पावसाळ्यातील प्रमुख आजार म्हणजे सर्दी, खोकला, ताप आणि अपचनामुळे होणारे पोटाचे विकार! यासाठी काही घरगुती काढे अवश्य करून पाहा. पावसाळ्यातच नव्हे, तर इतर ऋतूंमध्येही अनेक विकारांसाठी प्रथमोपचार म्हणून हे घरगुती काढे खूप उपयोगी ठरतात.
ताप : काडे किराईत किंवा कडू किराईताच्या बारीक काडय़ा बाजारात मिळतात. एक ग्लास पाण्यात या काडय़ांचे बारीक तुकडे एक चमचाभर टाकून पाव ग्लास शिल्लक राहीपर्यंत ते पाणी उकळवावे व ते गाळून गरम गरम प्यायला द्यावे. साधारण अर्धा इंच आल्याचा तुकडा, तुळशीची पाच ते सात पाने, एक छोटा चमचा धणे पावडर यांचाही गरम गरम काढा प्यायला दिल्यास घाम येऊन ताप उतरतो. तापात खूप अंग दुखत असेल, तर याच काढय़ात दोन काळ्या मिरी कुटून टाकल्यास अंगदुखी कमी होते.
सर्दी : सर्दीसाठी पातीचहाचा (गवती चहाचा) काढा आपल्या सर्वाना माहीतच आहे. पातीचहाच्या दोन पात्या (तुकडे करून), आल्याचा तुकडा, अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा बडीशेप, तुळशीची पाच ते सात पाने (शक्यतो काळी तुळस), दोन काळ्या मिरी, एक लवंग, एक सपाट चमचा ज्येष्ठ मध हे सर्व दोन ग्लास पाण्यामध्ये उकळवून अर्धा ग्लास शिल्लक ठेवून तो काढा गाळावा. त्यात थोडी खडीसाखर टाकून गरम गरम प्यायला द्यावा. दिवसातून दोन ते तीन वेळा काढा दिल्यास शिंका, सतत नाक वाहणे, नाक चोंदणे, डोके जड होणे किंवा दुखणे, अंग मोडून बारीक ताप वाटणे या सर्व तक्रारींसाठी या काढय़ाचा खूप फायदा होतो.
कफ-खोकला : एक ग्लास पाण्यात एक सपाट चमचा आळशी थोडी भाजून कुटून टाकणे. त्यात एक सपाट चमचा ज्येष्ठ मध पावडर घालून पाव ग्लास पाणी शिल्लक राहीपर्यंत उकळवून गाळून त्यात खडीसाखर टाकून गरम पिणे. त्याने खोकला कमी होतो. खोकल्यामध्ये छातीत कफ साठून सुटत नसेल, तर याच काढय़ात चमचाभर किसलेला पांढरा कांदा व दोन मिरे ठेचून टाकावीत. दोन लवंगा, अर्धा चमचा ओवा व दालचिनीचा तुकडा, अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर यांच्या काढय़ानेही कफ सुटतो. आळशी, ज्येष्ठमध व ओल्या हळदीचा तुकडा यांचा काढा सुक्या खोकल्यात गुणकारी आहे. खोकून खोकून दम लागत असेल तर लवंग, जायफळ, आल्याचा तुकडा, काळे मिरी, ओवा व ज्येष्ठ मध यांचा काढा खडीसाखर घालून गरम, थोडा पण वारंवार पाजावा. लगेच फरक जाणवतो.
अपचन : पावसाळ्यात पचन मंद होत असल्याने पोटदुखी, मुरडा, आव पडणे, जुलाब होणे, भूक कमी होणे, उलटय़ा होणे असे अनेक प्रकारचे अपचनाचे विकार होतात. या सर्व विकारांमध्ये प्रामुख्याने पचन सुधारणे महत्त्वाचे असते. यासाठी सुंठ पावडर, आले, जिरे, ओवा, धणे, बडीशेप, मिरी-पिंपळी पावडर अशा पाचक द्रव्यांचा अपचनाच्या वेगवेगळ्या लक्षणांप्रमाणे काढा करून दिला जातो. नुसत्या सुंठीचा काढा (थोडा गूळ किंवा खडीसाखर टाकून) दिला तरी फरक पडतो.
हे लक्षात ठेवा-
* सर्वसामान्यपणे काढय़ासाठी वापरली जाणारी द्रव्ये कुटून बारीक करून घ्यावी. वस्तूच्या आठपट पाणी घालून ते उकळवून एक चतुर्थाश (पावपट) शिल्लक राहिल्यावर गाळून घ्यावे.
* काढा उकळत असताना त्यावर झाकण ठेवू नये.
* काढा शक्यतो गरम किंवा कोमट असतानाच प्यावा.
* काढा उकळवताना अग्नी मंद किंवा मध्यम स्वरूपाचा ठेवावा.
* काढा केल्यावर तो लगेच संपवावा. शिल्लक काढा पुन्हा गरम करून पिऊ नये.
* काढा शक्यतो सकाळ, संध्याकाळ रिकाम्या पोटी घ्यावा.
* काढय़ात दूध टाकायचे असल्यास तो गाळून घेतल्यावर घालावे.
* मध टाकायचा असल्यास गाळलेला काढा कोमट झाल्यानंतरच टाकावा. गरम काढय़ात टाकू नये.
* त्याचप्रमाणे गूळ किंवा खडीसाखर काढा गाळून झाल्यावर चवीपुरती घालून विरघळवावी.

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Makeup tips for people with oily skin during summer
Summer Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप कसा करावा? असा करा स्वेट प्रूफ मेकअप