसर्गिक रंग कसे बनवता येतील ते.

हिरव्या रंगासाठी पालक, कोथिंबीर, पुदीना, तुळस यांची पाने वाटून छान हिरवा रंग तयार होईल. लाल रंगासाठी बीट वा टॉमेटोचा उपयोग करा. टॉमेटोचा तर थेट उपयोग करुन स्पेन या देशामध्ये आपल्या रंगपंचमीसारखा खेळ खेळला जातो (फक्त टोमेटो कुस्करुन-पिळुन मगच दुसर्‍यावर फेकायचा असतो). बीट वाटून त्याची चटणी बनवून त्यात किंचित पाणी टाकून अंगाला लावण्याजोगा रंग बनवता येईल. गुलाबी रंगासाठी कांद्याची साले पाण्यात उकळवावी व नंतर त्यामध्ये केवडा वगैरे फूल टाकून त्याचा दुर्गंध घालवावा. पिवळ्या रंगासाठी -हळकुंडाचा वा आंबेहळदीचा उपयोग करावा. हळद वा आंबेहळद पाण्यात वाटून सुंदर पिवळा रंग तयार होईल. जास्वंदीच्या फुले वाटून गडद लाल रंग बनवता येईल, तर गडद निळ्या रंगाच्या मिलेशिया फुलांच्या पाकळ्या ताज्या वाटून किंवा वाळवून निळा रंग तयार होईल. केशरी रंगासाठी झेंडुची किंवा पळसाची फुले वापरा. यांचा अतिशय मोहक रंग तयार होतो. निळसर रंगासाठी काळी द्राक्षे वापरा. लाल रंगासाठी मंजिष्ठा चूर्ण वापरा.

यामध्ये तुम्हींसुद्धा तुमच्या अनुभवाने नैसर्गिक रंगा देणार्‍या पदार्थांची भर घालू शकाल. महत्त्वाचं म्हणजे या सर्व पदार्थांपासून रंग तयार करताना त्यामध्ये थोडी मुलतानी माती व थोडे पाणी मिसळा, म्हणजे अंगावर लावण्यासारखा रंग तयार होईल. दिसेलही छान आणि त्वचासुद्धा मुलायम व सुंदर होईल. कारण हळद, मंजिष्ठा, मुलतानी माती, हे त्वचेसाठी सर्वोत्तम समजले जातात. तेव्हा ठरलं तर मग, या वर्षी नैसर्गिक रंगांचीच होळी खेळायची ,कृत्रिम रंग वापरुन आरोग्य धोक्यात टाकायचे नाही.

First Published on March 12, 2017 10:00 am

Web Title: holi 2017 all you need to know about festival of colors and how to make organic colours for holi
Next Stories
1 Holi 2017 : जाणून घ्या होळी का पेटवली जाते
2 Healthy Living : एसी कारचा प्रवास म्हणजे आजाराला निमंत्रण
3 Healthy Living : शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा!
Just Now!
X