सकाळी उठल्यानंतर व्यायामाद्वारे पाठीच्या स्नायूंना योग्य ताण दिल्यास (स्ट्रेचिंग) ते बळकट होण्यास मदत होऊन दिवसभराची दगदग सहन करण्यासाठी अधिक सक्षम होतात. त्यासाठी खालील व्यायाम करता येतील.
पाठीच्या खालच्या बाजूंच्या स्नायूंसाठी स्ट्रेचिंग  
*  दोन्ही गुडघे आणि तळहात जमिनीला टेकवा. ओणवे होऊन पाठीला बाक येऊ न देता बसा. (छायाचित्र क्र. १ पाहा.)

 

*  पाठीला वरच्या दिशेने थोडा बाक देऊन दोन्ही हात समोरच्या बाजूला जमिनीवर पूर्णपणे टेकवा आणि डोकेही जमिनीला टेकवा. या वेळी नितंब टाचांना टेकलेले हवेत. (छायाचित्र क्र. २ पाहा.)
*  हा व्यायाम २ वेळा करा आणि प्रत्येक वेळी १५ सेकंदांसाठी व्यायामाच्या दुसऱ्या स्थितीत बसा.
*  या व्यायामादरम्यान श्वासोच्छ्वास नेहमीसारखाच करा.  

पाठीच्या आणि ओटीपोटाच्या स्नायूंसाठी सकाळी उठल्याबरोबर करण्यासाठीचा व्यायाम
*  पाठीवर झोपा.
*  पाय ओटीपोटाजवळ आणून दुमडा.
*  दोन्ही हातांनी पायांच्या भोवती धरून गुडघे ओटीपोटाच्या शक्य तेवढे जवळ आणण्याचा प्रयत्न करा. (छायाचित्र क्र. ३ पाहा.)
*  या व्यायामातही श्वासोच्छ्वास नेहमीसारखाच ठेवा.
*  बद्धकोष्ठाचा त्रास असणाऱ्यांनाही या व्यायामाने फायदा होतो.