आरोग्य दर्पण
विविध वयोगटांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन करणारे विशेष विभाग आणि आरोग्य कथा हे ‘आरोग्य दर्पण’ या दिवाळी अंकाचे वैशिष्टय़. विशेष विभागांमध्ये निर्मला रानडे आणि डॉ. माधवी वैद्य यांनी केलेले ‘स्त्रियांसाठी पुष्पौषधी’ या विषयावरील लेखन लक्षवेधी. यात नववधू, गर्भवती स्त्रिया तसेच रजोनिवृत्तीला सामोऱ्या जाणाऱ्या स्त्रियांसाठी फायदेशीर ठरू शकणाऱ्या पुष्पौषधींविषयी माहिती दिली आहे. हृदयाच्या आरोग्यासाठीही अंकात स्वतंत्र विभाग आहे. त्यात डॉ. अ. दि. फडके यांचा ‘थकणे हृदयाचे’, डॉ. जयंत बरीदे यांचा ‘अन्जायना ते योग, योग ते बायपास’ आणि अमित निर्मळे यांच्या ‘बायपास, अँजिओप्लास्टीला पर्याय’ या लेखांचा समावेश आहे. लहान मुलांचे पोषण, तान्ह्य़ा बाळांसाठी स्तनपानाचे महत्त्व, लहान मुलांवर टीव्हीचा होणारा परिणाम, बालकांमधील सर्दी खोकला आदी विषयांवर डॉ. हेमंत जोशी आणि डॉ. अर्चना जोशी यांनी लेखन केले आहे. डॉ. अरविंद संगमनेरकर यांची ‘बांगलादेशच्या युद्धभूमीवर’, श्रीकांत कुलकर्णी यांची ‘दंताजीचे ठणकणे उठले’ आणि सदानंद चांदेकर यांची ‘दीन दीन आजारपण’ या आरोग्य कथाही वाचनीय.
संपादक- अरुण जाखडे , पृष्ठे- १६०, किंमत- १०० रुपये

दीर्घायु
 ‘आहार आणि लठ्ठपणा’ या विषयांवर माहिती देणारे विशेष विभाग यंदाच्या ‘दीर्घायु’च्या दिवाळी अंकात आहेत. केतकी गुणे- कौजलगी यांनी स्त्रियांचा आहार, डॉ. शार्दुली तेरवाडकर यांनी आहाराचे नियोजन याविषयी लेखन केले आहे. आरोग्यदायी पाककृतींबरोबरच पौष्टिक सूप्सच्या पाककृतीही देण्यात आल्या आहेत. डॉ. रमेश गोडबोले यांनी ‘स्थूलपणा कसा घालवावा’, डॉ. सरिता वैद्य यांनी ‘स्थूलपणा आणि आयुर्वेद’, डॉ. प्रदीप सेठिया यांनी ‘स्थूलत्व आणि होमिओपॅथिक उपचार’, डॉ. जितेंद्र आर्य यांनी ‘लठ्ठपणा आणि निसर्गोपचार’, डॉ. नितिन उनकुले यांनी ‘लठ्ठपणा घालवा योगासनांनी’ आदी लेख लिहिले आहेत. दत्तकविधान, गर्भसंस्कार, गरोदरपणात बाळाची काळजी, मुलांचे न्याहारीचे वेळापत्रक, लसीकरण, गतिमंदांच्या शाळेची सामाजिक उपयुक्तता, स्टेम सेल थेरपी या विषयांवरील लेखही माहितीपूर्ण आहेत.
संपादक- दशरथ कुळधरण, अनघा ठोंबरे, पृष्ठे- १७६, किंमत- १०० रुपये