स्तनाचा कॅन्सर हा स्त्रियांमध्ये आढळणारा कॅन्सर असला तरी अगदी अपवादाने एखाद्या पुरुषासही स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो. असेच एक स्तनाच्या कॅन्सरचे शस्त्रकर्म झालेले ५६ वर्षांचे गृहस्थ आमच्या रुग्णालयात पुढील चिकित्सेसाठी प्रविष्ट झाले. आमच्या रुग्णालयात त्यांना केमोथेरॅपीची सहा सायकल्स व त्याबरोबरीने आयुर्वेदिक शमन चिकित्सा दिली. रुग्णाचे बल व वय अनुकूल असल्याने केमोथेरॅपीनंतर ६ महिन्यांनीच आम्ही त्यांना कफदोष, रसधातू, स्तन अवयव यांच्या शुद्धीसाठी व  पर्यायाने कॅन्सरचा दुसऱ्या स्तनात किंवा अन्य अवयवांत पुनरुद्भव होऊ नये म्हणून वमन चिकित्सा व त्यानंतर दर वर्षी वातदोषावर नियंत्रण ठेवण्यासाठी बस्ति चिकित्सा दिली. प्रतिवर्षी नियमितपणे केल्या जाणाऱ्या शरीरशुद्धीमुळे केवळ कॅन्सरच नाही, तर दुसऱ्या कोणत्याही आजाराने आज निवृत्तीनंतरही त्यांना त्रस्त केले नाही.
ऑस्ट्रेलियातील श्रीमती एलिझाबेथना ५ वर्षांपूर्वी गालावर लाल रंगाची खाज येणारी चामखीळ वाढू लागली. त्याचबरोबर संपूर्ण शरीराचीच त्वचा अतिशय कोरडी होऊ लागली. शस्त्रकर्माने चामखीळ काढली असता मेलॅनोमा म्हणजे त्वचेच्या कॅन्सरचे निदान झाले. मुळात पित्तप्रकृतीच्या आणि आता पित्तदोषाची  विकृती असलेल्या एलिझाबेथ मॅडम आमच्या रुग्णालयात आयुर्वेदिक उपचारासाठी आल्या तेव्हाच आम्ही त्यांना विरेचन देण्याचे निश्चित केले. विरेचनाच्या जोडीला शमन आयुर्वेदिक चिकित्सा, पथ्यपालन व नियमित व्यामाम यांचा अपेक्षित परिणाम झाला व त्वचेचा कोरडेपणा, गालाच्या त्वचेवरील लाल चट्टा व एकूणच अम्लपित्ताचा त्रास यांत लक्षणीय सुधारणा झाली. शमन आयुर्वेदिक औषधांबरोबर एलिझाबेथ मॅडम गेली ३ वर्षे दर वर्षी आमच्या रुग्णालयात येऊन विरेचन चिकित्सा करून घेत आहेत.
पंचकर्मापकी उपरोक्त वमन व विरेचन चिकित्सा अनुक्रमे  कफ व पित्त दोषांची दुष्टी नष्ट करण्यासाठी वरदानच आहेत.  वमन म्हणजे औषधी चाटण व काढय़ाच्या मदतीने उलटी करविणे व विरेचन म्हणजे रेचक औषधांच्या साहाय्याने जुलाब  करविणे. या दोनही चिकित्सापद्धतींमध्ये आपण शरीराला तात्पुरते थोडे कष्ट देत असलो तरी त्याचा शेवट मात्र गोड होतो. म्हणूनच या चिकित्सेसाठी शरीर व मन सक्षम करण्यासाठी त्याची पूर्वतयारीही तितक्याच समर्थपणे करावी लागते, ज्याला आयुर्वेदाने  पूर्वकर्म अशी संज्ञा दिली आहे. पूर्वकर्मात शरीरास बाहेरून व आतून स्नेहन आणि स्वेदन हे उपक्रम केले जातात. बाहय़स्नेहन  म्हणजे संपूर्ण शरीरास तिळतेल, औषधी तेल किंवा औषधी तुपाने मालिश केले जाते. आभ्यंतर स्नेहन म्हणजेच स्नेहपान हा रुग्णाने व वैद्याने अतिशय सजगतेने आचरण्याचा उपक्रम आहे. यात रुग्णाच्या कोठय़ाचा, बलाचा, अग्नीचा व व्याधीचा विचार  करून सकाळी सूर्योदयापूर्वी गायीचे तूप, तिळतेल, औषधांनी  सिद्ध केलेले तेल किंवा तूप यापकी योग्य तो स्नेह किंचित कोमट करून ठरावीक प्रमाणात रुग्णास पिण्यास दिला जातो. याचे प्रमाण रोज ठरावीक मात्रेत वाढविले जाते. महत्त्वाचा नियम  म्हणजे तेल किंवा तूप पूर्णत: पचेपर्यंत रुग्णाने केवळ गरम  पाणीच प्यायचे असते. गरम पाणी प्यायल्यावर येणारा ढेकर जोपर्यंत तेल/तुपाच्या चवीचा व वासाचा येत आहे तोपर्यंत स्नेह पचला नाही असे समजावे. शुद्ध ढेकर आला व भूक लागली की, मगच आहार सेवन करावा. स्नेह पचताना रुग्णाला थोडा  थकवा येतो, काही वेळा गरगरल्यासारखे वाटते किंवा उलटीची संवेदना होते. अशा वेळी गरम पाणी पिऊन पूर्ण विश्रांती घेणे गरजेचे असते. हा उपक्रम त्या त्या व्यक्तीच्या कोठय़ानुसार ३ ते ७ दिवस केला जातो. स्नेहपान ३ ते ७ दिवस या कालमर्यादेत किती दिवस द्यायचे हे त्या व्यक्तीला स्नेहपान सम्यक म्हणजे  परिपूर्ण झाल्याची लक्षणे दिसेपर्यंत चालू ठेवले जाते. मलप्रवृत्तीसह तेल/तूप पडणे, मल पांढऱ्या रंगाचा होणे, संपूर्ण शरीराच्या त्वचेस तुकतुकी जाणवणे, तेल किंवा तुपाचा तिटकारा येणे ही सम्यक स्नेहपानाची लक्षणे आहेत. ज्या दिवशी रुग्णाला ही लक्षणे दिसतात त्या दिवशी स्नेहपान थांबविले जाते. स्नेहपान चालू असताना रुग्णाला औषधी काढय़ाच्या वाफेने स्वेदन म्हणजे शेक दिला जातो. वमन व विरेचनासाठी शरीरास बल  देणे एवढाच या पूर्वकर्माचा उद्देश नसून वमन-विरेचनाने आपण अनुक्रमे जठरातून व आतडय़ातून जे दूषित दोष, मल शरीराबाहेर काढणार आहोत, ते संपूर्ण शरीरातून तेथपर्यंत आणण्याचे महत्त्वाचे कार्य स्नेहन-स्वेदनाने होते. स्नेहनाने शरीरातील सर्व धातू, स्रोतस, अवयव यांना मऊपणा येतो, ज्यामुळे त्यांना चिकटलेले दूषित दोष त्यापासून वेगळे होऊ लागतात. हे विलग झालेले दोष त्या त्या अवयवांतून जठर किंवा आतडय़ापर्यंत आणण्याचे कार्य स्वेदनाने म्हणजे संपूर्ण शरीरास दिलेल्या शेकामुळे होते. अशा प्रकारे अतिशय तर्कशुद्धरीत्या निश्चित  केलेले स्नेहन, स्वेदन ही पूर्वकर्मे म्हणजे वमन व विरेचन या प्रधान पंचकर्म चिकित्सेची जणू पायाभरणीच आहे.

स्नेहपान पूर्ण झाल्यावर वमनापूर्वीचा १ दिवस व विरेचनापूर्वीचे २ दिवस यांना विश्रांती दिन म्हणतात. या दिवसांत रुग्णास केवळ बाहय़ स्नेहन व स्वेदन केले जाते व त्या त्या उपक्रमास योग्य आहार दिला जातो. वमनाच्या आदल्या दिवशी  जठरात आलेल्या कफदोषाचा अधिक उत्क्लेश व्हावा, की जेणेकरून तो वमनाच्या वेळी सुखाने बाहेर पडावा यासाठी  दही, केळे, उडदाचे पदार्थ, तूप असा  कफ वाढविणारा आहार दिला जातो, तर विरेचनाच्या आधी दोन दिवस आंबट, खारट चवीचा, उष्ण गुणांचा पित्त वाढविणारा आहार दिला जातो.
वमनाच्या दिवशी सकाळी लवकर रुग्णाला मसाज व शेक  दिला जातो. आयुर्वेदाने वैद्याच्या सर्व गुणांमध्ये सिद्धी हा सर्वात  श्रेष्ठ गुण सांगितला आहे व सिद्धी दैवी अधिष्ठानाशिवाय शक्य नाही. म्हणूनच वमन- विरेचनासारखे थोडेसे किचकट, परंतु  अत्यंत फलदायी चिकित्सा उपक्रम करताना वैद्य, रुग्ण, औषध व परिचारक या चिकित्सेच्या चतुष्पादांना यश मिळावे म्हणून तत्पूर्वी सिद्ध मंत्रांचे पठण व देवतांना नमन करावे. शरीर व  मनास सामथ्र्य देणाऱ्या या पवित्र नामस्मरणानंतर वमन करविणाऱ्या मदनफळ, वेखंड, संधव यांचे मधाबरोबर चाटण व  जेष्ठीमधाचा काढा, उसाचा रस, दूध, संधवमिश्रित पाणी यांचे  मोठय़ा प्रमाणात प्राशन करवून रुग्णास वमन करविले जाते. रुग्ण तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने जितक्या अधिक प्रमाणात व जलद औषधी वामक काढय़ाचे प्राशन करतो, तितके वमनाचे वेग चांगल्या प्रकारे येतात व संपूर्ण शरीरातून जठरात आलेले दूषित दोष अधिक प्रमाणात व सुखाने शरीराबाहेर पडतात. सामान्यत: तासाभरातच पूर्ण होणाऱ्या या उपक्रमात सुरुवातीला औषधी  काढा, त्यानंतर दूषित कफ व शेवटी पिवळेजर्द आंबट-कडू पित्त क्रमाने बाहेर पडतात. यालाच सम्यक पित्तान्त वमन म्हणतात. वमनाच्या आधी व वमन उपक्रम चालू असताना रुग्णाला जाणवणारी बेचनी असे पित्तान्त वमन झाल्यावर कुठल्या कुठे निघून जाते. रुग्णाला संपूर्ण शरीरात हलकेपणा जाणवतो, चेहरा  आणि संपूर्ण शरीराची त्वचा प्रसन्न होते आणि जणू नवजीवन मिळाल्याची जाणीव होऊ लागते.
विरेचन देताना रुग्णाला सकाळी हलका आहार देऊन दुपारी आरग्वध, निशोत्तर, काळ्या मनुका, एरंड तेल अशा विरेचक  औषधांचा विशिष्ट प्रमाणात काढा दिला जातो. यानंतर त्या त्या व्यक्तीच्या कोठय़ाप्रमाणे काही वेळाने विरेचनाचे वेग येतात. यात औषधी काढा, मलप्रवृत्ती, पित्त व कफ यांचे क्रमाने प्रवर्तन  होते. काही वेळा पोटात मुरडा येऊन मलप्रवृत्ती होते. अशा प्रकारे विरेचनाचे त्या त्या व्यक्तीच्या कोठय़ाप्रमाणे वेग येऊन सम्यक कफान्त विरेचन झाल्यावर रुग्णाला पोट व संपूर्ण शरीरच हलके वाटते. वमन व विरेचन हे दोनही पंचकर्म उपक्रम केल्यावर व्यक्तीचा अग्नी लागलीच मंदावतो. मात्र ज्याप्रमाणे आपण बाहय़ सृष्टीतील अग्नी गवताची काडी, गोवऱ्या अशा क्रमाक्रमाने इंधन वाढवून प्रदीफ्त करतो, त्याचप्रमाणे वमन-विरेचनाने मंद झालेल्या जठराग्नीला भाताची पातळ पेज, घट्ट  पेज, मुगाचे फोडणी न दिलेले व दिलेले वरण, मांसरस, मऊ भात, मुगाची खिचडी असा आहार क्रमाक्रमाने देऊन इंधन  पुरविले जाते व अग्नीचे बल वाढवून पचन सुधारले जाते. यालाच पंचकर्माचे पश्चातकर्म किंवा संसर्जनक्रम म्हणतात. याशिवाय या काळात उन्हात फिरणे, दगदग, प्रवास, जागरण, दु:ख-राग-चिंता असे मनाचे षड्रिपूही वज्र्यच. वमन- विरेचन  संपूर्ण उपक्रमास जितके दिवस लागले, तेवढेच दिवस त्यानंतरही शरीरास व मनास विश्रांती देणे गरजेचे असते. थोडक्यात मोठय़ा शस्त्रकर्माच्या आधी व नंतर जशी रुग्णाची काळजी घ्यावी लागते, तसेच पंचकर्मापूर्वी व नंतर शरीराची निगराणी राखणे गरजेचे असते.
कॅन्सरमध्ये कफदोष, रसधातू व शुक्रधातूंची निर्मिती व स्थान ज्या अवयवांत आहे अशा फुफ्फुस, स्तन, जिव्हा, मुख, पौरुषग्रंथी, पुरुष बीजाण्ड, स्त्रीबीजाण्ड, गर्भाशय या अवयवांच्या कॅन्सरमध्ये तसेच ज्या कॅन्सरमध्ये दुष्ट-व्रण-ग्रंथी-अर्बुदातून दरुगधी स्राव-क्लेद-पूयस्राव येत आहे अशांत वमनाचा लाभ होतो. विशेषत: पित्तदोष व रक्तधातूच्या दुष्टीमुळे होणाऱ्या त्वचेच्या, पित्ताशय यकृत अग्न्याशयाच्या कॅन्सरमध्ये, ल्युकेमिया म्हणजे रक्ताच्या कॅन्सरमध्ये विरेचन उपयुक्त ठरते. थोडक्यात  कॅन्सरमधील अतिशय चिवट अशी दोषदुष्टी, धातुदुष्टी, अवयवदुष्टी नष्ट करून अवयव शुद्ध करण्याचे व पर्यायाने  कॅन्सरचा  पुनरुद्भव टाळण्याचे सामथ्र्य वमन व विरेचन या शोधन चिकित्सेत आहे. मात्र तज्ज्ञ, दक्ष व अनुभवी वैद्यांच्या  मार्गदर्शनाखाली  केल्यासच! 

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!